Login

अपराधी कोण? भाग २

रहस्य एका मृत्युचे


अपराधी कोण? भाग २


मागील भागात आपण पाहिले की सुप्रसिद्ध लेखिकेचा मृत्यु झाला आहे. तो खून आहे की आत्महत्या बघू आता.


" मारलं रे तिला.. बोललास तसेच केले." ती स्त्री जोरजोरात रडत होती.

" या कोण?" प्रशांतने अनमोलला विचारले.

" ही मेघनाची बहिण अर्चना.." अनमोलच्या चेहर्‍यावर चीड दिसत होती.

" अच्छा.. अर्चनाताई तुम्ही जरा शांत व्हा. अनमोलसर मला तुमच्या सगळ्यांशीच बोलायचे आहे. आपण सुरुवात करूया का?"

" हो.. जेवढ्या लवकर तुमची चौकशी संपेल तेवढे चांगलेच आहे."

" मग एखादी खोली?"

" आपण आमच्या खोलीत बसू शकतो."

" चला.." निघताना अनमोलने अश्विनीला केलेला इशारा प्रशांतच्या नजरेतून सुटला नाही.

" राघव..." प्रशांतने आवाज दिला.

" यस्स सर.."

" एकेकाला आत सोड.."

" हो सर.."

अनमोलच्या खोलीत आल्या आल्या प्रशांतचे लक्ष समोरच्या फोटोकडे गेले. मेघनाचा एकटीचा भलामोठा फोटो समोरच्या भिंतीवर होता.

" मॅडमला फोटोची आवड होती वाटते.." प्रशांतने विचारले.

" हो.." अनमोलने तिकडे बघितले सुद्धा नाही. " तिला आवडत लोकांनी तिला चांगलं म्हटलेलं.. म्हणजे आवडायचं."

"अच्छा.. मग त्यांचे कौतुक झालेले तुम्हाला आवडायचे नाही का?" प्रशांतने पलंगावर नजर टाकत विचारले.

" आपल्या बायकोचे कौतुक झालेले कोणाला नाही आवडणार? पण बायकोला त्याची कदर असली पाहिजे ना.."

" किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला?" अचानक प्रशांतचा रोख बदललेला बघून अनमोलला आश्चर्य वाटले. " अहो, म्हणजे बायकोला नवर्‍याबद्दल कदर न वाटायला किती वर्ष लागली? असे विचारायचे होते."

" मागच्याच महिन्यात चौदा पूर्ण झाली."

" म्हणजे वनवास पूर्ण झाला म्हणायचा." अनमोलने व्यथित नजरेने प्रशांतकडे बघितले.

" अरे.. तुम्ही तर नाराज झालात. मला सांगा तुम्हा दोघांचे काही भांडण वगैरे?"

" सामान्य नवराबायकोची जेवढी होतात तेवढीच."

" मग मला सांगा, तुम्ही कोणत्याच समारंभाला त्यांच्यासोबत का नसायचा?"

" तुम्हाला कोणी सांगितले?"

" सांगायला कशाला पाहिजे, या फोटोंमध्ये मॅडमच्या हातात बक्षिस दिसते आहे, पण तुम्ही किंवा मुले नाही."

" मी आणि मुले अशा समारंभाला जात नाही."

" काही खास कारण?"

" मेघनाला आवडायचे नाही.. तुम्हाला माझा संशय येतो आहे का?" अनमोलने रागाने विचारले.

" जोपर्यंत हा खून, आत्महत्या की अपघात हे सिद्ध होत नाही तोपर्यंत सगळेच माझ्यासाठी संशयित.. पुढचा प्रश्न, तुम्ही काय काम करता नक्की?"

"माझी एक छोटीशी कंपनी आहे. त्यामुळेच घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळायला जमते." प्रशांतने प्रश्नार्थक नजरेने बघितले.

" तुम्ही इतर कोणाला तरी विचारणार.. त्यापेक्षा मीच सांगितलेले बरे. मेघनाला मुलांकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. मग मीच मला जमेल तसे बघायचो."

" मला सांगा मेघनामॅडमचा मृत्यु झाला हे तुम्हाला कधी समजले?"

" सकाळीच.. उठल्यावर."

" आश्चर्याची गोष्ट आहे ना.. बायकोचा रात्री कधीतरी मृत्यु होतो आणि नवर्‍याला सकाळी समजते."

" मेघनाला रात्रीच लिहायची सवय होती. तिला लिहिताना कोणी त्रास दिलेला आवडायचा नाही. मग आम्ही कोणीच तिच्या स्टडीरूममध्ये फिरकायचो नाही. कधी कधी ती रात्रभर सुद्धा लिहित बसायची. आम्हाला सवय झाली आहे तिच्या या सवयीची.. म्हणजे होती."


"अच्छा. ठीक आहे.. आतापुरते तरी आपण थांबूया.. नंतर बोलूच परत."

प्रशांतने अनमोलला जायची परवानगी दिली आणि राघवला अश्विनीला पाठवायचा मेसेज केला. अनमोल बाहेर गेल्यावर त्याने खोलीचे निरीक्षण सुरू केले. खाली पडलेल्या कागदाच्या चिठ्ठीकडे त्याचे लक्ष गेले.

" आज रात्री मेघना लिहित असताना?" फक्त पाच शब्द होते त्यावर..

प्रशांतने शीळ घातली आणि अश्विनीने खोलीत प्रवेश केला..


कोणी पाठवली असेल ती चिठ्ठी? अर्चना म्हणते तसंच अनमोलने मारले असेल का मेघनाला? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटतो ते नक्की सांगा.


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all