मागील भागात आपण बघितले की प्रत्येकाचा मेघनाच्या मृत्युने फायदा होणार असतो.. बघूया पुढे काय होते ते..
" राघव, आज संध्याकाळी सगळ्यांना बोलावून घे.."
" सर, तुम्हाला समजले कोण आहे खुनी ते?" प्रशांतकडे आदराने बघत राघवने विचारले.
" समजेल.. तुझी ही पहिलीच खुनाची केस ना?"
" हो सर.. मला सांगा ना.. कोण आहे तो?"
" राघवा.. आपण पोलीस आहोत. असा उतावळेपणा बरा नव्हे.. बरे मी जेव्हा आत असेन, तेव्हा आपली एक पूर्ण टीम बाहेर राहू दे.. आणि तू ही सतत माझ्या टचमध्ये रहा."
" ओके सर.." राघव उत्साहात मेघनाच्या बंगल्यावर गेला आणि प्रशांत परत एकदा आपल्या कागदपत्रांकडे वळला.
" या सगळ्यांमध्ये माझे काय काम आहे?" चिडलेली संजना राघवला विचारत होती.
" सर लवकरच सांगतील.." राघव शांतपणे उभा होता. बाजूला बसलेला पार्थ शांत बसला असला तरी त्याच्या चेहर्यावरचे टेन्शन लगेच समजत होते. अश्विनी मुलांना घेऊन बसली होती. अनमोलची चुळबूळ चालली होती. अर्चनाला स्वतःचे तोंड बंद ठेवणे कठीण जात होते. पण मगाशी राघव ज्याप्रकारे संजनाशी बोलला ते बघून ती तोंड बंद ठेवायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात प्रशांत आलाच.
" तुम्हाला जास्त वाट बघायला लावली नाही अशी आशा करतो.." त्याने आल्या आल्या बोलायला सुरुवात केली.
" इन्स्पेक्टर मी.." संजनाने बोलायचा प्रयत्न केला.
" आधी लहान मुले.. बाळांनो मला तुमच्याशी काही बोलायचे आहे." प्रशांतने खिशातले चॉकलेट्स पियु आणि नीलसमोर धरले. दोघांनी एकमेकांकडे बघितले आणि नकारार्थी मान हलवली.
" आई म्हणायची कुणाकडूनही काही खायला घेऊ नये."
" मी कोणीतरी आहे का? पण तुमच्या आईने बरोबरच सांगितले आहे. तुम्हाला चॉकलेट्स नको तर नका घेऊ पण बोलाल ना माझ्याशी?" त्या दोघांनी मान हलवली.
" मला सांगा, तुमच्या आईने कधीपासून तुम्हाला दूर ठेवायला सुरूवात केली?" हा प्रश्न ऐकून अनमोल हडबडला.
" याचा काय अर्थ?"
" तुम्ही जरा शांत बसाल का?" प्रशांतने जरबेने विचारले.
" हां बाळांनो, सांगा.. "
" मी फर्स्टमध्ये असेन.. पियुचा नुकताच जन्म झाला होता. तेव्हा आई आणि बाबांची खूप भांडणं व्हायची. आई खूप रडायची.. मग मी सेकंडमध्ये असताना या आंटी घरी आल्या होत्या. मग आई आम्हाला यांच्यासोबत ठेवू लागली."
" तुम्ही रहायचा?"
" पियु खूप रडायची. ती रडली की मी आणि आईपण रडायचो. तरिही आई मुद्दाम आम्हाला दूर करायची."
" मला शेवटची गोष्ट सांगा.. तुमच्या आईचे तुमच्यावर प्रेम होते?"
" खूप.. बाबा घरी नसले की ती खूप लाड करायची आमचे.. बाबा घरी आले की मात्र." नील बोलताना गप्प झाला.
" बरं.. आता तुम्ही आत जा.. ठीक आहे?" प्रशांतने प्रेमाने विचारले. मुले जाताना बघून अश्विनीपण त्यांच्या सोबत जायला म्हणून उठली.
" कुठे चाललात तुम्ही?"
" ते मुलांसोबत.."
" काही गरज नाही.. नील जाईल खोलीत. जाशील ना?" नील पियुला घेऊन खोलीत गेला.
" तर.. अश्विनी मॅडम तुमचे मिस्टर पाच वर्षांपूर्वी वारले. कशाने वारले ते?"
" ते.. फूड पॉयझनिंगने.." अश्विनी चाचरत बोलली.
" अच्छा.. आणि मग अनमोल कुठे भेटले तुम्हाला?"
" ते.. मेघनाने घरी आणले.."
" आणले की तिला आणायला लावले?"
" म्हणजे?" अश्विनी आता घाबरली होती.
" म्हणजे?? मेघना तुमची कॉलेजची मैत्रिण. तिचे तुमच्याच शेजारी राहणाऱ्या अनमोलशी लग्न झाले. आधी सगळे सुरळीत सुरू होते. पण मेघनाच्या दुसर्या बाळंतपणाच्या दरम्यान तुमची भेट झाली. मग तुम्हा दोघांना वाटले की आपला लग्नाचा निर्णय चुकला म्हणून. तुमच्या भेटीगाठी सुरू झाल्या. मेघनाला याचा संशय आल्यावर ती अनमोलशी भांडायची, रडायची.. पण.. मग सुरू झाला तुमचा प्लॅन.. मेघनाची चिडचिड व्हायची तर तुम्ही तिची समजूत करून दिली की तिला मानसिक आजार झाला आहे. त्यामुळेच ती विनाकारण भांडते आहे. अशा अवस्थेत मुलांना दूर ठेवणेच योग्य.. तिचा विश्वास बसला कारण नुकतेच तिच्या आईवडिलांचे अपघाती निधन झाले होते. आणि बहिणीशी भांडण झाले होते. बरोबर ना अर्चनाताई? काळजावर दगड ठेवून तिने मुलांना दूर केले. आपल्या मैत्रिणीचा नवरा गेला आहे, तिला कोणीच नाही, तिला आधार मिळावा म्हणून मेघनाने तुम्हाला घरी आणले.. पण तुम्ही तिचाच आधार काढून घेतला." अश्विनी रडायला लागली.. अनमोल फक्त बघत उभा राहिला.
" तेच मी सांगत होते कधीची, यानेच मारले आहे माझ्या बहिणीला.. बसला विश्वास?" अर्चनाने शेवटी बोलायला सुरुवात केलीच.
" अर्चनामॅडम ही पावती तुम्ही कुरिअरने काहीतरी पाठवल्याची आहे. काय पाठवले विचारू का?" प्रशांत अर्चनाकडे वळला.
" ते मी तिला आवडतं म्हणून.." अर्चनाचे ततपप झाले.
" आवडतं म्हणून पुस्तके पाठवलीत?"
" तुम्हाला कसे समजले?"
" ते सोडा.. मला सांगा तुमचे मिस्टर कुठे कामाला आहेत?"
" ते एका रासायनिक कारखान्यात मॅनेजर आहेत.. पण त्याचा इथे काय संबंध?"
" अर्चनामॅडम या तुमच्या घरून जप्त केलेल्या पावत्या. तुमचा जमिनीचा लोभ एवढा जास्त होता की त्यापायी तुम्ही तुमच्या स्वतःच्या सख्ख्या बहिणीला तिचा तळतळाट होईल, ती तडफडत मरेल असे बोललात.. हो ना?"
काय उत्तर असेल यावर अर्चनाचे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा