Login

अपेक्षांचे ओझे    भाग ३

-



अपेक्षांचे ओझे    भाग ३


©® आरती पाटील - घाडीगावकर

जलद लेखन स्पर्धा



२ दिवशी दिलेल्या वेळेत रितेशच्या घरी मध्यस्ती असलेले नातेवाईक, प्रांजल, प्रांजलचे आई- वडील, आणि प्रांजल आले. मध्यस्तीनी बोलायला सुरुवात केली.

मध्यस्ती, " सर्व प्रकार सुरुवातीपासून सांगा म्हणजे नक्की प्रॉब्लेम काय ते स्पष्ट होईल. "

रितेशची आई तवातवाने म्हणाल्या, " प्रॉब्लेम हिचाच आहे. त्या दिवशी अचानक बॅग भरून निघाली आणि निघताना एवढची म्हणाली की कायमची घर सोडून जातेय. काय आवदसा आठवली आणि हिला सुन करून घेतली. त्यापेक्षा कमी शिकलेली असती तर आज ही वेळ आली नसती. "

मध्यस्ती, " रमा ताई, बोलून प्रश्न सोडवायला बसलोय ना आपण ? अश्या भाषेत बोलू नका. "

रमाताई, " हिने आमची इज्जत रस्त्यावर आणली आणि तरी शांत बसू का मी ? "

मध्यस्ती रितेश कडे पाहत म्हणतात, " रितेश असं असेल तर पुढे बोलणं कसं होईल ? "

हे ऐकून रितेश रमाबाईंना शांत राहण्यास सांगतो.

मध्यस्ती पुन्हा विषयाकडे वळत प्रांजल कडे पाहत विचार विचारतात, " प्रांजल, तू घर सोडून जाण्याचा एवढा मोठा निर्णय का घेतलास ? याच कारण कळल्याशिवाय पुढे बोलता येणार नाही. तेव्हा जे असेल ते स्पष्टपणे बोल. "

प्रांजल बोलायला सुरुवात करते, " हल्ली फ्याड आलंय, लग्न ठरवताना मुलींच्या आणि तिच्या आई- वडिलांच्या फाजील अपेक्षा असतात म्हणून. घर असलेला,  शिकलेला आणि आपल्यापेक्षा जास्त कमवता नवरा हवा, सासू - सासरे नकोत म्हणून मुलींची लग्ने होतं नाहीत. वगैरे वगैरे.

पण मी असल्या कोणत्याही अपेक्षा केल्या नाहीत. लग्न ठरलं तेव्हा रितेशचं स्वतःच घर सुद्धा नव्हतं. पगार माझ्यापेक्षा कमी आणि घरी आई- वडील, बहीण सर्वच. मी कधीच म्हणाले नाही की सासरचे लोक मला नकोत म्हणून. बरोबर बोलतेय ना मी रितेश ? " प्रांजल रितेश कडे पाहत म्हणाली.

रितेशने होकारार्थी मान डोलावली. आणि प्रांजल पुढे बोलू लागली, " लग्न होऊन आले, सासूबाईनी कधीच समजून घेतलं नाही. कारण त्यांना त्यांच्या मुलापेक्षा कमी शिकलेली मुलगी सुन म्हणून हवी होती. ही त्यांची अपेक्षा होती. रितेशची अपेक्षा होती मी त्याच्यासोबत मिळून कमवाव आणि खर्च करावा. तेही आई म्हणते त्यानुसार घरच सर्व सांभाळून.


क्रमश:

( नक्की काय कारण असेल प्रांजलच्या वागण्यामागच ? पाहुयात पुढील भागात .)


0

🎭 Series Post

View all