Login

आपल्याकडे असं नाही चालत- भाग 1

शहरात राहणारी वृंदा आपल्या सासरच्या गावी जाताच बरोबरच्या जावांनी तिला अपमानित केलं
"तिच्याकडे बघ ना, कशी साडी नेसलीये तिने..अशी झकपक साडी नेसून येतं का कुणी? आणि ब्लाउज तर बघ, स्लीवलेस का काय म्हणतात ते घातलंय.."

सासरी आपल्या गावी गेल्यावर वृंदाच्या कानावर हे शब्द पडले. तिच्या जावा, चुलत जावा आपापसात कुजबुजत होत्या. तिला ऐकू जाईल अश्या मुद्दाम मोठ्या आवाजात बोलत होत्या.

वृंदा ओशाळली, तिच्या शांत राहण्याचा फायदा घेऊन एक आगाऊ बाई पुढे आली आणि म्हणाली,

"अगं गावाकडे येताना असं नाही घालायचं, इथे सगळी लोकं नावं ठेवतात..तिकडे शहरात चालत असेल, इथे नाही चालत.."

वृंदाला कसंतरी झालं, ती कसं समजावणार यांना? की एका मोठ्या लग्नासाठी जायला म्हणून ती नवऱ्यासोबत गेलेली आणि गाव जवळच असल्याने गावी जायचं अचानक ठरलं म्हणून. तरी वृंदाला धाकधूक होतीच, तिने पूर्ण पदर खांद्यावरून टाकून पुढे घेतला होता जेणेकरून तिची ज्वेलरी आणि ब्लाउज डिझाइन दिसणार नाही. तरी बायकांना जे बघायचं ते त्यांनी बघितलंच.

वृंदा, तिचा नवरा आणि सासू सासरे असे सर्वजण शहरात राहत होते. सासू सासरे गाव सोडून बरीच वर्षे झाली असल्याने त्यांचं राहणीमान आधुनिक होतं. सासूबाईसुद्धा गावी सर्वांच्या या स्वभावामुळे यायचं टाळत, पण वृंदाच्या नवऱ्याला गावाकडचा ओढा असल्याने त्याचा गावी यायचा हट्ट कायम असे.

सर्वांच्या पाया पडून वृंदा आणि तिचा नवरा निघाले. गाडीत बसताना वृंदाच्या जावा तिरकस नजरेने बघत होत्या, तिला चारचाकीचं सुख मिळालं याचा आनंद तर नाहीच, स्वतःच्या नशिबाला कोसण्यापेक्षा वृंदाच्या कमतरता काढायच्या आणि मनाची समजूत घालायची हेच ते करत असत. वृंदाच्या मौन बाळगण्याचा जास्तच फायदा करून त्यांनी तिला नको नको करून सोडलं होतं.

सर्वांचा निरोप घेऊन दोघे घरी जायला निघाले,

वृंदाचा नवरा खुश होता. जाताना वृंदाला म्हणाला,

"बघ, गावाकडची माणसं किती आपुलकीने बोलावतात, प्रेम देतात..मला इथे यायला फार आवडतं.."

आता नवऱ्याला कसं सांगणार, की माणसांमध्ये काही नसलं तरी आत बायकांमध्ये काय हेवेदावे चालतात ते!

खरी परिस्थिती अशी होती की,
जावात एकटी वृंदा शिकलेली होती, चांगल्या नोकरीवर होती आणि शहरात होती. त्यामुळे इतर जावांना कायम तिचा हेवा वाटायचा. हा हेवा आणि ईर्षा इतकं टोकाला जायचं की वृंदाचं खच्चीकरण करायची एकही संधी त्या सोडायच्या नाहीत.

वृंदा घरी गेली, तिचा पडलेला चेहरा बघत सासूबाईंना अंदाज आलाच. त्यांनी तिला विचारलं तेव्हा तिने घडलेलं सगळं खरं खरं सांगितलं,

"मला वाटलंच असं काहीतरी होणार, मीही तिकडे जायचे तेव्हा मलाही अशीच वागणूक द्यायच्या.."

सासूबाईंनाही आपल्या सुनेला दिलेल्या वागणुकीचा राग आला, पण त्यांनी आता वृंदाच्या जावांना धडा शिकवायचा ठरवला.

पुढच्याच महिन्यात वृंदाचा वाढदिवस होता, सासूबाईंनी सर्व नातेवाईकांना आणि मित्र मैत्रिणींना आमंत्रण दिले.
क्रमशः
0

🎭 Series Post

View all