अपराध कुणाचा

मला खूप झोप येत होती
अपराध कुणाचा?
इन्स्पेक्टर नाईक फोनवर बोलत होते ,लेडी कॉन्स्टेबल पूर्वा आत येत म्हणाली” सर बाहेर बायकांनी मोर्चा आणला आहे त्या जोरात जोरात नारेलावून राहिल्या आहेत.

बाहेरुन आवाज येत होते , नाईक फोन ठेवून उठले व म्हणाले “त्यांची पुढारी कोण आहे तिला पाठवा”.

दोन बायका हातात बॅनर घेऊन आल्या.
“ काय ओरडा चालवला आहे मॅडम”?
“ आम्ही त्या हत्यारिणीला फाशी द्यावी, अशी मागणी घेऊन आलो आहे.”

हे पहा हे काम कोर्टाचा आहे. तुम्ही तुमचे ज्ञापन येथे ठेवून जा, तेवढ्यात त्यांच्यातली एक आत जाऊन पाहून आली.
“ हिच ना ती ,हिला काहीच कशी दया माया नाही आली आपल्या पोटच्या पोराला मारताना?”
पूर्वा मॅडम, ‘थांबवा त्यांना'
‘ हे बघा मॅडम तुम्ही निघा आता!
इथे तमाशा करू नका . नाईक ओरडले.

त्या दोघी निघून गेल्या तिकडे लॉकअप मध्ये बसलेली” ती “आणखीनच आक्रसून बसली.
त्या आलेल्या बाईचे बोल तिच्या कानात घुमत होते “आईपणाला कलंक ,कुमाता वगैरे सर्व विशेषण तिला मिळाली त्या एका घटनेने , अचानक बाळाच्या रडण्याचे आवाज तिच्या कानात घुमायला लागले, तिचा ब्लाउज ओला होत होता, रडत रडत ती खाली बसली

“ए उठ कोणी आलय तुला भेटायला “ कॉन्स्टेबल पुर्वा ने कोरड्या आवाजात तिला हातातल्या स्टिकने हलवल,
रीना ला कळलच नाही ती कुठे आहे ?स्वप्नात तर ती आणि राकेश स्कूटर वर फिरत होते. राकेश तिचा नवरा खूप प्रेम होतत्यांचे .
त्याच्याशिवाय आयुष्याची कल्पनाच नव्हती करू शकत ती.मी तुला खूप सुखात ठेवीन असं वचन दिलं होतं राकेशनी.
दोघांनी घरच्यांना न जुमानता लग्न केलं सुरुवातीचे दिवस अगदी फुलांच्या पायघड्यांवरून चालले आहेअसेच रीनाला वाटत असे. पण हळूहळू त्यातले काटे तिला जाणवू लागले.
राकेशला सगळ त्याच्या मनाप्रमाणे लागे त्याचे उठण्या झोपण्याच्या वेळा खाण्यापिण्याच्या आवडी कधी रीना ची इच्छा नसली तरीत्याच्या प्रेमाखातर ती त्याच्या मर्जीने वागत असे. लग्न होऊन एक वर्ष झालं आणि रीना ला दिवस गेले. त्ती त्या सुखाने हरखून गेली. आपल्या प्रेमाचे सुंदर प्रति रूप येणार या विचाराने ती सुखावली पण त्या गर्भारपणात तिला खूप त्रास झाला काही खाल्लेले पचत नसे अशक्तपणा जाणवत असे.
राकेश कधी तिची काळजी घेई तर कधी दुर्लक्ष करी.बाळाची वाढ नीट होत होती पण रीनाला अशक्तपणा येत होता डॉक्टरने तिला आयरनआणि कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या व सकस अन्न फळ खा सांगितलं ते सर्व राकेश आणून दिला पण घरात इतर कोणीही तिचे डोहाळे पुरवणार तिच्याकडे लक्ष देणारा नव्हतं आणि राकेश तिला कुठे पाठवायला तयार नव्हता.
कसेबसे नऊ महिने काढले , राकेश रीनाच्या संसारात रौनकने प्रवेश केला त्या दोघांच्या प्रेमाचे ते सुंदर रूप, पण– आता चित्र हळूहळू बदलत चालले होते डिलिव्हरी आणि आधी झालेल्या त्रासामुळे रीनाला खूपच अशक्तपणा आला होता घरात तिच्या तब्येतीकडे लक्ष देणार कोणी अनुभवी व्यक्ती नव्हते शेजारी पाजारी तरी किती मदत करणार ?
तिच्या या अशा तब्येतीमुळे राकेश ही चिडचिडा झाला , त्याच्या खाण्यापिण्याची आबाळ होत असे आईची तब्येत अशक्त त्यामुळे बाळही कमजोर ते सारखे आजारी पडायचे त्यामुळे किरकिर करायचे रात्र रात्र जागरण व्हायची राकेशला नोकरीवर जायचे म्हणून तोही झोपमोड झाली की चिडचिड करायचा, तुला एक बाळ ही नीट सांभाळता येत नाही म्हणून ओरडायचा. हळूहळू रीनाचा थकवा आणि चिडचिडे पण वाढू लागले .ती बाळाकडे दुर्लक्ष करू लागली, त्याच्या रडण्याने तिचे डोके सणकू लागेल खूप राग येई स्वतः वरचा ताबा सुटेआणि एक दिवस —--

कॉन्स्टेबल पूर्वा ने तिला परत आवाज दिला
“ या बाई भेटायला आल्याआहे !
काळा कोट घातलेली एक स्त्री तिच्याजवळ उभी होती
रीना ने हात जोडून नमस्कार केला.
“ कशी आहेस तू? तिच्याजवळ बसत शोभा म्हणाली .मी एडवोकेट शोभा आहे तुझी केस मी घेतली आहे .मला सांग कशी आहे आता तुझी तब्येत ?

रीनाला कळेच ना तिच्याशी ही बाई इतकं चांगलं का बोलती आहे आत्तापर्यंत तिला सर्वांनी शिव्या आणि लांछन च दिले.
रीना घाबरून आणखीनच आक्रसून बसली .

‘घाबरू नकोस, खरं खरं सांग काय झालं?’

“ मी अपराधी आहे ,मी कबुली दिली, मीच माझ्या बाळाला मारलं मला, मला फाशी, बोलता बोलता तिला हांफणी भरली.

‘ तू एकटीच दोषी नाही या सर्वाला. तुला कोणी विचारले नाही पण मला सांग काय घडलं असं ?
तुझंच बाळ होतं ना? तुला आता त्याची आठवण येते ना ?”
माझं बाळ रीनाच्या डोळ्यासमोर तो निरागस चेहरा उभा राहिला आणि ती हुंदके देऊन रडू लागली.
तिला रडताना पाहून शोभाने तिच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवला.
मी –मला माहित नाही काय झाले होते तेव्हा’खूप खूप राग यायचा,त्याला सतत बरं नसायचं रात्र रात्र जागून काढावी लागे.
मला खूप झोप येत असायची पण तो झोपू देत नसे. त्या दिवशी पण मला खूप झोप येत होती राकेश घरी नव्हता मी बाळाला झोपूवून झोपले. काही वेळातच तो रडू लागला मी त्याला दूधही पाजले पण तरी त्याचे रडणे थांबे ना माझासंताप अनावर होत होता वाटलं काय कटकट आहे सुखाने झोपू ही देत नाही, मग मला काय झाले काय ठाऊक मी रागाने त्याला ढकलून दिले तो पलंगावरून खाली पडून भिंतीवर आपटला आणि चुप झाला, मला परत झोप लागली.-----जणू काळझोप
सकाळी राकेशने मला हलवुन उठवले आणि म्हणाला” अग आई आहेस की कोण? तो खाली मरून पडला आहे नी तू छान झोपा काढते आहे? काय केलंस तू त्याला?
मी घाबरून उठले धावत बाळाला उचलून कुशीत घेतलं पण तो निपचित,मला भीती वाटू लागली मी त्याला हलवू लागले दूध पाजू लागले पण –राकेशने रागाने मला गदा गदा हलवलं आणि ओरडला काय झालं होतं कसा पडला रौनक त्याने विचारले ?
मी –मला काही सुचेच ना मग राकेशने रागाने मला थप्पड मारलीआणि ओरडला काय केलंस तू हे ?
“मी ढकलल माझ्या तोंडातून निघाले, मला झोप येत होती. “
काय तू मारलास त्याला? खून केला आपल्या नाही माझ्या बाळाचा ?असं म्हणत त्यांनी बाळाला उचलले आणि रडू लागला .
थोड्यावेळाने त्यांनी फोन केला डॉक्टर आले त्यांनी त्याला मृत घोषित केले व विचारले कसे घडले “.
मी काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते.

थोड्यावेळाने पोलीस आले- - - बोलता बोलता ती घेरी येऊन पडली.

रात्री आशा केस पेपर तयार करता विचार करत होती! काय घडलं,कां इतकाअनावर झाला असेल राग? काही मानसिक त्रास की इच्छेविरुद्ध ..
आशा ने गायनाकाॅलाजिस्ट डॉक्टर कुलकर्णींना फोन केला “एक केस आहे त्याबद्दल थोडं बोलायचं आहे असे म्हणून तिने वेळ मागून घेतलेली.

घरी आल्यावर आशा विचार करत होती आणि नोट तयार करत होती..

“पोस्ट पर्टम डिप्रेशन एक प्रकारचा “मुड डिस आर्डर “आहे ,यात स्त्रीला बाळंतपणानंतर होणारा मानसिक आजार! त्यात स्वतःला किंवा बाळाला ती नुकसान करू शकते, जर वेळी ट्रिटमेंट केली, कोणी प्रेमाने संभाळले तर हा फेज जाऊन रोगी बरा होतो .याचे मुख्य कारण म्हणजे हार्मोन्स मध्ये होणारा बदल त्यामुळे थकवा निराशा चिडचिड असे बरेच त्रास होतात.”
केस पेपर पूर्ण करून होणारी शिक्षा कमी करता येऊ शकते का याचा विचार करत आशा झोपली.
सकाळी सकाळी पोलीस स्टेशन वरून फोन “मॅडम त्या रीनाने आत्महत्या केली.

म्हणजे?
अहो तिनेओढणीने गळफास केली आणि मेली.

अरे देवा– स्वतःला माफ नाही करू शकली. कां फुल पूर्ण फुलांयच्या आधीच धुळीस मिळाले. वर गेल्यावर तरी तिला या अपराधातून सुटका मिळावी. जो तिने केला पण त्याला कारणीभूत ती एकटीच नव्हती.
परिस्थिती, एकटे पण घरच्यांची साथ नसण,मुळात असा काही आजार असू शकतो याची समाजात कोणाला जाणीव ही नाही कारण एक स्त्री जेव्हा आई होते तेव्हा तिच्यात शारीरिक आणि मानसिक ही बदलाव होतात.
बहुतांश स्त्रियांमध्ये सकारात्मक असतात पण काही ना यातून कमी अधिक प्रमाणात जावे लागते .

आई होणे ही जगातील एक सुंदर भावना आहे पण त्या स्त्रीला आई व्हायच्या आधी ती मानसिक आणि शारीरिकरित्या आई होण्यासाठी तयार आहे का याचा विचार करणे जरुरी आहे,

विशेषत आजच्या काळात जेव्हा मुलींना त्यांचं करिअर त्यातली प्रोग्रेस खुणावत असते अशा वेळेस त्यां आई होण्याची जबाबदारी पूर्णपणे घेऊ शकतात की नाही. त्याचबरोबर त्याची काळजी घेणारे ही असायला हवे कारण या काळात त्या मानसिक आणि भावनिक दृष्ट्या नाजूक होऊ शकतात.. त्याच बरोबर घरातल्या पुरुषाचे पण सहकार्य आहे कां?
असे अनेक प्रश्न होते.

केस सुरू होण्याआधीच बंद पडली.

पण ,--अनेक नवे प्रश्न उलगडून गेली….

—--------------------------------------------
लेखिका सौ प्रतिभा परांजपे