अपराध माझा असा काय झाला? भाग ४
मागील भागात आपण पाहिले की शेवटी श्रिया आणि विराजचा साखरपुडा होतो. आता बघू पुढे काय होते ते.
" तुम्ही इथे?" ऑफिसच्या बाहेर उभ्या असलेल्या विराजला बघून श्रिया आश्चर्यचकित झाली होती.
" कालच साखरपुडा झाला ना? करमत नसेल जिजूंना." श्रियाच्या मैत्रिणी तिची मस्करी करत होत्या.
" थोडं काम आहे. जरा बोलूयात का?" विराजने प्रेमात श्रियाला विचारले.
" जरा कशाला पूर्ण बोला की. आम्ही निघतोच आहोत. तुम्ही मजा करा." श्रियाच्या मैत्रिणी हसत तिथून निघाल्या.
" सॉरी.. त्या जरा जास्तच मस्करी करतात." श्रिया म्हणाली.
" इट्स ओके.. मला आवडलं त्यांचं मस्करी करणं." विराज आज खूपच मोकळेपणाने बोलत होता. "आपण बाहेर गेलो तर चालेल का तुला?" ते ऐकून श्रिया गडबडली.
" मला घरी विचारावे लागेल."
" तू माझ्यासोबत आहेस हे नको सांगूस. तुझे बाबा जर चुकून माझ्या आईबाबांना काही बोलले तर माझी वाट लागेल."
" मागच्या वेळेस पण तुम्ही कोणाला सांगू नको असं म्हटलं होतं. "
" ते आईला लग्नाआधी भेटलेलं आवडत नाही."
" आणि बाहेरून समजलं तर?"
" तू प्रश्न फार विचारतेस. सोबत यायचं असेल तर चल. नाहीतर सोडून दे. सगळ्या मूडची वाट लावली." विराज चिडून बोलला. काही न बोलता श्रिया गाडीत जाऊन बसली. विराजने गाडी सुरू केली. गाडी त्याने थिएटरबाहेर थांबवली.
" पिक्चरला.. आता?" श्रियाने विचारले. "मला घरी पोहोचेपर्यंत दहा वाजतील."
" एक दिवस होईल थोडा उशीर. यानंतर बाहेर जेवण." विराज आज मूडमध्ये होता.
" पण तुमच्या घरी, ते सातच्या आत घरात?"
" आईबाबा पुण्याला गेले आहेत. तुला घरीच घेऊन जाणार होतो. पण कोणी बघितलं तर आरडाओरड करतील." विराज श्रियाचा हात पकडत म्हणाला. त्याने पहिल्यांदाच हात पकडल्यावर रोमांच उभे राहण्याऐवजी तिच्या अंगावर शहारा आला. पिक्चर रोमँटिक होता पण श्रियाचे मात्र पिक्चरमध्ये मन लागत नव्हते. मध्यंतर झाल्यावर विराज समोसे आणायला बाहेर गेला हे बघून श्रियाने घरी फोन लावला.
" आई, मी विराजसोबत आहे."
" श्रिया, खूपच उशीर होतो आहे." काळजीने स्वातीताई म्हणाल्या.
" हो आई.. तू त्यांच्या घरी बोलू नकोस. ते चिडतील माझ्यावर. मला रहावलं नाही म्हणून तुला सांगितलं."
"काय बोलू यावर? त्यांना घरी सोडायला सांग म्हणजे झालं."
" हो आई.." विराजला येताना बघून श्रियाने घाईघाईत फोन ठेवून दिला.
पिक्चर संपला. विराजच्या इच्छेप्रमाणे दोघे हॉटेलमध्येही गेले.
पिक्चर संपला. विराजच्या इच्छेप्रमाणे दोघे हॉटेलमध्येही गेले.
" तुम्ही मला घरी सोडाल ना?" श्रियाने विचारले.
" नेहमी सोडतो ना.. आजही सोडेन." विराज आढ्यतेने म्हणाला. जेवत असताना विराजचा फोन वाजला. त्यावरचे नाव बघून त्याच्या चेहर्यावरचा रंग बदलला.
" काय झाले?" श्रियाने विचारले. विराजने तिला गप्प बसण्याची खूण करत फोन उचलला.
" हॅलो बाबा.. तुम्ही पोहोचलात का घरी? तुम्ही उद्या येणार होता ना? मी??? मी जरा बाहेर आलो होतो. ते मित्राच्या वडिलांचा अपघात झाला म्हणून. हो.. बरे आहेत. निघालोच हॉस्पिटलमधून. थोडं खातो आणि लगेचच येतो घरी. तुम्हाला काही आणायचे आहे का? बरं.. हो.. येतोच." विराजने कपाळावरचा घाम पुसत फोन ठेवला.
" खाऊन घे पटकन. मला निघायला हवं." विराज घाई करू लागला.
" तुम्ही सोडणार आहात ना मला." श्रियाने घाबरून विचारले.
" आता नाही जमणार. आईबाबा घरी पोहोचले आहेत. तशीही तुला ट्रेनने फिरायची सवय आहेच ना. मी घरी पोहोचलो नाहीतर आईबाबा चिडतील माझ्यावर. " घाई करत विराज म्हणाला.
" मी ट्रेनने प्रवास करते.. पण आता रात्रीचे अकरा वाजत आले आहेत. ट्रेनला गर्दीही कमी असते. एवढ्या रात्री मी एकटीने प्रवास केला नाही कधी." श्रिया घाबरली होती थोडी. कारण काही दिवसांपूर्वीच रात्रीच्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या स्त्रियांच्या डब्यात गर्दुल्याने हल्ला केल्याची बातमी तिने वाचली होती. अश्या लोकांची तिला फार भिती वाटायची.
" अहो पण.. तुम्ही घरी सोडणार म्हणून मी एवढ्या उशीरापर्यंत थांबले." श्रियाने शेवटचा प्रयत्न करून बघितला.
"एवढीच भिती वाटत असेल तर ओला उबेर करून जा. पण मला आता घरी जाऊ देत." विराज बघता बघता निघालासुद्धा. जी व्यक्ती आपल्याला एकटीला अश्या आडवेळी सोडून जाते, ती व्यक्ती आयुष्यभर सोबत राहिल? डोळ्यातलं पाणी पाठी लोटत श्रिया तिथून निघाली. विराज कधीच गेला होता. श्रिया स्टेशनवर पोहोचली. गेल्या गेल्याच ट्रेन येताना दिसली. श्रिया एकदम शेवटच्या डब्याच्या इथे होती. मधल्या डब्यापर्यंत जायचे म्हणजे दुसऱ्या ट्रेनची वाट बघावी लागेल. तिने याच ट्रेनमध्ये चढायचे ठरवले. डब्यात अगदीच एकदोन बायका होत्या. त्यांना बघून ती सुटकेचा निश्वास सोडणार तोच त्या पुढच्या स्टेशनला उतरून गेल्या. समोरच पुरूषांचा डबा दिसत होता. तेवढाच काय तो दिलासा. ट्रेन सुरू होताहोताच एक व्यक्ती धावत धावत श्रियाच्या डब्यात घुसली. तिला बघून श्रियाच्या कपाळावर घर्मबिंदू जमा झाले.
कोण असेल ती व्यक्ती? पोहोचू शकेल का श्रिया सुखरूप घरी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा