मागील भागात आपण पाहिले की मेघनाच्या शेजाऱ्याने, विक्रमने तिचा खून केला आहे.. का ते बघू..
" का? का मारलेस तू मेघनाला?" अनमोलने विक्रमच्या अंगावर धावून जात विचारले. त्याला प्रशांतने धरले.
" जे काही बोलायचे ते माझे वकीलच बोलतील." विक्रमने एकच वाक्य उच्चारले आणि तो गप्प झाला.
" जशी तुझी इच्छा.. राघव याला बेड्या घाल आणि पोलीस स्टेशनला घेऊन चल."
राघव पुढे झाला. इतका वेळ विचारू की नको विचार करत असलेल्या अर्चनाने विचारलेच.
राघव पुढे झाला. इतका वेळ विचारू की नको विचार करत असलेल्या अर्चनाने विचारलेच.
" पण हाच खुनी आहे हे तुम्हाला कसे समजले?" जवळपास हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. विक्रम सुद्धा उत्सुक होता हे ऐकण्यासाठी. प्रशांत हसला. त्याने बोलायला सुरुवात केली.
" तुम्हाला सगळ्यांना मेघनाचा मृत्यु विषप्राशनाने झाला हे माहित होते. पण कोणते विष हे मी मुद्दाम तुम्हाला समजू दिले नव्हते. आणि इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकानेच मेघनाची विषप्रयोगाने झालेल्या खूनाची कथा वाचली होती. प्रत्येकालाच मेघनाचा काटा वेगवेगळ्या कारणासाठी काढायचा होता. झाले फक्त एवढेच की सगळ्यांची वेळ जुळून आली. अर्चनामॅडमने मेघनाला पुस्तके पाठवली होती.. ती त्यांची आधीच वाचून झाली असावीत हा माझा अंदाज. कारण त्या पुस्तकांची दुसरी प्रत मला त्यांच्या लायब्ररीमध्ये सापडली. संजनामॅडमने पाठवलेली पुस्तके उघडण्याचे कष्टदेखील त्यांनी घेतले नव्हते. अनमोल आणि अश्विनी हे एकमेकांच्या प्रेमात एवढे गाढ बुडालेले होते की मेघनामॅडमच्या आवडीनिवडीकडे लक्ष द्यायला सुद्धा त्यांना वेळ नव्हता. दोघांनी पुस्तक निवडले पण ते त्यांना अजिबात न आवडणार्या लेखकाचे, जे त्यांनी औपचारिकता म्हणून ठेवले असावे. उरला पार्थ.. खरेतर त्याने दिलेले पुस्तक मेघनामॅडम लगेचच वाचत असाव्यात पण इथे मध्ये आला हा विक्रम. आता मला सांगायचे नव्हते पण हा विक्रम एक सराईत खुनी आहे.." हे ऐकताच विक्रमच्या चेहर्यावरचा रंग उडाला.
" मी बरोबर आहे म्हणजे? विक्रम उर्फ आदित्य उर्फ निलेश आणि अजून कोण कोण.." प्रशांतने बोलणे चालू ठेवले. " तर हा विक्रम नुकताच इथे रहायला आला होता. मेघनाला भेटायला येणारी माणसे बघून त्याची तिच्याबद्दलची उत्सुकता वाढली. पहिल्यांदाच त्याने स्वतःहून तिच्याशी ओळख वाढवली. मेघना लेखिका आहे हे त्याला समजले. तो भेटायला आला तेव्हा तिने त्याला स्वतःचे एक पुस्तक भेट म्हणून दिले. पण तिला तो आवडला नाही हे त्याला समजले होते. विक्रम ज्या कामासाठी म्हणजे खुनासाठी इथे आला होता तो त्याने पार पाडला. शहर सोडायच्या आधी सहज म्हणून तो मेघनाला भेटायला आला. ती लिहित होती म्हणून तो तिच्या स्टडीरूममध्ये गेला. त्याला तिथे बघून ती चिडली. ती काही बोलणार तोच तिला अर्चनाचा फोन आला. फोनवर बोलायला म्हणून ती बाहेर गेली तेवढ्यात त्याची नजर ती लिहित असलेल्या कागदावर पडली. कुतूहल म्हणून त्याने ते वाचायला सुरुवात केली. जसे जसे तो ते वाचू लागला तस तसा तो घाबरला.. कारण मेघनाने एक मर्डरमिस्टरी लिहिली होती. त्यात जो खून दाखवला होता अगदी तसाच खून नुकताच विक्रमने केला होता. चोराच्या मनात चांदणे, त्यामुळे आपण केलेला खून मेघनाला समजला असावा आणि तिने तो उतरवून काढला. ही गोष्ट पोलिसांपर्यंत जायच्या आधीच त्याला तिला संपवायचे होते.."
" हो.. संपवायचे होते मला तिला. कारण जर इतरांना कळले असते तर माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले असते. मेघना फोनवर बोलून आली. माझ्या हातात तो कागद बघून ती खूप चिडली. माझी खात्री पटली, तिला माझा संशय आला आहे म्हणून." विक्रम बोलू लागला. "मी हिला कसे संपवायचे याचा विचार करू लागलो. विचाराच्या धुंदीत मी चुकीच्या दरवाजाकडे गेलो. तिथे कुजबुजत्या स्वरूपात मेघनाच्या खुनाचा प्लॅन सुरू होता. मी हसलो. ही संधी मला सोडायची नव्हती. मी त्यांचीच टेक्निक वापरायची ठरवली. हा मुलगा तिला त्यादिवशी भेटायला आलेला मी पाहिला. मी पण त्याच्या मागोमाग लपत आलो. थोड्याचवेळात ते दोघे बाहेर पडले. मी ती संधी साधायचे ठरवले. मी माझ्याकडचे पुस्तक घेतले. घरात पाठीमागच्या खिडकीतून गुपचूप शिरलो. कॅमेऱ्याचे आधी झालेले रेकॉर्डिंग घालवले. पुस्तक बदलले आणि परत आलो. मी हे शहर सोडणार होतो लगेच.. पण माझा संशय येईल असे वाटले म्हणून थांबलो आणि अडकलो." विक्रम स्वतःवरच नाराज दिसला. प्रशांतने राघवला खूण केली. दोन हवालदार येऊन विक्रमला घेऊन गेले.
" त्याचा जबाब रेकॉर्ड केलास?" प्रशांतने राघवला विचारले.
" हो सर.."
"चल मग निघूया.. निघायच्या आधी थोडंसं." प्रशांत बाकिच्यांकडे बघत बोलला. "खरेतर तुम्ही सर्वच मेघनाचे खुनी आहात. तिच्या भावनांचा, तिच्या प्रेमाचा तुम्ही खून केलात. तिचाही खून करायचा होताच तुम्हाला पण तुमच्या नशिबाने विक्रमनेच केला. खुनाचा प्रयत्न करण्याच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करू शकतो. पण त्याने काहीच साध्य होणार नाही हे माहित आहे म्हणून तुम्हाला सोडतो. यापुढे तरी जिवंत माणसांच्या भावनांची कदर करा. मेल्यावर तर शत्रूही फुले घेऊन येतात. बरोबर ना?" प्रशांत डोक्यावरची टोपी नीट करत चालू लागला. त्याच्या पाठोपाठ अभिमानाने राघवही निघाला.
" इन्स्पेक्टर प्रशांत आणि त्यांचा असिस्टंट राघव यांनी नुकत्याच दिलेल्या माहितीनुसार विक्रम नावाच्या खुन्याला अटक झाली आहे.. या बद्दलची नवीन माहिती घेऊन आम्ही लवकरच तुमच्या भेटीस येऊ. कॅमेरामन मनोज सोबत तुमची लाडकी सारिका.. " सारिकाने बोलणे संपवले. जाणाऱ्या राघव आणि प्रशांतने तिला थम्स अप केले.. तिने त्यांना केलेल्या मदतीसाठी.
दीर्घ रहस्य कथा लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न. कसा वाटला ते नक्की सांगा.
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा