" सुप्रसिद्ध लेखिका मेघना यांचा मृत्यू.. हो. बरोबर ऐकलेत... खरेतर सर्व दर्शकांना ही दुःखद बातमी देताना मी काळजावर दगड ठेवला आहे. अत्यंत दुःखद घटना घडलेली आहे. मी सारिका, तुमची लाडकी आता आहे घटनास्थळावर. नव्याने जे दर्शक ऐकत आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते. आपल्या सर्वांच्या लाडक्या लेखिकेचा तिच्या राहत्या घरी मृत्यु झाला आहे. तो कसा झाला? तो खून आहे, अपघात आहे की आत्महत्या? सगळ्यांना पडलेला प्रश्न. सध्यातरी याचा तपास इन्स्पेक्टर प्रशांत करत आहेत. या घटनेच्या प्रत्येक घडामोडीसाठी बघत रहा, आमचे चॅनेल मी माझा. परत येते एका छोट्याश्या ब्रेकनंतर. मी सारिका, कॅमेरामन मनोजसोबत.."
"कट कर.. बघू स्नॅप्स.." सारिकाने हातातला माईक बाजूला करत म्हटले.
" बघा मॅडम.."
" तू पण ना? पूर्ण वेळ कॅमेरा माझ्या चेहर्यावर ठेवला आहेस. थोडे बॅकग्राऊंड पण घ्यायचे ना." सारिका तिचे खांद्यावरचे केस उगाचच उडवत म्हणाली.
" तेरे चेहरेसे नजर नही हटती, बताओं हम क्या करे?" मनोज डोळा मारत बोलला.
" थोडी तरी लाज बाळग. आपण खुनाची केस कव्हर करायला आलो आहोत. आणि तुला रोमँटिक गाणी सुचत आहेत."
सारिका खोटे चिडत म्हणाली.
सारिका खोटे चिडत म्हणाली.
" हे बघ, तुला आवडत नसेल तर गप्प बसतो. पण आपल्यासाठी हे खूनखराबा, चोरी हे नेहमीचे झाले आहे. जेव्हा मिळेल तेव्हा रोमँटिक होणार नाही मग कधी?"
" बरं.. तुझे बरोबर.. आता आत जाऊन बघूयात का तो इन्स्पेक्टर काही माहिती देतो का?"
" चला.."
आतमध्ये इन्स्पेक्टर प्रशांत तपासणी करत होते. कोणीतरी टीव्ही लावून ठेवला होता. त्यावर सारिका जोरजोरात ओरडत होती. " काळजावर दगड ठेवला आहे." प्रशांत कुत्सितपणे हसला.
" काळजावर दगड म्हणे. उलट जास्तीत जास्त टीआरपीची घटना सापडली म्हणून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तिच्या मनात. आणि या मेघनाला पण आजच मरायचे होते. उद्यापासून सुट्टी सुरू होणार होती. ती ही कमिशनरसरांनी कॅन्सल केली. म्हणे मोठी लेखिका होती. वरून प्रेशर यायला सुरुवात झाली. अरे असेल ती मोठी तिच्या घरी. त्यासाठी सुट्टीचे वांदे करायचे? आता नीलम पण चिडणार." स्वतःशीच बडबडत प्रशांत घराची तपासणीही करत होता. आतमध्ये मेघनाची दोन्ही मुले भेदरून तिच्या नवर्याजवळ, अनमोल जवळ बसली होती. अनमोलच्या चेहर्यावर दुःख स्पष्ट दिसत होते. त्या मुलांना बघून प्रशांतला आपल्या लेकीची आठवण आली. मनातून तो विषय बाजूला सारून तो पुढे जाणार तोच स्वयंपाकघरातून एक स्त्री बाहेर आली.
" अनमोल, चहा आणि गोळ्या घे.." तिने हक्काच्या आवाजात सांगितले. प्रशांतने प्रश्नार्थक नजरेने अनमोलकडे बघितले. त्याचा अर्थ समजून अनमोलने ओळख करून दिली.
" ही अश्विनी.. मेघनाची सहाय्यक."
" ओके.." प्रशांत विचारात पडला. "तुम्हाला काय वाटते, मेघनामॅडमचे कोणाशी वैर??" त्याने पठडीतला प्रश्न विचारला. अनमोल पुढे काही बोलणार तोच जोरजोरात रडण्याचा आवाज आला.
" मारलं.. माझ्या बहिणीला यानेच मारले."
कोण असेल ती व्यक्ती? खरेच मेघनाचा खून झाला असेल की आत्महत्या? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा