आपल्याला काय कमी आहे?©®विवेक चंद्रकांत....(पूर्वार्ध )
"माधवी?" राजेश आत येत म्हणाला " दिलीप आणि पल्लवी येतायेत पुढच्या आठवड्यात. 2-3 दिवसासाठी. "
माधवीने तोंड वाकडे केले.
"इतके काही तोंड वाकडे करायचे जरुरी नाही माधवी. शेवटी माझा लहान भाऊ आहे तो. आणि 2-3 दिवसाचा प्रश्न आहे."
"अरे मी काय नाही म्हणते का राहायला?
आठ दिवस राहिले तरी चालेल. मी अगदी व्यवस्थित पाहुणचार करेन. पण पल्लवी सारखी तुलना करते ना ते नाही आवडत मला. सारखे सारखे तुमचं काय बुवा मोठे लोक, भाऊंजीचा लठ्ठ पगार, मोठा फ्लॅट, सगळ्या गोष्टी, आमच्या नशिबात कुठले बाई? यांच्या पगारात जेमतेम भागवतो. असे म्हणते ना की अगदी संताप होतो."
आठ दिवस राहिले तरी चालेल. मी अगदी व्यवस्थित पाहुणचार करेन. पण पल्लवी सारखी तुलना करते ना ते नाही आवडत मला. सारखे सारखे तुमचं काय बुवा मोठे लोक, भाऊंजीचा लठ्ठ पगार, मोठा फ्लॅट, सगळ्या गोष्टी, आमच्या नशिबात कुठले बाई? यांच्या पगारात जेमतेम भागवतो. असे म्हणते ना की अगदी संताप होतो."
"अग पण एका कानाने ऐकायचे आणि एका कानाने सोडून द्यायचे."
"किती दुर्लक्ष करू.? प्रत्येक गोष्टीतच तिचे रडगाणे असते. नवीन साडी बघितली तरी तेच, नवीन फ्रिज, बघितला तरी तेच. तुमचे काय बुवा मोठे काम, आमच्या नशिबात तोच जूना फ्रिज आहे दहा वर्षांपासून असे बोलणे.जणू काही त्यांच्या या स्थितीला आपणच जबाबदार आहे असे वाटते."
"तू कशाला मनाला लावून घेते.?"
"तिचा टोनच तसा असतो. बरे तुम्ही इतके कमावता त्यापाठीमागचे कष्ट दिसत नाही त्यांना? तुम्ही स्वतःच्या बळावर शिकले. हुशारीने पुढे पुढे गेले. आज मोठया हुद्द्यावर आहेत ते काही न करता? नवीन लग्न करून आलो तेव्हा भाड्याच्या घरात राहत होतो छोट्याश्या... हे पल्लवीने नसेल पाहिले पण दिलीपने तर पाहिलंय ना?"
"जाऊ दे. काही मदत मागितली तर देऊन टाकू."
"ती तर देतातच तुम्ही. तरीही त्यांचे रडगाणं संपतच नाही. आता ही मदत ते स्वतःच हक्क समजतात."
"अगपण आपल्याला काही कमी आहे का? 2-3 दिवसांसाठी कशाला इतका मनस्ताप करून घेते तू?"
"अहो, तुम्हाला काय माहित? ती दोघे येणार म्हणून मला सगळ्या गोष्टी लपवाव्या लागतात. दागदागीने लपवून ठेवावे लागतात. अगदी साध्या बांगडया आणि मंगळसूत्र घालावे लागते. काही शोभेच्या महागड्या वस्तू कपाटात ठेवाव्या लागतात. आपण नवीन फ्लॅट घेतला ते तर मी सांगितलेच नाही.पण काय काय लपवणार? नवीन फ्रिज, कार, घराचे नवीन furniture, पडदे, हे कुठे लपवणार? बरे हे सगळे आपल्या मेहनतीच्या पैशावर... तरीही त्यांचे डोळेच असे सांगतात की आपल्याला काही वरची कमाईच आहे. बरे दिलीपला तुम्ही किती समजावले, तू माझ्याकडे ये, मी तुला कुठेतरी लावून देतो,पण आलेच नाही."
"सोड ते तू. मी तुला फक्त सांगितले तर तू किती दळण दळले. त्यांनी म्हातारपणी आई अप्पांची सेवा केली ना?"
" आपण नाही म्हणालो होतो का? उलट आपण शहरात उत्तम उत्तम डॉक्टरांना दाखवणार होतो.पण अप्पा आईंनी शहरातले वातावरण मानवत नाही म्हणून यायला नकार दिला. आपली काय चूक? "
"चहा ठेव माझा आणि तू गुलकंद टाकून दूध घे म्हणजे डोके शांत होईल."
"तुम्ही शांत राहतात म्हणून जास्त संताप होतो. त्याला एकदा खडसून सांगायचे की मी किती मेहनत केली. मलाही जबाबदाऱ्या होत्या तरीही मी आई अप्पांना पैसे पाठवायचो. त्यांना फक्त तुमची श्रीमंती दिसते."
"तू चहा ठेवते की मी ठेवू?"
*******
©®डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार (पूर्वार्ध समाप्त )
©®डॉ. विवेक चंद्रकांत वैद्य. नंदुरबार (पूर्वार्ध समाप्त )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा