अपराध माझा असा काय झाला? भाग ८
मागील भागात आपण पाहिले की लग्न मोडल्यामुळे आणि लोकं नाव ठेवत असल्यामुळे श्रिया घराच्या बाहेर पडत नाही. आता बघू पुढे काय होते ते.
" तुम्हाला कोणी यायला सांगितलं इथे?" दरवाजात उभं राहून कामिनीताईंनी विचारले.
" आत आल्याशिवाय कसं सांगणार ना?" आत घुसत श्रिया म्हणाली. नाईलाजाने कामिनीताई बाजूला झाल्या. तिच्या पाठोपाठ घाबरलेले प्रवीणराव आणि स्वातीताई आत आल्या. हे काय सुरू आहे हे न समजलेला अनिरुद्ध सुद्धा आत गेला.
" बोल, काय हवं आहे?" कामिनीताईंनी हाताची घडी करत विचारले.
" तुमच्या मुलाला आणि नवर्याला बोलवा. त्यांच्यासमोरच बोलायचे आहे."
" ते ऑफिसला गेले आहेत. रिकामे नाहीत ते तुमच्यासारखे."
" हो.. मी रिकामी आहेच सध्या. पण याला कारणीभूत असलेल्या तुमच्या मुलाशी जोपर्यंत मी बोलत नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही." श्रिया सोफ्यावर व्यवस्थित बसत म्हणाली. ती हलत नाही हे बघून त्यांनी शेवटी माधवराव आणि विराजला बोलावून घेतले. ते येईपर्यंत सगळेच गप्प बसून होते.
" हा काय तमाशा सुरू आहे?" आल्या आल्याच माधवरावांनी रागात विचारले.
" सभ्य, खानदानी लोकांच्या तोंडात हे शब्द शोभत नाहीत." श्रिया बोलली. तिचे हे बोलणे ऐकून सगळेच शॉक झाले. "आणि तमाशा मी नाही तुम्ही लोकांनी केला आहे."
" प्रवीण, काय बोलते आहे तुमची मुलगी?" प्रवीणरावांनी मान खाली घातली.
" मी अजून बोलायला सुरुवात केलीच नाही. तुमचा मुलगा आला की आपण बोलूच. घ्या तो ही आलाच." दरवाजात उभ्या असलेल्या विराजला बघून श्रिया म्हणाली.
" काय चालू आहे इथे?" विराजने विचारले.
" तुम्ही ठरलेला साखरपुडा का मोडला हे विचारायला आले आहे?" श्रियाने शांतपणे विचारले.
" हे तू विचारतेस? रात्री अपरात्री भटकल्यामुळे जिच्यावर अतिप्रसंग झाला आहे तिच्याशी कसलाच संबंध आम्हाला ठेवायचा नाही." माधवराव म्हणाले.
" मी रात्रीअपरात्री कोणासोबत फिरत होते हे तुमच्या मुलाला विचारले का?"
" तो हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्या मित्राच्या वडिलांचे काहीतरी झाले होते म्हणून." कामिनीताई म्हणाल्या.
" किती तो मुलावर विश्वास? तो ठेवाच पण खात्री तर करून घ्या. मी सिद्ध करू शकते की मी त्यादिवशी तुमच्या मुलासोबत पिक्चरला गेले होते. त्यानंतर आम्ही दोघे हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. कारण माणसं खोटं बोलतात. सीसीटीव्ही नाही." श्रियाचे वाक्य ऐकून विराजने मान खाली घातली.
" तर हा तुमचा मुलगा.. तुम्हाला आवडत नाही म्हणून तुम्हाला न समजू देता मला बाहेर भेटत होता. लग्न ठरले आहे, साखरपुडा झाला आहे म्हणून मी ही त्याच्यासोबत जात होते. त्यादिवशी तुमचा फोन आला म्हणून मला एकटीला सोडून तिथून निघून गेला." बोलता बोलता श्रियाचा गळा दाटून आला. हे ऐकून माधवराव आणि कामिनीताई थोड्या गडबडल्या.
" विराज, काय म्हणते आहे ही?"
" तो काय बोलणार? आईबाबांच्या पुढे आदर्श मुलगा असल्याचे नाटक करणारा हा पाठीमागे सगळे गुण उधळायला उत्सुक असतो."
" ते काहिही असलं तरी त्या माणसाने तुझ्यासोबत काय केलं आहे हे आम्हाला काय माहित?" उसन्या अवसानाने माधवराव म्हणाले.
" त्याचं उत्तर हे देतील." श्रिया अनिरुद्धकडे हात करत म्हणाली.
" हे कोण?"
" हेच ते, ज्यांनी त्या माणसाला मारले आणि मला वाचवले."
"हो.. त्या दिवशी त्या माणसाने यांना काही इजा करायच्या आधीच मी ट्रेनची चेन खेचली होती आणि त्या माणसाला मी यांच्यापासून दूर केले होते. आणि त्या माणसाने यांच्यावर हात टाकला यात त्यांची काय चूक?" अनिरुद्ध म्हणाला.
" तरिही आम्हाला हे लग्न करायचे नाही." माधवरावांनी निक्षून सांगितले.
" हे लग्न मला करायचे आहे हे तुम्हाला कोणी सांगितले?" शांतपणे श्रियाने विचारले. "हे लग्न म्हणजे सुरूवातीपासूनच एक तडजोडच होती ना?तुमच्या मुलाचा भाग्योदय आहे म्हणून आमची तुमच्याशी बरोबरी नसताना तुम्ही लग्नाला तयार झालात. मी ही मग तुमच्या मुलाचा बेगडी चेहरा खपवून घेतला, मला एकटीला सोडून तो तिथून पळून गेला, ते मी समजून घेतले. पण आपल्या होणाऱ्या बायकोवर किंवा मी तर म्हणेन एखाद्या स्त्रीवर तिचा दोष नसताना बोट दाखवलं जात आहे आणि तरिही जो माणूस शुंभासारखा ऐकतो आहे त्याच्याशी मलाच लग्न करायचे नाही." बोलताना श्रिया रागाने लाल झाली होती.
" लग्न करायचे नव्हते तर मग इथे येण्याचे कष्ट तरी का घेतलेत?" कामिनीताई म्हणाल्या.
" मी इथे आले कारण तुम्ही लग्न मोडलं ते माझ्यावर खोटे आरोप लावून. तुमचा मुलगा अगदी धुतल्या तांदळासारखा आणि मी मात्र दोषी,असं काहीतरी चित्र उभं करून. तो पडदा तुमच्या डोळ्यावरून हटवायचा होता. खरंतर झालेल्या घटनेला तोच जबाबदार आहे. त्याने जर त्या दिवशी मला बाहेर बोलावलं नसतं तर हे काहीच झाले नसते. पण जे होतं ते चांगल्यासाठीच. हा प्रसंग घडला नसता तर हा माणूस नवरा म्हणून कसा लायक नाही हे मला कसे समजले असते? ही तुमची साखरपुड्याची अंगठी आणि दागिने. आम्ही दिलेली अंगठी परत दिलीत तर फार बरं होईल. " श्रिया पर्समधले दागिने खाली टिपॉयवर ठेवत म्हणाली.
" केवढा तो अभिमान? अशीच वागलीस ना तर आयुष्य कसं काढशील?" कामिनीताई म्हणाल्या.
" याला स्वाभिमान म्हणतात. आणि लग्नाचं म्हणाल तर कोणी ना कोणी नक्कीच असेल जो खरा असेल. वरवरच्या गोष्टींना भुलण्यापेक्षा माणसाच्या मनाला समजून घेणारा असेल. तुम्ही त्याची काळजी नका करू. तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष द्या. त्याच्या मनात फक्त धाक ठेवू नका.. थोडासा मोकळेपणाही ठेवा. ज्यामुळे तो तुमच्यापासून लपवून काही करणार नाही. निघतो आम्ही." श्रिया ठामपणे बोलत होती.
श्रिया या सगळ्यातून बाहेर पडून उभी राहिल परत नव्याने? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा