Login

आपलेच दात आपलेच ओठ

आपलेच दात आपलेच ओठ
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
लघुकथा

शीर्षक -आपलेच दात आपलेच ओठ


"अगं सुलभा, तुझा फोन वाजतोय केव्हाचा."

मानसीने सुलभाला सांगितले.

अरे, आपल्या गप्पांच्या ओघात ऐकूचं आलं नाही बघ.सुलभा म्हणाली.

"हॅलो कोण बोलतंय?"

"मी मंदा."

"ताई, आज मी स्वयंपाकासाठी येणार नाही. माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे मला जावं लागत आहे."

"बरं, जा तू."

आजच्या दिवस करून घेईल मी स्वयंपाक. म्हणत सुलभाने फोन ठेवला.

"कुणाचा होता गं फोन?"

मानसी म्हणाली.

" माझ्याकडे स्वयंपाक बनवते त्या मंदाचा."

तिच्या आईची तब्येत बरी नाही. त्यामुळे तिला भेटीला जायचं आहे म्हणत होती.

मानसी, स्वयंपाक, भांडी अशी कामं करणाऱ्या स्त्रिया म्हणजे आपल्यासारखाच एक जीव. संसाराला हातभार लागावा म्हणून चार काम करतात त्या. त्यांनाही नातीगोती सांभाळावी लागतातच नां. त्यांनाही आपल्यासारखं मन आहे. भावना आहे.सुलभा म्हणाली.

"हो गं सुलभा, बरोबर आहे तुझे."

अलीकडे आपल्या तब्येतीच्या सारख्या तक्रारी चालू असतात.अशावेळी यांचाही आपल्याला बराच आधार असतो.म्हणून आपण आपल्या घरी धुणीभांडी, स्वयंपाक अशी कामं करणाऱ्यांचेही आभारच मानायला पाहिजे.नाही कां?

"हो, अगदी बरोबर."मनस्वी म्हणाली.

सुलभा, मनस्वी आणि मानसी तिघी समवयस्क. मानसी व मनस्वी सेवानिवृत्त पेन्शनर. सुलभा एक गृहिणी. तिघींच्याही जोडीदारांना सरत्या वयात अचानक मृत्यूने गाठलेले. सुलभालाही पतीच्या मृत्यूनंतर फॅमिली पेन्शन मिळत होती. एकाच मोहल्ल्यात राहत असल्यामुळे तेथीलच एका बगिच्यात तिघींची ओळख झाली आणि त्या एकमेकींच्या जिवलग मैत्रिणी बनल्या.

मनस्वीचा मुलगा व मुलगी परदेशात स्थायिक झालेली. मानसीला एक मुलगी. ती ही आपल्या पतीसमवेत दुसऱ्या देशात राहत होती. सुलभाचा मुलगा भारतातच एका शहरात राहत होता. कधी कधी करमलं नाही, तर त्या तिघी मैत्रिणी एकत्र येत आणि त्यांच्या गप्पा रंगत. आजही त्यांच्या गप्पा अशाच रंगल्या होत्या.

"किती छान होते ते दिवस."

सगळ्या गोष्टी पटापट आवरून शाळेत जायचं. तिथे गेल्यावर त्या निरागस मुलांच्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या गराड्यात मिसळून जायचं. त्यांना शिकवता शिकवता दिवस कसा निघून जायचा कळायचा सुद्धा नाही. मॅडम मॅडम करत त्यांचं भोवताल फिरणं. आता सर्व गोष्टी अगदी वारंवार नजरेसमोर येतात. त्यामुळे निवृत्त झाल्यानंतर काही दिवस तर वेळ कसा घालवायचा हाच मोठा यक्ष प्रश्न असायचा.

मनस्वी, अगदी खरं आहे तुझं. मानसी म्हणाली.

"सुलभा, आज तुझा चेहरा उदास दिसत आहे. ताप वगैरे वाटतो का?"


"नाही गं. थोडा थकवा जाणवत आहे. डोकं जड झालं आहे अगदी."

"चल मग, आपण थोडं बाहेर फिरून येऊया आणि तिकडेच आईस्क्रीम वगैरे खाऊ." म्हणजे तुला थोडं बरं वाटेल.

म्हणत तिघी बाहेर पडल्या.

"सुलभा, तुझी मुलं काय म्हणतात? नातवंड कशी आहेत?"
मानसी म्हणाली.

"छान आहेत गं सगळे."

मुलगा म्हणतो, "आता तू काय करतेस तिथे रिकामी बसून. इकडे येऊन जा."

पण खरं सांगू का मानसी? माझी अगदी द्विधा अवस्था झाली आहे. मुलाकडे जावं की नाही? तिथे गेलं की, त्यांची ती धावपळ, सतत गडबड नको वाटतं ग सगळं.

"सुलभा, तू आमच्यापासून काहीतरी लपवते आहेस बघ."

कारण वेगळचं आहे. सांग बघू. मनस्वी म्हणाली.

"काही नाही गं."

म्हणत सुलभा रडू लागली. " रडू नकोस. सांगायचं नसेल तर सांगू नको. पण निदान रडू तरी नको. "अगं जेष्ठांचा अगदी ज्वलंत प्रश्न आहे अलीकडे. ५०% पेक्षाही जास्त जेष्ठ लोक आपल्या समस्या कुणाजवळही सांगत नाहीत. अगदी तोंड सुद्धा उघडत नाहीत. कारण "आपलेच दात आपलेच ओठ" न्याय मागायचा तर कुणाकडे ? म्हणून गप्प बसतात. मनस्वी म्हणाली.

"मग काय म्हणतेस तू ?" आता तिकडे जायचं नाही नां तुला?

आणि इथे राहिलं तर एकटं एकटं वाटतं. रिकामपण खायला उठतं. असंच म्हणायचं नां तुला?

हो मानसी.

"मला इथे या एकटेपणाचा कंटाळा येतो बघ."

अगं सुलभा, मला वाटतं तू एकटेपणाला घाबरतेस की काय? जरा समजून घे. काही गोष्टी आपल्याला स्वीकाराव्याच लागतात आणि मनाला कशात तरी गुंतवून घ्यावं लागतं. कारण जर सतत त्याच त्या गोष्टीचा विचार करत राहिलो तर परिस्थिती बदलणार आहे का? उलट आपल्याच तब्येतीवर त्याचा विपरीत परिणाम होईल.

बरोबर नां. त्यापेक्षा "आहे त्या परिस्थितीमध्ये मनाला प्रसन्न ठेवायचं. ंसकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा." हाच एकमेव उपाय आहे आपल्याजवळ. "आता एकांतच आपला मित्र आणि सर्व काही." त्याच्याशी मैत्री करायची. म्हणजे पहा कसे सर्व प्रश्न चुटकीसरशी मिटतील.

माझ्याकडे बघ जरा. "मी तर मनाला अगदी खंबीर बनवलं आणि एकांतातच मी सुख शोधते आहे." मानसी सुलभाला समजावत बोलत होती.

मानसी, जरा चेहरा इकडे कर बघू. "डोळ्यात पाणी दिसतंय तुझ्या."

" नाही गं मनस्वी, वाऱ्याची झुळूक आली होती नां तेव्हा डोळ्यात कचरा गेला असेल."

हे बघ मानसी, "तुझ्यापेक्षा एक पावसाळा मी जास्त पाहिला आहे."

मनस्वीने मानसीला हसवण्याचा प्रयत्न केला.

मनस्वी, खरं सांगू कां? मुलांची, नातवंडांची तीव्र आठवण येते गं कधीकधी. खूप रडावसं वाटतं अशावेळी. पण पिल्लांना पंख फुटल्यावर ती घरट्यातून दूर उडून जाणारच नां. मानसी म्हणाली.

मनस्वीच्या डोळ्यात देखील पाणी तरळले. "तू स्वतःला खंबीर बनवलं आहे. चांगली गोष्ट आहे." असंच करायला हवं.

हं. तर बोल पुढे, काय म्हणत होती? मनस्वी म्हणाली.

मानसी पुढे बोलू लागली. खरं सांगू का सुलभा, " मी जेव्हा एकटी असते नां, तेव्हाच मला नवनवीन कल्पना सुचतात आणि मी त्या पटापट कागदावर उतरवते."

एकटेपणाचे कौतुक करणाऱ्या, आलेल्या परिस्थितीशी तडजोड करणाऱ्या आपल्या मैत्रिणीकडे सुलभा मात्र कौतुकाने पाहतच राहिली.

"खरंय गं मानसी. मला पटतंय."
सुलभा म्हणाली.

बरोबर आहे मानसी तुझं. आता "एकांतच आपला मित्र."
मनस्वीने री ओढली.

माझा मुलगा, मुलगी दोघेही परदेशात राहतात. तिकडचाचं जावई व तिकडचीचं सून त्यामुळे ते लोकं तिकडे स्थायिक झालेले. वर्षातून एकदा येतात ते भारतात. मनस्वी म्हणाली.

माझी पण तीचं परिस्थिती आहे. माझीही मुलगी परदेशात. मुलं शाळेत असल्यामुळे तीही वर्षातून, दोन वर्षातून एकदा येते आपल्या पती व मुलांसमवेत. परदेशात असल्याने आपणही कायमचं त्यांच्याजवळ जाऊन राहू शकत नाही. तेही इथे येऊन फार दिवस राहू शकत नाही. त्यामुळे आपणच या सर्व परिस्थितीवर उपाय शोधून सुवर्णमध्य साधायचा. एवढं नक्कीच आपल्या हातात आहे. मानसी म्हणाली.

आता स्मार्टफोनमुळे कॉल, व्हिडिओ कॉल चालूच असतात. शिवाय सर्व कामाला बाई आहे. आमचे शेजारीही खूप चांगले आहेत. शिवाय आपण तिघी आहोतच एकमेकींची विचारपूस करायला.

विशेष म्हणजे एकाच मोहल्ल्यात राहत आहोत. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमचे हे गेल्यापासून सुरुवातीला खूप एकटं वाटायचं. पण हळूहळू मनाची तयारी केली. तुला तर मी सांगितलं आहे की, मी वाचन आणि लिखाणात जास्त वेळ घालवते. मानसी म्हणाली.


हो मानसी, बरोबर आहे तुझे. मी पण तुझी प्रेरणा घेऊन एकांताशी व माझ्या छंदांशी मैत्री केली. जरा कुठे उदास वाटलं, जरा कुठे मनाला वेदना झाली की, माझे फुलझाडे, फळझाडे माझ्या मदतीला धावून येतात.

परसबागेतील फुलझाडांजवळ गेलं की वाटतं. जणू ते आपल्याशी बोलत आहेत. "निसर्गाला मित्र माना" म्हणतात नां. ते अगदी बरोबर आहे. सकाळी झाडांना पाणी घालायला गेलं की, अगदी मोहरून ते आपल्याशी बोलत आहेत असं वाटतं, "बघ मला किती छान कळी आली आहे."

"दोन-तीन दिवसांपूर्वी लावलेल्या कलमेला अंकुर फुटल्यावर ती जणू आपल्याशी बोलते."

"बघ मला किती छान अंकुर फुटले आहेत.

" फक्त आपल्याला त्यांच्याशी बोलता आलं पाहिजे. त्यांची भाषा समजली पाहिजे. झाडांच्या, वेलींच्या, निसर्गाच्या जवळ गेल्याशिवाय आपल्याला हे कळणार नाही." मनस्वी म्हणाली.

सुलभा, तू पण आता स्वतःला एकटं समजू नको. तुझी मुलाकडे जाण्याची इच्छा नसते. तुला तिथे करमत नाही किंवा जे काही असेल. तरी कुढत बसायचं नाही. त्यातून मार्ग काढायचा.

अगं, "आज साठ वर्षावरील जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना आहेत. जेष्ठांच्या आरोग्याची काळजी घेणे, त्यांच्या जीविताचे, मालमत्तेचे रक्षण, छळ व पिळवणुकीपासून त्यांचे संरक्षण करणे. तितकेच नव्हे तर पोलीस स्टेशनमध्ये "जेष्ठ नागरिक सहायता कक्ष" सुद्धा स्थापन झाले आहे."

ही आपल्यासाठी निश्चितच जमेची बाजू आहे. पण "जेष्ठ" या शब्दाला कधीही असहायतेची, जुनेपणाची, परावलंबित्वाची किनार लागू द्यायची नाही.

"वय" हा केवळ अंकगणिती आकडा आहे असं समजायचं."

"स्वप्नांना, उमेदीला, इच्छा आकांक्षांना आणि त्या पूर्ण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना 'वयाची' कधीच चिंता नसते." म्हणून आता फक्त आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यायची. विविध कामात म्हणजे वाचन, लेखन, एखादा छंद, निसर्गाच्या जवळ जाणं, अध्यात्म यात स्वतःला गुंतवून घ्यायचं. म्हणजे एकटेपणाचा आपल्याला त्रास होणार नाही.
मानसी सुलभाला समजावत म्हणाली.

हो गं मानसी. आज मला खूप हलकं हलकं वाटत आहे. "आता मी ही एकटेपणाशी मैत्री करणार. वाचन, लेखन करणार. तुझ्या मते शब्दांशी खेळणार. शब्दांतून आपलं सुख दुःख व्यक्त करणार. परसबाग फुलवणार. निसर्गाशी मैत्री करणार."

घराभोवती परसबाग
सोपी आहे युक्ती
यातून तरी आपल्या आहारात
मिळवा विषमुक्ती.

"खरं आहे नां?"

"बघ आता माझं डोकं दुखणं सुद्धा कमी झालं."

"अरे व्वा! छान ! चला निघूया आता."

सुलभा, आता "मी कधीच एकटी नाही आणि मी तसं वाटून सुद्धा घेणार नाही."
असं बोल एकदा आमच्या समोर.मानसी म्हणाली.

हो गं मानसी, मनस्वी, "आता मी एकटी नाही आणि तसं वाटूनही घेणार नाही." ठरलं. आपण तिघी अशाच एकमेकींना छान छान भेटत राहू आणि एकमेकींना आधार देत राहू. चला, म्हणत सर्वांनी एकमेकींचा निरोप घेतला.