Login

दिसणं आणि जगणं

प्रेम म्हणजे फक्त चांगल्या वागण्यावर खुश होणं नाही. प्रेम म्हणजे समोरच्या माणसाचं जगणं समजून घेणं. तो रागावतो तेव्हा त्यामागचं कारण ओळखणं, तो गप्प राहतो तेव्हा त्याची शांतता समजून घेणं, आणि तो थकलेला असताना त्याला आधार देणं, हेच खरं प्रेम आहे.
“दिसणं आणि जगणं” लेखक सुनिल जाधव पुणे

प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात. एक चेहरा तो जगासमोर दाखवतो आणि दुसरा चेहरा तो स्वतःसोबत जगतो. जो चेहरा दिसतो तो वागणारा असतो. जो चेहरा दिसत नाही तो जगणारा असतो. वागणारा चेहरा सगळ्यांना लगेच समजतो, पण जगणारा चेहरा समजून घ्यायला मनाने डोकावावं लागतं.

माणूस रोज वेगवेगळ्या भूमिका निभावतो. कधी जबाबदार माणूस म्हणून, कधी आनंदी व्यक्ती म्हणून, तर कधी मजबूत असल्याचा आव आणून. हे सगळं वागणं असतं. परिस्थिती शिकवते की कसं बोलायचं, कसं वागायचं आणि कधी गप्प राहायचं. पण या सगळ्याच्या आत माणूस वेगळंच जगत असतो. त्याच्या मनात अनेक विचार असतात, काही अपूर्ण स्वप्नं असतात आणि काही न बोललेल्या वेदना असतात.

खरं जगणं कोणालाच सहज दिसत नाही. रात्री एकटेपणी येणारे विचार, मनात दाटून येणारी हुरहूर, आणि आठवणींनी भरलेली शांतता यातून माणूस आपलं आयुष्य जगत असतो. बाहेरून हसणारा माणूस आतून दुःखी असू शकतो. बाहेरून कडक वाटणारा माणूस आतून फार हळवा असू शकतो. पण तो ते दाखवत नाही, कारण जगाला भावना नाही तर ताकद दिसावी लागते.

प्रेम म्हणजे फक्त चांगल्या वागण्यावर खुश होणं नाही. प्रेम म्हणजे समोरच्या माणसाचं जगणं समजून घेणं. तो रागावतो तेव्हा त्यामागचं कारण ओळखणं, तो गप्प राहतो तेव्हा त्याची शांतता समजून घेणं, आणि तो थकलेला असताना त्याला आधार देणं हेच खरं प्रेम आहे. जो माणूस फक्त शब्द ऐकतो तो वागणं पाहतो. पण जो माणूस मन लावून ऐकतो तो जगणं समजतो.

जीवनाचं साधं पण खोल सत्य असं आहे की आपण सगळेच थोडेसे अभिनय करत असतो. जबाबदाऱ्यांमुळे, समाजामुळे आणि अपेक्षांमुळे. पण आतला माणूस मात्र रोज प्रामाणिकपणे जगत असतो. त्याला कुणीतरी समजून घ्यावं, एवढीच अपेक्षा असते.

म्हणूनच नात्यांमध्ये घाई करू नका. फक्त दिसणाऱ्या चेहऱ्यावर मत ठरवू नका. थोडा वेळ द्या, थोडं समजून घ्या आणि डोकावून पाहा. कारण वागणारा चेहरा सगळ्यांना दिसतो, पण जगणारा चेहरा फक्त संवेदनशील माणसालाच दिसतो. आणि जेव्हा तो दिसतो, तेव्हाच नातं खरं अर्थाने जिवंत होतं.
लेखक :- सुनिल जाधव पुणे TM +91 935 985 0065
0