Login

अपमान भाग ३ जलद कथालेखन स्पर्धा

एक सामाजिक कथा


अपमान भाग३
मागील भागावरून पुढे…


सावित्री सावंत साहेबांच्या केबीन मध्ये बसली होती. सावंत आत आले तसं तीने विचारलं,

”अशोकनी गुन्हा कबुल केला?"

सावंत म्हणाले,

”कसा कबुल करणार नाह्री? चार लाठ्या पडल्यावर पोपटासारखा बोलायला लागला. सावित्रीबाई तुमच्यासारखी व्यक्ती मी आजपर्यंत बघितली नाही.आपल्या मुलांनी गुन्हा केल्यावर त्याला वाचवण्याची धडपड सगळे आई-वडील करतात. तुम्ही स्वत:हून या गुन्ह्याची आम्हाला माहिती दिलीत आणि आता तुमच्याच डोळ्यात पाणी?”

सावित्री धीर गोळा करून म्हणाली,

"साहेब कसाही असला तरी तो माझा मुलगा आहे त्यामुळे त्याच्या काळजीने एका डोळ्यात पाणी आहे तर दुस-या डोळ्यात कुकर्माला लपवून ठेवण्याचा गुन्हा आपण केला नाही याचं समाधान आहे. समाधानाचे ते अश्रू आहेत. साहेब मला त्या चौघांशी बोलायचं आहे.” सावित्री सावंतना म्हणाली.


“त्याचे बाकी मित्र पकडल्या गेले की तुम्हाला बोलावीन” इन्स्पेक्टर सावंत म्हणाले.

सावंतांनी असं म्हणताच सावित्री बरं म्हणून खुर्चीवरून उठली.उठताना आपल्या अंगातील त्राण गेलय असं तिला वाटत होतं.

*****

आज ठरलेल्या ठिकाणी मन्या,सत्तू,देवेश आले होते.

"अजून अशोक का आला नाह्री?” या सत्तूच्या त्याच्या वाक्यावर देवेश खो-खो हसला म्हणाला,

”दुपारची फिल्म बघून अजूनही मनातच उंडारत असेल”

त्यावर सगळे हसायला लागले,तेवढ्यात त्यांना अशोक येतांना दिसला. त्याच्याबरोबर साध्या वेषातील पोलीसही होते पण हे त्या तिघांच्या ते लक्षात आलं नाही. अशोकाला ते बोलण्याचा आग्रह करत होते.

तो घाबरत बोलू लागला. त्या तीघांच त्याच्याकडे लक्ष गेल्याबरोबर पोलिसांनी त्यांनां पकडलं. आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला पकडण्यासाठी हा सापळा रचला होता. मन्या अशोकवर खूप चिडला.

" अशोक तू हे चांगलं नाही केलं.बघून घेईन तुला."
मन्याला अशोकने काही उत्तर दिलं नाही
पण पोलिसांनी त्यांच्या थोबाडीत मारून उत्तर दिलं आणि गाडीत बसवलं.

पोलीस ठाण्यात त्यांची चांगलीच धूळधाण केल्या गेली. इतका मार खायची सवय नसलेलं ते पटापट पोपटासारखे बोलायला लागले.त्यांचं बोलणं ऐकतांना पोलिसांच्या अंगावर काटा आला.

शेवटी तीही माणसंच होती. दिवसातून शंभर गुन्हे बघतात म्हणून सामान्य माणसापेक्षा थोडे टणक असतात इतकंच.

”बोलवा त्यांना’"
सावंत म्हणाले.शिंदे बाहेर गेले आता त्यांच्याबरोबर सावित्री होती तिला बघीतल्यावर चौघांनाही आश्चर्य वाटलं.

”आई...!"अशोकच्या आणि त्यांच्या मित्रांच्या चेह-यावर आश्चर्य होतं.

“हो तुझ्या आईनीच आम्हाला तुमच्या कृत्याची माहिती दिली.”
सावंत म्हणाले.

चौघांनीही मान खाली घातली.कोणाला कळायच्या आत सावित्री तरातरा गेली आणि तिने चौघांच्या थोबाडीत मारली.

”अरे तुम्हाला लाज नाही वाटली असं घाणेरड काम करतांना? अरे तुम्ही त्या मुलीवर बलात्कार केलेला नाही तुम्ही आपापल्या आयांवर बलात्कार केलाय, तिने केलेल्या संस्कारांवर बलात्कार केलाय, तिच्या मातृत्वावर बलात्कार केलाय. चांडाळानो ती मुलगी पुढे कोणाची तरी आई होणार आहे याचही तुम्हाला भान राहिलं नाही? तुमची वासना मोठी ठरली. अरे...तुमच्यासारख्या नराधमांना भर चौकात फटके मारून फाशी द्यायला पाहिजे.”

थरथरत्या अंगानी सावित्री सावंतांकडे वळली.हात जोडून म्हणाली,

”साहेब सरकारला माझ्याकडून विनंती करा ज्या अवयावामुळे यांना हे कृत्य करायची इच्छा झाली,ज्या अवयवामुळे ते लींगपिसाट झाले ते लिंगच छाटून टाका. अशी शिक्षा झाल्या शिवाय असं कृत्य करणा-यांना वाचक बसणार नाही. नाही. साहेब हा गुन्हेगार माझा मुलगा नाही. ज्या दिवशी याच्या मनात हे काम करण्याचं आलं त्याच दिवशी तो मला मेला. हा गुन्हेगार आहे याला कठोर शिक्षा द्या.”हात जोडून रडत सावित्री बाहेर पडली.
___________________________
क्रमशः सावित्रीच्या बोलण्याने सावंत विचारात पडले.
बघू पुढे काय होईल….

🎭 Series Post

View all