Login

अपेक्षांचं ओझं..

नवरा -बायकोच नातं टिकवण्यासाठी दोन्ही कडून प्रयत्न लागतात
मुंबईच्या गर्दीतलं एक छोटंसं पण मनमोकळं घर.
संदीप आणि राधा — नवरा-बायको, दोघंही नोकरी करणारे. जीवन व्यवस्थित चाललं होतं, पण अलीकडे संदीप थोडा चिडचिडा झाला होता. रोजच्या धावपळीत त्याला शांती कमी वाटत होती, आणि राधालाही त्याची ती अस्वस्थता जाणवत होती.

एका रविवारी सकाळी राधाला आईचा फोन आला.

“बाळा, थोडे दिवस तुझ्याकडे यावं वाटतंय... तब्येतीचा त्रास चाललाय. डॉक्टरांनी मुंबईत तपासणी सुचवलीये.”

राधा आनंदाने म्हणाली—
“अगं आई, नक्की ये! मी आणि संदीप आहोतच ना. इथे नीट तपासणी होईल.”

संध्याकाळी कमलाबाई — राधाची आई — मुंबईत आली. थकलेला चेहरा, पण प्रेमानं भरलेलं मन.

“अगं बाळा, किती दिवसांनी भेटतेय तुला! आणि हे पाहा... तुमचं घर किती छान केलंयस.”

संदीप हसून नमस्कार करून गेला आत. ना काही विचारपूस, ना विशेष स्वागत.

राधा थोडी गप्प बसली. “संदीपला आज थकवा वाटतोय बहुतेक,” तिनं मनात म्हटलं.


संध्याकाळी जेवणाच्या वेळी कमलाबाईने विचारलं,
“बाळा, तुमचं ऑफिस कसं चाललंय?”

संदीप फक्त म्हणाला, “ठीक आहे.”

मग सगळं शांत. फक्त भांडी वाजायचा आवाज आणि टीव्हीचा मंद सूर.
कमलाबाईला थोडी हुरहूर वाटली — जावयाने दोन शब्दही बोलले नाहीत, ही कसली औपचारिकता?



सकाळी ऑफिसला जाण्याआधी संदीपने टोमणा मारला—
“तुझी आई किती दिवस राहणार इथे?”

राधा थोडी दचकली, “अरे, ती तब्येतीसाठी आलीये. दोन-तीन दिवस तपासणी होतील.”

“हो पण ती आली की तू मला विसरतेस. सकाळपासून तिच्याच भोवती. मला वेळच नाही तुझ्याकडे.”

हे बोलून संदीप दरवाजा आपटून ऑफिसला निघून गेला.

कमलाबाई स्वयंपाकघरात उभी होती. सगळं तिनं ऐकलं होतं. डोळ्यांत पाणी आलं.
राधा मात्र गप्पच. तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते.


कमलाबाईने सकाळीच मुलीला म्हटलं—
“बाळा, मी उद्या निघते. डॉक्टरांकडून रिपोर्ट आजच घेण्यासाठी प्रयत्न करते .”

“आई, पण अजून तपासणी पूर्ण नाही झाली!”
“नाही ग, आता राहून काही अर्थ नाही. तू आणि संदीप नीट राहा. मला काही लागलं तर मी गावातच डॉक्टरकडे जाईन.”

कमलाबाईने लॅबमध्ये फोन करून सांगितलं, “माझा रिपोर्ट आजच द्या, थोडं तातडीचं आहे.”

संध्याकाळी त्या दोघी डॉक्टरकडे गेल्या. डॉक्टर म्हणाले—
“अतिशय किरकोळ त्रास आहे. काही औषधं घेतली की ठीक होईल.”

कमलाबाईने समाधानाने मान हलवली, पण मनात काहीतरी तुटल्यासारखं वाटत होतं.

घरी परतल्यावर तिनं राधाला म्हटलं—
“बाळा, माझं तिकीट काढून ठेव उद्यासाठी. आता इथं थांबण्यात अर्थ नाही.”

राधा काही बोलू शकली नाही. ती रात्रीभर उशीवर डोळे पुसत होती.



कमलाबाई गावाकडे निघून गेली. निघताना म्हणाली—
“बाळा, संसारात सगळं समजूतदारपणाने चालवलं पाहिजे. कुणी कुणाला दोष देऊन काही मिळत नाही. देव तुझं भलं करो.”

संदीप ऑफिसला गेला होता . घरी परतल्यावर विचारलं,
“कुठे गेली तुझी आई?”

राधा शांतपणे म्हणाली—
“घरी. तुझ्या बोलण्यामुळे.”

संदीप चकित झाला,
“माझ्या बोलण्यामुळे? मी असं काय बोललो?”

राधा डोळ्यात पाणी आणत म्हणाली,
“जे बोलत होतास तेच... ‘ती आली की तू मला विसरतेस, अजून किती दिवस राहणार?’
तुला वाटतं तुझ्या त्या शब्दांनी काही फरक पडत नाही का? आईचं मन काचेसारखं असतं, संदीप.
ती बाहेरून मजबूत दिसते, पण आतून किती कोमल असते हे फक्त मुलीलाच कळतं.”

संदीप गप्प बसला. अपराधी भाव चेहऱ्यावर होते.

राधा पुढे म्हणाली—
“मी सासरी असताना सासू, नणंद यांना खुश ठेवण्यासाठी किती वेळा मन दडपलं.कारण मला वाटायचं ते माझे आपले आहे.
आई म्हणायची — ‘बाळा, संसार टिकवायचा असेल तर थोडं सहन करावं लागतं.’
"पण हे तू कधीच करू शकला नाही माझ्यासाठी."
मीं गप्प राहिले, आईला समजावलं की तू थकला आहेस.
पण ती गेल्यावर मला कळलं — मी स्वतःलाच गमावतेय.
आता मला कोणाकडून अपेक्षा नाहीत संदीप.
तू पण माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नकोस.”

राधाचे शब्द खोलीत शांततेसारखे पडले.

संदीप उठला, तिच्याजवळ आला आणि म्हणाला—
“राधा, मला माफ कर. मी चुकलो. मला कळलंच नाही की माझ्या बोलण्याने इतकं दुख होऊ शकतं.
मी फक्त माझ्या दृष्टीने बघत होतो — पण तू दोन्ही बाजूंनी विचार करत होतीस.”

राधा म्हणाली,
“संदीप, संसार म्हणजे फक्त दोन लोकांचं एकत्र राहणं नाही, तर दोघांच्या भावना समजून घेणं.
अपेक्षा वाढल्या की प्रेम कमी होतं.”

संदीपने तिचा हात धरला,
“मी वचन देतो राधा, पुढच्या वेळी तुझी आई आली तर तिच्या तब्येतीची काळजी मी घेईन.
आणि हो, तिचं तिकीट तू नाही — मी काढेन.”

राधाच्या चेहऱ्यावर हळूहळू स्मित उमटलं.

त्या रात्री पहिल्यांदा संदीपने चहा बनवला आणि म्हणाला,
“आज मी चहा देतो तुला. कारण आता मला कळलं — प्रेम म्हणजे शब्द नव्हे, समजूत आहे.”


कधी कधी नात्यात ‘अपेक्षांचं ओझं’ इतकं वाढतं की प्रेमच दबून जातं.म्हणून प्रेमाला महत्व देणं खूप गरजेचं आहे.
0