अपराध माझा असा काय झाला? अंतिम भाग

कथा एका निष्पाप जीवाची
अपराध माझा असा काय झाला? भाग ९


मागील भागात आपण पाहिले की श्रिया विराजच्या घरी जाऊन खूप काही बोलते. आता बघू पुढे काय होते ते.


" अग ए बाळा, काय झाले रडायला?" विराजच्या घराबाहेर पडल्यावर श्रियाचा बांध फुटला. कोणालाही कधी उलटून न बोलणारी ती आज एवढं बोलल्यामुळे तिला आता रडू फुटले होते.

" आई, मी खूप बोलले का?" तिने रडतच विचारले.

" कमी आणि जास्त? काय फरक पडणार? लग्न मोडले. होती नव्हती तेवढी आशा तू धुळीला मिळवलीस." नाराज प्रवीणराव बोलत होते.

" बाबा, असे कसे ओ तुम्ही? मी तुम्हाला फक्त ओझंच वाटते का? त्या विराजच्या आईवडिलांना मानलं मी. त्यांचा मुलगा एवढा चुकूनही ते फक्त त्याचीच बाजू घेत होते. आणि तुम्ही? तुम्हाला काहीच वाटत नाही का आमच्याबद्दल? मला वाटलं होतं एकदातरी तुम्ही जवळ घेऊन म्हणाल की झालं ते झालं आता नव्याने आयुष्य सुरू कर. मी आहे तुझ्या पाठीशी. पण नाही. तुम्हाला तर फक्त मीच दोषी दिसत आहे." बोलतानाही श्रियाचा आवाज कापत होता. प्रवीणराव पुढे काही बोलणार तोच अनिरुद्ध मध्ये बोलला.

" इथे बोलण्याऐवजी आपण घरी जाऊन बोलूयात का? इथे येणारेजाणारे पण बघत आहेत."

" बरोबर आहे तुझं. बोलव टॅक्सी. आणि तू ही चल घरी. एवढा चौकशी करायला आलास हिची आणि मी मगाशी चहाही विचारला नाही." स्वातीताई म्हणाल्या. सगळे टॅक्सीने घरी आले. टॅक्सीत कोणीच कोणाशी बोलत नव्हते. एक विचित्र शांतता पसरली होती.

" श्रिया.." घरी पोहोचल्यावर प्रवीणरावांनी हाक मारली.

" बाबा, मी लवकरात लवकर दुसर्‍या शहरात जॉब शोधेन. म्हणजे मग तुम्हाला ना माझ्या लग्नाचे टेन्शन असेल ना माझ्यावर लागलेल्या या डागाचे." श्रिया त्यांच्याकडे न बघता बोलली.

" नको ग असं लागणारं बोलूस. गावच्या घराचे टेन्शन, सुजयचं टेन्शन. त्यात समोरून आलेलं हे स्थळ. मी वहावत गेलो. तुझा विचारच केला नाही. असं वाटलं की तू तिथे पैशाच्या राशीत लोळशील. आपल्याही अडचणी सुटतील. मोह सुटला मलाही. त्यातून तो राग तुझ्यावर निघाला. लहानपणापासून आम्हाला आईवडिलांनी मुलगी हे परक्याचे धन एवढेच शिकवले. कळत नकळत तुझ्यावर अन्याय करत गेलो. त्यातून तुझ्या लग्नाची चिंता. जग कितीही पुढारलं तरी लेकीच्या लग्नाचे टेन्शन असतेच." प्रवीणराव दाटलेल्या कंठाने म्हणाले. "माफ कर तुझ्या बापाला."

" आईवडील कधी मुलांची माफी मागत नाहीत." श्रिया प्रवीणरावांचे हात हातात घेत म्हणाले. " नका काळजी करू कसलीच. दादाही बघतोच आहे कामाचे. ते गावचे घर नाही मिळाले तरी हे घर आहे ना? आणि माझ्या लग्नाचे म्हणाल तर मी म्हटलं तसं कोणी ना कोणी तरी असेलच ना जो मला मी आहे तशी स्विकारेल."

"मी मध्ये बोललो तर चालणार आहे का?" अनिरुद्धने विचारले.

" बोला ना.." स्वातीताई म्हणाल्या.

" माझं नाव अनिरुद्ध.. वय सत्तावीस. एम.बी.ए. केले आहे. माझा स्वतःचा छोटा व्यवसाय आहे. अगदी भरपूर जरी नाही तरी महिन्याला बर्‍यापैकी कमावतो. घरी आईवडील आणि भाऊ आहेत. स्वतःचे घर आहे. निर्व्यसनी आहे."

" पण हे आम्हाला का सांगताय?" प्रवीणरावांनी आश्चर्याने विचारले.

" जर तुमची परवानगी असेल आणि मुख्य म्हणजे श्रियाला चालणार असेल तर मला आवडेल तिच्याशी लग्न करायला."

" मला कोणाचीही सहानुभूती नको आहे." श्रिया पटकन म्हणाली.

" यात सहानुभूतीचा प्रश्नच येत नाही. त्या दिवशी तुला घरी सोडले तेव्हा तू अगदी घाबरलेली होतीस, धक्क्यात होतीस. तुझी खूप काळजी वाटत होती. पण एका महत्त्वाच्या कामासाठी मला दुसऱ्याच दिवशी बाहेर जावे लागले होते. तिथेच मी टिव्हीवर ती बातमी बघितली. ती बघून मला ओळखणाऱ्यांचे मला कौतुकाचे फोन आले. तेव्हाच मनात विचार आला की जसा मला या घटनेचा परिणाम भोगावा लागला तसा तुलाही लागला असेलच ना? तेव्हाच इथे यावेसे वाटले होते. पण नाईलाज होता. काल रात्रीच मी मुंबईत परत आलो. आता लगेच इथे आलो. तुझा मगाशी दुर्गेचा अवतार बघितला आणि क्षणभर वाटले की हिच ती जिला आपण शोधत होतो. माझी जबरदस्ती नाही. तू विचार कर आणि वाटलं तरच मला उत्तर दे. निर्णय सर्वस्वी तुझाच असेल. निघतो मी." स्वतःचं कार्ड तिथे ठेवून अनिरुद्ध तिथून निघून गेला. प्रवीणराव, स्वातीताई आणि श्रिया तो गेला त्या दिशेने बघतच राहिले.

" तू या लग्नाला जबरदस्तीने होकार नाही ना देत?" वाळूत रेघोट्या ओढत असलेल्या श्रियाला अनिरुद्धने विचारले.

" नाही.. अगदी विचार करूनच होकार देत आहे. तुझ्या आईबाबांचा स्वभाव, पार्थचा मोकळेपणा मनाला खूपच भावला. त्यातही त्या प्रसंगाची आठवणही काढायची नाही हे तुझ्या आईचे ठणकावून सांगणे जास्तच आवडले." श्रिया बोलत होती.

" कठिण आहे मग." चेहरा पाडून अनिरुद्ध बोलला.

" काय कठिण आहे?" काहीच न समजून श्रियाने विचारले.

" माझं वैवाहिक जीवन. तुला तर माझ्यापेक्षा जास्त माझ्या घरातलेच जास्त आवडतात. म्हणजे तू त्यांच्यासाठी माझ्याशी लग्न करते आहेस."

" काहिही.. तू तर माझ्या आयुष्यात जादूगार बनून आला आहेस. माझं सगळं आयुष्य सुंदर रंगांनी भरून टाकलं आहेस." श्रिया अनिरुद्धच्या हातावर हात ठेवत म्हणाली.

" नक्की?" अनिरुद्धने तिच्या डोळ्यात बघत विचारले.

"हो.. आता कशी खात्री पटवून देऊ?"

" प्रेमाची कबुली देऊन." श्रियाने अनिरुद्धकडे बघितले. त्याच्या डोळ्यात मिस्किल हसू दिसत होते.

" आणि नाही दिली तर?"

" तर काय? तू नाहीतर अजून कोणी.."

" अनिरुद्ध.. दुष्ट आहेस तू.." श्रिया त्याला मारत म्हणाली.

" तो तर मी आहेच."

" मग असाच रहा.. माझ्यावर मनापासून प्रेम करणारा. मला वाईट लोकांपासून वाचवणारा. माझ्या बाजूने बोलणारा." श्रियाने बोलता बोलता अनिरुद्धच्या खांद्यावर डोके ठेवले.



ठरलेला साखरपुडा मोडणं, लग्न मोडणं.. आपल्या संस्कृतीत अजूनही हे योग्य समजले जात नाही. पण आजही अश्या घटना घडतात की लग्न तुटतात आणि त्याचे परिणाम त्या स्त्रीला भोगावे लागतात. कथेतील सानवीचे फक्त अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला म्हणून लग्न मोडले.. ही कथा आहे म्हणून तिच्या आयुष्यात अनिरुद्धच्या रूपाने प्रेमाचे रंग भरले गेले. पण नुकतीच एक घटना ऐकली, बायको मित्राशी फोनवर बोलते म्हणून नवर्‍याने तिच्याकडे घटस्फोट मागितला. लग्नाला वर्षही झालेले नाही. बघू तिच्या आयुष्यात जुने किंवा रंग भरतात का?

ही कथा कशी वाटली हे नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all