Login

अपराध माझा असा काय झाला? भाग २

कथा एका निष्पाप जीवाची
अपराध माझा असा काय झाला? भाग २


मागील भागात आपण पाहिले की श्रियाला बघायला मुलगा आलेला असतो. ठरेल का तिचे लग्न बघू या भागात.


"तुम्हाला श्रिया पसंत आहे? हो.. हो.. ती आहेच पसंत पडण्यासारखी. लग्न म्हणजे.. आम्हाला जसं झेपेल तसं आम्ही करून देऊ.. ते कोर्टात केस चालू आहे, मुलाची नोकरी.. आहेत थोड्याफार अडचणी." प्रवीणराव फोनवर बोलत होते. त्यांचे एकतर्फी बोलणे ऐकून स्वातीताई अस्वस्थ होत होत्या.

" मी काय म्हणतो, पुढे जाण्याआधी एकदा मुलाला आणि मुलीला भेटू दिले तर? असा थिल्लरपणा मलाही आवडत नाही. पण कसं आहे जग बदलत चाललं आहे. आपण कुठे मागासलेले वाटायला नको." प्रवीणराव बोलत होते.

" आमची श्रिया पण तशी नाही. तरिही.. वाटलं कुठेतरी. आज विराजराव येतील म्हणताय? हो बरोबर आहे. जेवढ्या लवकर हे सोपस्कार पार पडतील तेवढं बरं." प्रवीणरावांनी फोन ठेवला.

" काय म्हणत होते ते?" स्वातीताईंनी विचारले.

" काही नाही.. श्रिया पसंत आहे त्यांना. त्यांच्या गुरूजींनी म्हणे सांगितले आहे की हिच्याशी लग्न करणे त्या विराजसाठी खूप भाग्याचे आहे. त्यांना लवकरात लवकर लग्न उरकायचे आहे." प्रवीणरावांच्या चेहर्‍यावर हसू होते.

" ते तर खूप श्रीमंत दिसतात. मग त्यांच्या तोलामोलाचे लग्न करून देणं आपल्याला झेपणार आहे का?" स्वातीताई चिंतेत पडल्या.

" कश्याला टेन्शन घेताय? मी म्हटलं होतं ना ते मोठ्या घरचे आहेत. लग्न अगदी त्यांना शोभेल असंच करायचे आहे. मग ते त्यांच्या खर्चाने सगळं करणार आहेत."

" मग आपण काय करायचे?"

" आपण फक्त लग्नाला जायचे. बरं, श्रियाला फोन करून सांग की तो विराज तिला ऑफिसजवळ भेटायला येणार आहे."

" हे अचानक भेटणं वगैरे?"

" ती माणसं खरंच मदत करतील का? हे चाचपून पहायला नको? तो मुलगा अगदी गप्प होता. त्यांनी जशी श्रियाची परिक्षा घेतली तशी आपण नको घ्यायला?"

" तुम्ही जाणार की काय?" कुत्सितपणे स्वातीताई म्हणाल्या. प्रवीणरावांचे वागणे त्यांना कुठेतरी खटकत होते.

" मी नाही जाणार. पण आपली श्रिया विचारेल ना? मी सांगतो तिला तसं."


" हाय.." विराजला बघून श्रिया म्हणाली.

" हॅलो.." विराजने हसल्यासारखे केले. श्रियाचा उत्साह मावळला. आधीच हे लग्न ती आईबाबांच्या इच्छेने करत होती. आता लग्न करतेच आहे तर का नाराजीने करायचे म्हणून ती मनाची तयारी करत होती. पण आता विराजचा प्रतिसाद बघून तिची पुढे जायची इच्छाच होत नव्हती.

" इथेच उभं रहायचं की बाहेरही जायचं?" विचारात गढलेल्या श्रियाला बघून विराजने विचारले.

" कुठे जायचं?"

"इथे कुठे हॉटेल असेल तर तिथे जाऊ."

" बरं.." दोघे जवळच्या हॉटेलमध्ये गेले. विराजने श्रियाला न विचारताच ऑर्डर दिली सुद्धा. श्रियाने स्वतःला परत आवरले.

" तुम्हाला चालेल ना?" विराजने विचारले.

किमान एवढे तरी मॅनर्स आहेत. श्रियाच्या मनात विचार आला.

" हो चालेल. आणि मला अरेतुरे केलं तरी चालेल."

" आमच्याकडे आदरार्थीच बोलतात." विराज थोडा आढ्यतेने म्हणाला.

" अच्छा.." श्रियाला आठवले त्या दिवशी कामिनीताईंनी विराजला अरेतुरेच केले होते. त्याच्या बेगडी बोलण्याचा तिला राग आला. पण..

" म्हणजे आम्हाला ती तशीच सवय लागली आहे." विराज स्पष्टीकरण देऊ लागला.

" मग ऑफिसमध्ये काय करता?"

" ऑफिसमध्ये पर्यायच नाही. पण आता आपलं लग्न ठरलं आहे म्हटल्यावर तुमच्याशीही तसंच बोललं पाहिजे ना?"

" लग्न ठरलं आहे म्हणजे? तुम्हाला मी पसंत नाही का?" काहिश्या नाराजीने श्रियाने विचारले.

" असं काही नाही. तुम्ही आवडलातच मला." सावरून घेत विराज म्हणाला. "तुम्ही आईला पसंत पडलात मग मला आवडणारच ना?"

" आणि जर नसते पसंत पडले तर?" श्रियाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नसल्यामुळे विराज गडबडला. वेटर खाण्याचे पदार्थ घेऊन आल्यामुळे तो प्रश्न अनुत्तरित राहिला. खाताना विराजचा मोबाईल वाजला.

" आईने विचारलं आहे, साखरपुड्याची खरेदी करायला कधी जायचे?" फोनवर बोलून झाल्यावर विराजने श्रियाला विचारले.

" साखरपुडा? एवढ्या लवकर?" श्रियाने आश्चर्याने विचारले.

" हो.. आईला गुरूजींनी सांगितले आहे की लवकरात लवकर लग्न झाले पाहिजे. तुमच्याशी लग्न झाल्यावर माझा भाग्योदय आहे. पत्रिकेत लिहिले आहे तसे."

" तुम्हाला पटते हे?"

" म्हणजे काय? माझ्या आईबाबांचा खूप विश्वास आहे. आणि मी माझ्या आईबाबांच्या शब्दाबाहेर नाही. निघायचे?" विराज घड्याळ बघत म्हणाला. " आईला सातनंतर घरी आलेलं आवडत नाही."

" पण मला कधीकधी ऑफिसमध्ये उशीर होतो. "

"आईला तर नोकरी करणारी सूनही आवडत नाही. ते भाग्योदय म्हणून.." बोलता बोलता विराज थांबला. पण श्रियाला सगळं समजलं.

" निघूयातच.. घरी जायला मलाही उशीर होईल. " श्रिया पर्स हातात घेत म्हणाली.

" मी येतो घरी सोडायला." जाताना विराज बोलत होता. त्याच्या बोलण्यातून त्याच्या घरचे कसे श्रेष्ठ फक्त हेच समजत होते. या लग्नाने बाबा खुश होतील. पण आपण सुखी होऊ? श्रियाने स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला.

" आपण उद्या परत भेटूयात?" श्रियाच्या घराबाहेर गाडी थांबवत विराजने विचारले.
श्रियाने मान हलवली.

" तुम्ही घरी येताय ना?"

" नको.. आणि आपण उद्या भेटणार हे कोणाला सांगू नका. माझ्या घरी नाही आवडणार. " विराज गाडी सुरू करत म्हणाला.


श्रिया होईल का सुखी या लग्नामुळे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all