अपेक्षांचे ओझे भाग १
©® आरती पाटील - घाडीगावकर
जलद लेखन स्पर्धा
" मी हे घर सोडून जातेय कायमची. " हॉल मध्ये बसलेले सर्वजण प्रांजल कडे बघतच राहिले. प्रांजलच्या एका हातात बॅग आणि दुसऱ्या हातात आठ महिन्यांची रिया होती. प्रांजल दरवाजा उघडून बाहेर जाऊ लागताच रितेश प्रांजल चा नवरा गोंधळून म्हणतो, " प्रांजल तू काय बोलतेयस आणि काय वागतेयस कळतंय का तूला ? "
प्रांजल बाहेर जात म्हणते, "हो चांगलंच कळतंय मला मी काय करतेय ते. आणि लवकरच तूला डिवोर्स ची नोटीस पण येईल. त्यावर फक्त लवकरात लवकर सह्या कर म्हणजे झालं. " एवढं बोलून प्रांजल निघून सुद्धा गेली.
हॉल मध्ये रितेश त्याचे आई - वडील आणि बहीण जान्हवी नाष्टाची वाट बघत बसले होते. आणि प्रांजल अशी तडका फडकी निघून गेली. सर्वजण फक्त पाहत राहिले.
प्रांजल आणि रितेश दोघेही आय. टी इंजिनीयर. दोघांचे पगार देखील मोठेच होते. मध्यस्थी तर्फे विचारपूस करून लग्न झालं होतं. रितेश ची बहीण जान्हवी एम. बी. ए. करत होती. तर वडील नुकतेच निवृत झाले होते. प्रांजलच्या अश्या वागण्याची कोणीच कल्पना केली नव्हती.
प्रांजलच्या वागण्याचा सर्वांनाच राग आला होता. रितेशच्या आईने बडबड करायला सुरुवात केली, " तरीच एवढी शिकलेली मुलगी नको म्हणत होते मी. पण तूला तुझ्या एवढी शिकलेली हवी होती ना ? झालं गेली ना ती. तिच्या जागी कमी शिकलेली असती तर कधीच सासर असं सोडून गेली नसती. " आईच बोलणं ऐकून रितेश ला अजूनच राग येत होता. " प्रांजल मी तूला सोडणार नाही. " रितेश अजूनही रागात होता.
प्रांजल गेल्यावर कोणीही ती कुठे गेली याची चौकशी केली नव्हती. १५ दिवसांनी डिवोर्स नोटीस घरी आली. रितेश ला अजूनही खरं वाटत नव्हतं की प्रांजल असं काही करेल. रितेश मधला पुरुष दुखावला गेला. त्याने तडक प्रांजलच्या वडिलांना फोन केला.
रितेश, " बाबा, तुमच्या मुलीला एक अक्कल नाही. किमान तुम्ही तरी तिला समजवायचं होतं. एक तर १५ दिवसांपूर्वी घर सोडून गेली वर डिवोर्स नोटीस पाठवली मला. पण काहीही झालं तरी मी इतक्या सहज डिवोर्स देणार नाही. नाही ना तिला सळो की पळो करून सोडलं तर नाव रितेश सांगणार नाही. " रितेश एका दमात सर्व बोलून गेला.
प्रांजल वडील घाबरून म्हणतात, " काय बोलताय तुम्ही जावई ? प्रांजल नाही आली माझ्याकडे ? नक्की कुठे आहे ती ? आणि ती गेली तेव्हा का नाही मला कळवलत ? "
प्रांजलच्या वडिलांच बोलणं ऐकून रितेश ला टेन्शन येत. तो विचारतो, " म्हणजे प्रांजल तुमच्या कडे नाही आली?
प्रांजलचे वडील काळजीने म्हणतात, " नाही, आता तुम्ही सांगताय तेव्हा मला कळलं. "
रितेश तरीही रागात होता. रितेश म्हणाला, " मला नोटीस आलीये म्हणजे जिथे असेल मज्जेतच असेल. एक लक्षात ठेवा काहीही झालं तरी इतक्या सहज मी तिला सोडणार नाही. " असं बोलून रितेश ने फोन बंद केला.
क्रमश :
( प्रांजल च्या वागण्यामागे काय कारण असेल ? रितेश डिवोर्स पेपर्स वर सही करेल का ? प्रांजल कुठे आहे? पाहुयात पुढील भागात. )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा