Login

आपले विचार मुलांवर लादू नका...

आपले विचार मुलांवर लादू नका
आपले विचार मुलांवर लादू नका...
चॅम्पियन ट्रॉफी...2025
ऋतुजा वैरागडकर

अनिकेत समायरा सुखी जोडपं.
अनिकेत बिझनेसमन होता तर समायरा गृहिणी होती.
त्यांचा एकुलता एक मुलगा अंकुश, हा अभ्यासात खूप हुशार होता. लहानपणापासून तो खूप क्रिएटिव्ह होता. समायरा शिकलेली होती आणि लग्नाआधी नोकरी करायची. लग्नानंतर मात्र तिच्यावर निर्बंध आले.

"अनिकेत, आता आपल्या लग्नाला एक महिना झाला. मी विचार करत होते की, जॉब जॉईन करावा."

"समायरा, काय गरज त्याची? आपले एवढे बिझनेस आहेत. हातात पैसा खेळता असतो. सगळं व्यवस्थित सुरू आहे, मग तुला का दगदग करायची आहे?"

"पण अनिकेत, मी लग्नाआधी जॉब करायचे ना, मग आता काय प्रॉब्लेम आहे? मी जर असं चूल आणि मूल करत बसले, तर काय अर्थ उरेल माझ्या शिक्षणाचा? मला स्वतःसाठी जॉब करायचा आहे. मला आयुष्यभर असचं रहायचं नाही."

अनिकेतने समायराला जवळ घेतलं.

"समू.. तुझं जॉब करणं आई- बाबांना आवडणार नाही. एक काम कर, काही दिवस आराम कर. मग आपण बघू तुझ्या जॉबचं, वर्क फ्रॉम होम वगैरे."

"अरे पण अनी..." ती बोलता बोलता शांत झाली.

'आता बोलून उपयोग नाही.' हे तिला कळून चुकलं होतं.

दिवस छान आनंदात जात होते. समायराने सगळ्यांशी छान जुळवून घेतलं होतं. ती आनंदात होती, पण ती काहीच करत नाही; हेच तिच्या डोक्यात फिरत असायचं. त्यामुळे अधून-मधून ती उदास व्हायची.

काही महिन्यांनी समायराला दिवस गेले. अनिकेत तिची खूप काळजी घ्यायला लागला. बिझनेस सांभाळत असताना देखील त्याने कधी समायराकडे दुर्लक्ष केलं नव्हतं. तिला फिरायला घेऊन जायचा. तिचे डोहाळे पुरवायचा. तिला हवं नको, ते सगळं बघायचा.

दिवस सरकत गेले आणि बघता बघता नऊ महिने पूर्ण झाले.

समायराने एका गोंडस मुलाला जन्म दिला.

अंकुश दिसायला देखणा, गोरा आणि अगदी हीरो सारखा दिसत होता.

सासू-सासरे खूप आनंदात होते. घरात मुलगा आला, म्हणून देवीचं दर्शन करायला गेले आणि तिथेच त्यांचा घात झाला. त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अपघात इतका मोठा होता की, दोघांनीही जागेवर प्राण सोडले.

अनिकेत डिस्टर्ब झाला, आतून खचला, पण समायराने त्याला हिंमत दिली, त्याचं मनोबल वाढवंल.
"अनी, इतका त्रास करून घेऊ नको. मी आहे तुझ्यासोबत, मी मदत करेल तुला."

"समू, अंकुश अजून लहान आहे. त्याच्याकडे पण लक्ष द्यावे लागेल ना."

"तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल."

समायरा आता घरूनच त्याला ऑफिसच्या कामामध्ये मदत करू लागली.

समायराचा वेळ खूप छान जाऊ लागला. काम आवरून दिवसभर अंकुशच्या मागे मागे करत असायची.
त्याचा एक एक दिवस छान जावा, म्हणून तिचे सगळे प्रयत्न सुरू असायचे.

अनिकेत दिवसभर त्याच्या कामात व्यस्त असायचा. समायरा आता अंकुश आणि वर्क फ्रॉम होम यामध्ये खूप व्यस्त झाली होती.


दिवस छान जात होते.

अंकुश हळू हळू मोठा झाला. त्याचं स्कूल, त्याचा अभ्यास सगळं समायरा बघायची. अंकुश अभ्यासात खूप हुशार होता.  त्याव्यतिरिक्त त्याला पेंटिंग, ट्रेकिंग आणि बास्केटबॉल हे आवडायचं.

बघता बघता अंकुश बारावी फर्स्ट क्लासमध्ये पास झाला. त्यानंतरच्या सगळ्या परीक्षा तो उत्तमरीत्या पास झाला.

आता त्याच्या अ‍ॅडमिशनसाठी धावपळ सुरू झाली. त्याला बी.बी.ए करायचं होतं. त्यानंतर एम.बी.ए करून अनिकेतचा बिझनेस जॉईन करायचा होता.

त्याला बिझनेसमध्ये इंट्रेस्ट होता, पण अनिकेतला त्याला डॉक्टर बनवायचं होतं.

"बाबा, मला तुमच्यासारखं व्हायचं आहे. मला डॉक्टर व्हायचं नाही आहे. बाबा मला त्यात आवड नाही आहे. मी ह्या सगळ्या परीक्षा तुमच्या इच्छेखातर दिल्या. मला यात कधीच रस नव्हता बाबा.
बाबा, मला मोठा बिझनेसमन व्हायचं आहे. स्वतःचे प्लॅन्ट ओपन करायचे आहेत. मोठ-मोठ्या फॅक्टरी उघडायच्या आहेत."

अनिकेत ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. अंकुश समायराजवळ गेला.

"आई, तू बोल ना बाबांशी. तुला तर माहीत आहेत ना, माझी स्वप्नं. तू बोल ना बाबांशी."

"तू जा तुझ्या खोलीत, मी बोलते तुझ्या बाबांशी."

तिने त्याला धीर देऊन खोलीत पाठवलं.

समायरा त्याच्या बाजूला जाऊन बसली. त्याचा हात हातात घेतला.

"अनिकेत, होऊ दे ना त्याच्या मनासारखं. काय फरक पडेल?"

"फरक पडेल समू.. कसा फरक पडणार नाही, तू सांग. त्या श्रीवास्तवचा मुलगा रशियाला गेला एमबीबीएसचं शिक्षण घ्यायला. तो पवार... काय लायकी त्याची, त्याचा मुलगा इंजिनिअरिंग करतोय."

"अनी...प्लीज...काय सुरू आहे तुझं? तू का इतरांशी तुलना करतोय. हे बघ, आपल्याला आपल्या मुलाच्या भविष्याचा विचार करायचा आहे, इतरांची मुले काय करतात ते जाऊ दे. तू अंकुशचा विचार कर ना. त्याला ज्यात आवड आहे, ते जर आपण त्याला करू दिले तर त्याची आणखी प्रगती होईल. "

"मला कुणाचंही काहीही ऐकायचं नाहीये." अनिकेत मनात राग धरून घरून निघून गेला.

रात्रभर सगळे टेन्शनमध्ये होते.

दुसर्‍या दिवशी अनिकेतने फर्मान सोडलं. अ‍ॅडमिशन घ्यायची असेल तर मेडिकल कॉलेजमध्येच.

फॉर्म भरणे सुरू झालं, डेट चेक करून राऊंडवर जाणे-येणे सुरू झालं.


एक महिना यातच गेला.

एका महिन्यानंतर दूरच्या शहरात त्याचा मेडिकलला नंबर लागला.
अंकुश इच्छा नसताना सुद्धा होस्टेलला गेला.
नवीन कॉलेज, नवीन जागा आणि नवीन मित्र. अंकुश जरा नर्व्हस रहायला लागला. अभ्यासात मागे पडला. फर्स्ट टर्मला फेल झाला.
अनिकेतला कॉलेजमध्ये बोलावण्यात आलं.

"मिस्टर अनिकेत, अंकुश खूप हुशार मुलगा आहे; पण इतक्यात त्याचं क्लासमध्ये लक्ष नसतं. एकटा एकटा रहायला लागला आहे. कुणाशी बोलत नाही. रूमवर पण एकटाच एकांतात बसलेला असतो. त्याला काही प्रॉब्लेम आहे का, ते तुम्ही त्याच्याशी बोलून बघा."

अनिकेत आणि समायरा दोघेही अंकुशशी बोलले, पण तो काहीही बोलायला तयार नव्हता. हताश होऊन दोघेही घरी गेले.

अंकुशही रात्री होस्टेलमधून बाहेर पडला.


सकाळी त्याचा मृतदेह रेल्वे क्रॉसिंगवर सापडला. खिशात एक लिहिलेली नोट होती.

"आई-बाबा, मला आता इथे रहायचं नाही आहे, इथेच काय मला कुठेच रहायचं नाही आहे. मला इथे खूप त्रास होतो. मला हे शिक्षण नको होतं, तरीही मी इथे आलो. येथील शिक्षण, येथील विद्यार्थी काहीही नकोय मला. रॅगिंगच्या नावाखाली मुलांचा छळ केला जातो. मला मानसिक त्रास होतोय आणि म्हणुनच मी माझं जीवन संपवतोय. यासाठी कुणालाही जबाबदार ठरवू नये. माझं आयुष्य आहे, काय करायचं ते मी ठरवणार. मी हे जग सोडून जातोय, पण जाण्याआधी सगळ्या पालकांना एक नक्की सांगेन.
तुम्ही तुमचे विचार, तुमचं मत तुमच्या मुलांवर लादू नका. त्यांचं आयुष्य आहे, कधी कधी निर्णय त्यांनाही घेऊ द्या. ह्म्म चुकत असतील तर त्यांना प्रेमाने समजावून सांगा."

नोट वाचून समायराने हंबरडा फोडला.
एकुलता एक मुलगा गमावला होता तिने.

समाप्त.
0