मागील भागात आपण पाहिले की मेघनाचा मृत्यु झाला आहे आणि त्याचा तपास सुरू आहे. बघू पुढे काय होते ते.
" या.. बसा मॅडम." प्रशांतने अश्विनीला बसायची सूचना केली. अश्विनी डोळ्यात नसलेले पाणी पुसत बसली.
" खूप दुःख झालं असेल ना तुम्हाला." प्रशांतने विचारले.
" हो.. ना.. कधी वाटलंही नव्हतं मॅमचा असा खून होईल म्हणून." अश्विनी बोलली.
" तुम्हाला एवढी खात्री आहे?"
" कसली?"
" म्हणजे बघा.. आम्ही इथे छडा लावतो आहे हा मृत्यू अपघाती आहे, नैसर्गिक आहे की खून. आणि तुम्ही एवढ्या ठामपणे सांगितले म्हणून जरा वाटले. मला सांगा खून असेल तर खुनी कोण असावा?" प्रशांतने अश्विनीकडे नजर रोखत विचारले.
" ते मी कसं सांगू?" अश्विनीचे ततपप झाले.
" ते सांगता येत नाही.. मग मला सांगा, अनमोलसरांनी केला असेल का खून? कारण बहुतेकदा नवराच बायकोचा खून करतो."
" नाही.. अनमोल का करेल खून?" अश्विनी पटकन बोलून गेली. "म्हणजे अनमोलसर म्हणायचे होते मला." तिने स्वतःला सावरले. प्रशांत परत हसला.
" अच्छा म्हणजे सरांचे मॅडमवर खूप प्रेम होते.."
" असेल.. मला काय माहित?" अश्विनी कडवटपणे बोलली.
" तुम्ही इथेच राहता का? आणि सहाय्यक म्हणजे नक्की काय काम करायचा?"
" मेघनाला म्हणजे मॅमना रात्री अपरात्री कथा सुचायच्या. त्या त्यांच्या अक्षरात लिहून ठेवायच्या. पण त्यांचे अक्षर थोडेसे गचाळ होते. तसेच काही सुधारणा असतील तर त्यांना ते लगेचच दुरूस्त करून हवे असायचे. त्यासाठी मी इथेच रहायला सुरुवात केली."
"तुमच्या घरचे काही बोलत नाहीत? आय मीन मुले, नवरा वगैरे?"
" माझ्या मिस्टरांचे पाच वर्षापूर्वी निधन झाले. आम्हाला मूल झालेच नाही."
" सॉरी.."
" इट्स ओके."
" तुम्ही इथे कशा आलात?"
अश्विनी थोडी घुटमळली..
" मी आणि मेघना एकाच कॉलेजमध्ये होतो.. तिला जेव्हा माझ्याबद्दल समजले तेव्हा ती मला इथे घेऊन आली."
प्रशांत पुढे काही बोलणार तोच राघव आत आला.
" सर सॉरी मध्ये येण्यासाठी.. पण ती सारिका आत येण्याचा प्रयत्न करते आहे. आणि अजून एकजण जबरदस्ती आत येण्यासाठी भांडतो आहे.."
" येऊ दे त्यांना आत.." प्रशांत विचार करत बोलला. राघव बाहेर जाताच त्याने अश्विनीला विनंती केली.
" तुमचे हस्ताक्षर सुंदर आहे ना?"
" म्हणजे बरं आहे.." अचानक आलेल्या या प्रश्नाने ती गांगरली.
" माझ्या ना मुलीचा वाढदिवस आहे आज. मी खरेतर सुट्टीवर जाणार होतो म्हणून खरेदीला वेळ मिळाला नाही. इथे तपासाला किती वेळ लागेल माहित नाही. मला तुमच्या हस्ताक्षरात छानशा शुभेच्छा लिहून द्याल का?"
" मी??"
" मी लिहिल्या असत्या.. पण.." प्रशांतने त्याच्या अंगठ्याला लावलेले बँडेज दाखवले. " तसेही आजकालच्या मोबाईलच्या जमान्यात तुम्ही आणि मेघनामॅडम हाताने लिहायचात म्हणजे ग्रेटच ना.."
" ते मेघनाला मोबाईलवर लिहायला नाही आवडायचे. हातात कागद आणि पेन असला की तिला कसल्या कसल्या भन्नाट कल्पना सुचायच्या म्हणून.."
" असं ही असतं का? आता आम्हाला कसं समजणार? आम्ही पडलो रांगडे गडी. जाऊ द्या. लिहून देताय ना?"
" हो, थांबा. कागद, पेन आणते." बाहेर न जाता अश्विनीने तिकडच्याच एका कपाटातले पेन आणि कागद घेतले. पटापट संदेश लिहून प्रशांतच्या हातात दिले. आणि सुटका झाल्यासारखी बाहेर गेली.. प्रशांतने खालून उचललेला कपटा आणि हा कागद ताडून पाहिला, त्यावरचे हस्ताक्षरही जुळत होते..
" मला वाटलंच.." प्रशांत म्हणाला.
अश्विनी असेल का मेघनाची खुनी? आत येण्यासाठी कोण भांडत असेल? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा