अपराध तत्व आणि कर्माचा हिशोब भाग १९

“हो मावशी.” आता मायकल आणि साईराज ही त्यांच्याजवळ आले. “त्यांनी कधीच काही सांगु दिल नाही. पण आम्हाला मेसेज करून बोलावणारे तेच होते.” “जेव्हा सरळ मार्गाने जाणारी दार बंद दिसायला लागली.” साईराज “तेव्हा त्यांनीच आमचे हात मोकळे करायला परमीशन दिली होती.”
मागील भागात.

केसची तारीख उजाडली. आज प्रसाद ब-याचश्या आरोपातून मुक्त होणार होता. त्यामुळे सरला, विमला आज निवांत होत्या. पण एक गोष्ट खटकत होती की आज सकाळपासून नाही आजोबांचा काही पत्ता होता आणी नाही राजनचा. आजवर आजोबा काही बोलत नव्हते आणि जास्त हॉस्पिटलला आले ही नव्हते. म्हणून सरलांना त्यांच्याबद्दल जरा रागच आला होता. पण कालपासून राजनचा एकही फोन आला नव्हता आणि आज तो आला ही नव्हता. ते बघून सरलांना त्याची काळजी वाटायला लागली होती.

थोड्याचवेळात पोलीसांची जीप प्रसादला घेऊन जायला आली. साईराज ही सकाळीच तिथे आलेला होता. विद्या आणि मायकल ही सोबतच आलेले होते. परी मात्र डायरेक्ट न्यायालयात येणार होती. सोनीया, ऋतुजा, रक्षा, मयंक हे देखील सोबत येणार होते. सगळेच आज खूप आनंद होते. कारण साईराजने शब्द दिला होता की आज प्रसाद निर्दोष मुक्त होणार. कस? ते माहीत नव्हतं. पण त्याच्या शब्दावर सगळ्यांनाच विश्वास होता.

तेवढ्यातच साईराज सरलांजवळ आला आणि त्यांचे हात हातात घेतले. सरला त्याच्याकडे प्रश्नार्थक बघू लागल्या.

“मावशीच आज जे काही कोर्टात होणार आहे. त्यासाठी तुम्ही तुमची मानसीक तयारी करा.” साईराज गंभीर होत बोलला. “आज खूप काही गोष्टी बाहेर येतील. ज्या आजवर पडद्यामागे होत्या.”

“असा का बोलत आहेस रे?” सरलांचा चेहरा चिंताग्रस्त झाला. “आज तो सुटणार म्हणजे किती आनंदाचा दिवस.”

आता पूढे.

“हो, पण त्या बरोबर काही सत्य असे ही बाहेर येतील ज्याने तुम्हाला खूपच धक्का बसेल.” साईराज “फक्त ऐकण्याची हिम्मत ठेवा. बाकी कुणीच काहीच कारण नाही.” शेवटी शेवटी साईराज मंद स्मित करत बोलला.

“ठिक आहे.” सरलांना त्याच्यावर पुर्ण विश्वास होता.

काही वेळातच ते सगळेच न्यायालयात पोहोचले. एकीकडे आज प्रसाद सुटणार याचा आनंद होता. तर दुसरीकडे साईराजचे बोललेले शब्द सरलांना टेन्शनमध्ये टाकत होते. राजनही सकाळपासून गायब होता. त्यातल्या त्यात आज सगळेच न्यायालयात पोहोचलेले असताना अजूनही प्रसादची केस का पुकारत नाही? हा प्रश्न सरलांच्या मनात अजूनच टेन्शन वाढवण्याचं काम करत होते. त्यांना आता फक्त प्रसादच्या सुटकेची आशा लागून राहीली होती. ते म्हणतात ना हत्ती गेला आता फक्त शेपुट राहील. तरी धीर धरला जात नाही? तसचं काहीस सरलांच झालेल होत.

काही वेळाने अजून एक पोलीसांची गाडी तिथे येऊन पोहोचली. त्यातून आधी साटम उतरले. साळवे तर प्रसादसोबतच होते. साटमच्या मागे आजोबा ही उतरले. ते बघून सरलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह यायला सुरवात झाली. आजोबांच्या मागे अनामिका ही उतरली, तिच्या मागे प्रसादचा सहकारी उतरला होता. सर्वात शेवटी बेड्या घातलेला माणूस उतरलेला बघून सरलांना खूपच मोठा धक्का बसला होता. तश्या त्या पटकन त्याच्याजवळ गेल्या.

“दादा काय रे हे?” सरला राजनचा हात हातात घेऊन बघत होत्या. “तुला कशाला बेड्या? साहेब काय आहे हे?” सरला आता रागात साटमला विचारू लागल्या.

“कळेल, तुमच्या दादाचे प्रताप.” साटम ही कडक आवाजात बोलले. “आधी न्यायालयात घेऊन जाऊ दे यांना.”

“आजोबा तुम्ही पण यांच्यासोबत?” सरलांचे प्रश्न काही थांबायचे नाव घेत नव्हते.

ते बघून साईराज त्यांच्याजवळ गेला. “मावशी शांत व्हा बरं. बोललो होतो ना, जरा सांभाळा स्वतःला. अजून बरचं काही ऐकायचं बाकी आहे.”

आता सरलांचे भरलेले डोळे बघून साईराजच्या मनात कालवाकालव झाली. आता घडलेली गोष्ट बघूनच त्यांना इतका धक्का बसला. तर बाकीच ऐकुन काय होईल? हा प्रश्नच प्रसाद, मायकल, विद्या साईराज यांना पडला.

या पोलीसांच्या गाडीमागे अजून एक गाडी आली. त्यातून परी उतरली. ती आज पूर्ण जिल्हा प्रमुखांच्या भुमिकेत आलेली होती. तिच्या गाडीमागे मित्तलला आणि परमारांना घेऊन अजून एक गाडी आली.

त्या दोघांना बेड्यांमध्ये बघून सरला, विमला, सोनिया, ऋतुजा, रिया यांच्या मनाला खूपच आनंद मिळाला होता. पण शेवटी प्रश्न हाच होता का ही बाकी सगळीच मंडळी पोलीसांसोबत का? तिथे आता ऋतुजाचे वडीलही येऊन पोहोचले होते.

सरला ऋतुजाच्या वडीलांना सोबत घेत विद्याजवळ गेल्या. “काय चालु आहे हे सगळंच? दादा आणि आजोबा पोलीसांसोबत का?”

आता विमला ही या तिघांजवळ गेल्या.

विद्याने दिर्घ श्वास घेतला. “मामांच तर कोर्टातच समजेल. पण आजोबांच विचारशील तर आमची बंद केलेली खोली स्वतःच पुढाकार घेऊन उघडायला लावणारे आणि आपल्या प्रसादला बाहेर काढण्यासाठी आम्हाला पुढे करून स्वतः पडद्यामागे राहून सगळीच सुत्र हलवणारे आमचे वासुदेव आहेत ते.”

सरला, विमला आणि ऋतुजाचे वडील तिघेही धक्का लागल्यागत विद्याकडे बघत होते.

“हो मावशी.” आता मायकल आणि साईराज ही त्यांच्याजवळ आले. “त्यांनी कधीच काही सांगु दिल नाही. पण आम्हाला मेसेज करून बोलावणारे तेच होते.”

“जेव्हा सरळ मार्गाने जाणारी दार बंद दिसायला लागली.” साईराज “तेव्हा त्यांनीच आमचे हात मोकळे करायला परमीशन दिली होती.”

“ते बोलत तर काहीच नव्हते.” विद्या “पण करत मात्र भरपूर काही होते. अनामिका जीव द्यायला निघाली होती. तेव्हा आजोबांनी तिला समजावून आपल्या बाजुने साक्ष देण्यासाठी तिला मनवले. आगीत जखमी झालेले जेवढे पण माणस होती. त्या सगळ्यांनाच प्रत्यक्ष भेटून खरं खोट करून घेतलं. आज ते पण आपल्या बाजुने उभे आहेत.”

“नाही त्यांनी त्यांच तत्व मोडलं आणि नाही त्यांनी दादाला एकटं पाडलं.” सोनीया “तेच बोलले होते ना? जर त्याने काहीच अपराध केल नसेल तर तो सुटेल. बघ आज तो सुटणार आहे आई.” सोनीया बोलता बोलता खूपच हळवी झाली. तिचे डोळे भरून आले होते.

सरलांच डोक सुन्न झाल होत. आजवर हे सगळंच योगायोग म्हणून त्या विचार करत होत्या. इतकं सगळचं घडूनही प्रसाद आणि आजोबा का शांत होते? हे त्यांना आज समजायला लागलं होत. आजवर आपण त्यांना खूप चुकीच समजत राहीली म्हणुन सरलांना आता खूपच भरून आल होत. मनात अपराधी भावना तयार व्हायला लागली. अश्रु त्यांच्या पापण्यांच्या वेशीवर कधीच येऊन उभी राहीले होते. तितक्यातच आजोबांची नजर सरलांवर पडली. तशी सरलांनी त्यांची नजर खाली करून घेतली. आजुबाजुला त्यांची पलटन बघून तिथे काय झाल? याचा अंदाज त्यांना आला आणि ते ही सरलांजवळ आले.

“आज आपला प्रसाद सुटणार.” आजोबा हलकेच हसत बोलले. “तुम्ही असे रडताय का?”

तस सरलांना हुंदका आवरता आला नाही. त्या लागलीच आजोबांचे पाय पकडणार होत्या. पण आजोबांनी त्यांना लागलीच थांबवलं. दोन क्षण शांतता नांदली. काही बोलायची जणु आवश्यकताच भासली नव्हती.

“चला केसची वेळ झाली.” आजोबा न्यायालयाच्या कक्षाकडे वळले.

“पण मला का सांगीतलं नाही?” सरलांनी हळुच विचारलं.

“ते आत गेलो की समजेल.” आजोबा आत जाऊ लागले.

प्रसादला तर आधीच घेऊन गेले होते. आता सगळे आत जाऊन बसले. पोलीसांनी आज परत एक चार्जशीट फाईल करायला घेतली. आज ही महत्वाच्या काम नसलेल्या इतर केसेसना पुढची तारीख देण्यात आली. बाकी युक्तीवाद, उलटतपासणी, पुरावा दाखल हे मागे ठेवून पहीले प्रसादची केस पुकारली गेली. शेवटी या जिल्ह्यातील ती मोठी केस होती. जी सतत बातम्यांच्या मुख्य पानावर झळकत रहात होती.

पोलीसांनी दाखल केलेली चार्जशीट न्यायाधीशांनी बघायला सुरवात केली. तसा त्यांना ही आश्चर्याचा धक्का बसला होता. साटम तर साक्षीदाराच्या कक्षेत उभे होते.

“हा बोला साटम साहेब.” न्यायाधीशांनी विचारले. तस साटम बोलायला लागले.

“हे उपकरण संशयीत आरोपी प्रसाद यांच आहे. ते त्या ब्ल्यु प्रिंट आणि त्याने काढलेल्या रिपीर्टवरून सिध्द होते. प्रसाद हा आधी मित्तलच्या कंपनीत कामाला होता. तिथेच त्याला या उपकरणाची कल्पना आली. त्याने तस कंपनीच्या मॅनेजरला सांगीतले. पण प्रसादला कोणताही प्रतिसाद दिला गेला नाही. नंतर जेव्हा प्रसादने स्वतः ते बनवून दाखवले. तेव्हा मात्र फक्त पैशासाठी ते उपकरण त्यांच असल्याच भासवलं. तस त्यांनी परदेशातील कंपन्यांसोबत करार केलेला होता. पण प्रसाद ते उपकरण स्वतःच्या नावावर रजिस्टर करून सावंत साहेबांकडे घेऊन गेला होता. तिथे मित्तलने परमारांकडून त्यांचा मृत्यु घडवून आणला. तसा परमारांचा कबुलनामा आमच्याकडे आहे. तरीही प्रसाद ऐकत नाही म्हणुन मित्तलने प्रसादचा सहकारी आणि त्याचे मामा राजन यांना हाताशी धरून सादरीकरणाच्या दिवशी त्या उपकरणात आग लागावी म्हणुन षडयंत्र रचलं आणि त्यात बरीच माणस जखमी झाली.”

साटमच्या या वाक्यावर सरलांना खूपच मोठा धक्का बसला. त्या मोठमोठ्याने श्वास घेऊ लागल्या होत्या. "खोट आहे हे.” त्या राजनकडे बघून हळुहळु मोठ्याने बोलायला लागल्या. पण राजन मात्र खाली मान घालून उभा होता.

“राजन आमचा चालु असलेल्या प्रत्येक तपासाची खबर मित्तलला देत होता. या सगळ्यां गोष्टीसाठी आमच्याकडे दोन माफीचे साक्षीदार आहेत. एक मिसेस अनामिका आणि मिस्टर शशांक. त्यांच स्टेटमेंट ही आम्ही जोडलेले आहेत. जी माणस जखमी झाली आहेत. त्यांनीही त्यांच्या स्टेटमेंट मध्ये अस म्हटलं आहे की आग ही उपकरणाच्या बाहेरुन लागली होती. नंतर ती त्या उपकरणात गेली. त्या उपकरणात अग्नीविरोधी प्रणाली होती. पण त्याची वायर प्रसादच्या सहका-याने कापुन ती बंद पाडली होती. म्हणुन ती प्रणाली कार्यरत न झाल्याने आग जास्तच वाढली.”

साटम बोलायचे थांबले. आज सगळेच काही स्पष्ट झालं होत. न्युजवाल्यांसाठी तर ही ब्रेकींग न्युज होती. फक्त साहेबांच्या आदेशाची वाट बघत होते.

“न्यायमूर्ती साहेब.” साईराज उठला. “मित्तलसाहेबांवर अजून बरेच काही गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांनी या आधी ही अशाच खूप तरुणांचा बळी घेतलेला आहे. त्यांच्या केसची फाईल ही यासोबत घ्यावी. या सगळ्यांत प्रकरणात माझ्या अशिलाला विनाकारण फक्त गोवले गेलेल आहे. त्याचा या घटनेशी काहीच संबंध नाही. हे या चार्जशीट वरून स्पष्ट झालेले आहे. तरी माझ्या अशिलाची निर्दोष मुक्तता करावी. एवढीच मेहेरबान न्यायालयाला माझी विनंती आहे.”

साईराज बोलून बसला. तर तिकडे सरला जाणिवेच्या पलीकडे गेलेल्या होत्या. त्याच काय? विमला, ऋतुजा, तिचे वडील, सोनाया, रिया या सगळ्यांनाच जबरदस्त धक्का बसलेला होता. राजन प्रसादचा सख्खा मामा होता आणि त्याचाच या गुन्ह्यामागे हात असलेला बघून सगळेच शॉकमध्ये गेलेले होते.

“का?” सरला हुंदका आवरत कशातरी राजनकडे बघून बोलल्या. “का? वागला तो असा?” त्यांच्या चेहर्‍यावर खूपच राग चढला आणि त्या राजनजवळ जायला बघणार तोच परीने त्यांना घट्ट धरून ठेवलं.

क्रमशः

कसा वाटला भाग? कमेंट करुन सांगायला विसरू नका.

🎭 Series Post

View all