Login

अपराध माझा असा काय झाला? भाग ५

कथा एका निष्पाप जीवाची
अपराध माझा असा काय झाला? भाग ५


मागील भागात आपण पाहिले की विराज श्रियाला घेऊन बाहेर तर जातो पण घरी आईवडील आल्यावर तिला एकटीला सोडून निघून जातो. आता बघू पुढे काय होते ते.


" हा लेडिज डब्बा आहे. तुम्ही पुढच्या स्टेशनला इथून खाली उतरा." घाबरलेली श्रिया त्या पुरूषाला म्हणाली. उत्तरादाखल त्याने फक्त तिच्याकडे बघितले. त्याचे लाल डोळे बघून श्रियाच्या ह्रदयाचा ठोका चुकला. तो पुढे येऊ लागला. त्याने श्रियासोबत छेडछाड करायला सुरुवात केली. श्रिया ओरडू लागली. समोरच्या डब्यातील पुरूषही ओरडू लागले. पण चालत्या ट्रेनमधून या डब्यात कोणी येणार नाही याची त्या गर्दुल्याला खात्री असावी. पुढचे स्टेशन यायला थोडा वेळ होता. अचानक ट्रेन मधोमध थांबली. श्रियावर अतिप्रसंग करणाऱ्या त्या गर्दुल्ल्याला काही समजायच्या आतच फटके पडायला सुरुवात झाली. ट्रेनचा गार्ड येईपर्यंत तो गर्दुल्ला मार खाऊन अर्धमेला झाला होता. गार्डने त्याला ताब्यात घेतले. ट्रेन सुरू झाली. या सगळ्या धक्क्याने श्रिया बसल्याजागीच कोसळणार तोच मगाच्या त्या व्यक्तीने तिला धरले. तिला सीटवर व्यवस्थित बसवले. तिच्याच पर्समधलं पाणी काढून तिला प्यायला दिले.


" तुम्ही बर्‍या आहात ना?" त्याने श्रियाला विचारले. श्रिया अजूनही धक्क्यातच होती. तिची ओढणी अस्ताव्यस्त झाली होती. त्याने ती ओढणी नीट केली.

" तुम्हाला कुठे उतरायचे आहे?" त्याने परत विचारले. श्रिया थोडी भानावर आली. तिने स्टेशनचे नाव सांगितले.

" तुम्ही घरी फोन करून कोणाला बोलावू शकाल का? तुमची परिस्थिती मला बरोबर वाटत नाही." त्याने हळुवारपणे विचारले. श्रिया डोक्याला ताण देऊन विचार करू लागली. आईबाबांना एवढ्या उशीरा स्टेशनला बोलवायचे म्हणजे? नकोच. तिने पर्समधला मोबाईल काढला आणि सुजयला फोन लावला. त्याने फोन उचलल्यावर काही बोलण्याऐवजी तिला रडू फुटले. ती हमसून हमसून रडू लागली. समोरून सुजय हॅलो, हॅलो करत होता. ते बघून त्या व्यक्तीने श्रियाचा फोन हातात घेतला.

" हॅलो.."

" कोण बोलतंय? तुम्ही श्रियासोबत कसे?" सुजयने संशयाने विचारले.

" मी अनिरुद्ध.." त्या व्यक्तीने बोलायला सुरुवात केली. त्याने थोडक्यात झालेला प्रसंग सुजयला सांगितला. ते ऐकून सुजय वरमला.

" मला माफ करा.. पण एवढ्या रात्री तुमचा आवाज ऐकून जरा.." सुजय म्हणाला.

" इट्स ओके. पण तुम्ही यांना न्यायला आलात तर बरं होईल. त्यांना बहुतेक थोडा धक्का बसला आहे."

" मी आता बरोबर दुसर्‍या टोकाला आहे. मला स्टेशनवर येईपर्यंत एखाद तास तरी लागेल." सुजय टेन्शनमध्ये आला होता.
" तुम्ही तिला रिक्षामध्ये बसवून द्याल का? सॉरी मी तुम्हाला त्रास देतो आहे."

" नको.. त्यापेक्षा तुमचा पत्ता सांगा. मी घरी सोडतो त्यांना." अनिरुद्ध म्हणाला.

" खूप उपकार होतील तुमचे. आधीच श्रियाला त्या संकटातून सोडवले आहे. काय बोलू तेच समजत नाही. मी लगेच घरचा पत्ता मेसेज करतो तुम्हाला." सुजय घाईघाईत बोलला. इकडे श्रियाचा रडण्याचा आवेग कमी झाला होता. अनिरुद्धने सुजयचा मेसेज वाचून तिचा मोबाईल तिला परत दिला. आपला रुमाल त्याने डोळे पुसण्यासाठी तिला देऊ केला. श्रियाने हातानेच नकार दिला. ती आजूबाजूला आपला रुमाल शोधू लागली. तो तिला खाली पडलेला दिसला. तिला तो उचलावासा ही वाटला नाही.

" माझा रुमाल स्वच्छ आणि न वापरलेला आहे." अनिरुद्ध परत रुमाल पुढे करत म्हणाला. नाईलाजाने श्रियाने त्या रुमालाने डोळे पुसले.

" मी तुम्हाला घरी सोडायला येतो आहे. चालेल ना?"

"नको.. मी जाईन." डोळ्यातलं पाणी पुसत श्रिया म्हणाली.

" ते जालच.. पण तरिही." अनिरुद्ध म्हणाला. त्यावर काहीच न बोलता श्रिया खिडकीच्या बाहेर बघत बसली.

" स्टेशन आले. उतरायचे?" अनिरुद्धने हळूवारपणे विचारले. श्रिया उठायला गेली आणि तिचा तोल गेला. अनिरुद्धने तिला सावरण्यासाठी तिचा दंड पकडला. स्स करून तिच्या तोंडातून आवाज निघाला. त्याने बघितले तर त्या गर्दुल्लयाच्या नखांचे ओरखडे उमटले होते.

" तुम्हाला डॉक्टरकडे गेलं पाहिजे लवकरात लवकर. " त्या ओरखड्यांकडे बघत अनिरुद्ध म्हणाला. त्याने श्रियाला ट्रेनमधून उतरायला मदत केली. रिक्षात बसून तिच्या घरापर्यंत सोडले.

" तुम्ही केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद." निघताना श्रिया म्हणाली. काहीच न बोलता हसून अनिरुद्ध त्याच रिक्षाने परत जायला निघाला. स्वतःला सावरत कशीतरी श्रिया घरी पोहोचली. स्वातीताई अस्वस्थपणे तिची वाटच बघत होत्या.

" श्रिया, काय ग हे?" तिच्या विस्कटलेल्या कपड्यांकडे बघून त्यांनी विचारले. श्रियाने रडत रडत सगळं सांगितलं. ते ऐकून त्या चिडल्या.

" तो विराज तुला एकटीला सोडून गेला तरी कसा? आणि ज्याने तुला वाचवले त्याचे नाव गाव तरी माहीत आहे का?"

" आई, मी नव्हते ग त्या मनस्थितीत." श्रिया म्हणाली.

" समजू शकते. तुला काही झालं नाही हेच नशीब. जा.. हातपाय धू.. कपडे बदल. मी दूध आणते. ते पी आणि झोप." श्रिया कपडे बदलून आली. स्वातीताईंच्या मांडीवर डोकं ठेवून झोपली. तिला आता कसलाच विचार करायचा नव्हता. ना तिला एकटं सोडून गेलेल्या विराजचा, ना तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या त्या गर्दुल्याचा ना तिला वाचवणाऱ्या अनिरुद्धचा.. तिला या विचारांपासून दूर जायचे होते...


मुंबईत आजकाल स्त्रियांच्या डब्यात पोलीस असतात. पण ही घटना त्या आधीची आहे.

झालेल्या घटनेचे पडसाद पडतील का श्रियाच्या जीवनावर? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all