अपूर्ण प्रेमकहाणी _
मनाचा कौल_ भाग २
दारावर टकटक ऐकून माधवने बाहेर येऊन दरवाजा उघडला. दारात सकाळच्या स्त्रियांपैकीच एका स्त्रीला पाहून तो म्हणाला,
"रात्रीसाठी काही जेवण हवे आहे का?"
मालाने सरळ त्याला बाजूला करत ती घरात शिरली. माधव तिच्याकडे अचंबित नजरेने पाहतच होता. ही अशी काय अगोचर बाई सरळ घरात शिरली. माधव कडे पहात मालाने आर्त साद घातली,
"माssधव"
इथे आपल्याला माधव म्हणून हाक मारणार कोण म्हणून त्याने क्षणार्धात वळून तिच्याकडे पाहिलं आणि लगेचच तो सुद्धा घोगऱ्या आवाजात म्हणाला,
"माsssला तू'
"हो मीच. तू मला ओळखायला वेळ लावलास पण मी मात्र तुला लगेचच ओळखलं."
माधवने मालाकडे पाहत आपले बाहू पसरले आणि ती आवेगाने त्याच्या मिठीत शिरली. काही काळ दोघे त्याच अवस्थेत होते. माधव म्हणाला,
"माझी नजर थोडी कमजोर झाली आहे ग. आज सकाळपासूनच मला तुझी खूपच आठवण येत होती. तू इथे कशी काय!"
"मी सुद्धा तुला तेच विचारते तू इथे कसा काय. आज इतक्या वर्षांनी देवाने आपली भेट घडवून आणली. तू पुन्हा भेटशील असं कधी वाटलंच नव्हतं. तरीपण तू भेटावंस अशी मनापासून इच्छा होती. माझा विश्वास होता की तू एक ना एक दिवस कधीतरी, केव्हातरी, कुठेतरी मला नक्कीच भेटशील. हे जग खूप लहान आहे रे माधव. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आपली भेट घडवून आणायला आपल्या नशिबाने खूपच वेळ लावला. "
माधवच्या डोळ्यापुढे सर्व भूतकाळ एखाद्या चित्रपटाप्रमाणे सरकला. माधव आणि माला दोघे एकाच चाळीत शेजारी शेजारी राहायचे. त्यांच्या कुटुंबांचा जसा घनीष्ट संबंध होता तशी या दोघांच्यात पण गाढ मैत्री होती. ते दोघे खेळायला, अभ्यास करायला नेहमी एकत्रच असायचे. कधी माला माधवच्या घरी असायची तर कधी माधव मालाच्या घरी असायचा. वयात आल्यावर दोघांमध्ये प्रेमभावना निर्माण झाली. पिळदार शरीरयष्टीचा माधव अभ्यासात बेताचा असला तरी खेळात पारंगत होता. निमगोऱ्या रंगाची, बदामी डोळ्यांची, सरळ रेशमी केसांची माला दिसायला देखणी आणि अभ्यासात पण हुशारच होती. दोन्ही कुटुंबाने त्यांची मैत्री आणि प्रेम सुरुवातीला मान्य केले होते. मालाचे बाबा माधवकडे त्यांचा भावी जावई म्हणूनच पाहत होते. त्यामुळे दोघेही तरुण झाल्यावर पण त्यांच्या भेटण्याला कोणाचीच आडकाठी नव्हती. दिवसेंदिवस त्यांच्यातले प्रेमसंबंध गहीरे होत चालले होते. माला आणि माधवच्या मित्र परिवारामध्ये त्यांच्या प्रेमाची चर्चा नेहमीच होत असे.
दरम्यानच्या काळात मालाचे बाबा नोकरी सोडून बिल्डर लाईनमध्ये गेले आणि तिथे त्यांना नशिबाची साथ मिळाली. त्यांची सांपत्तिक स्थिती खूपच सुधारली. कालांतराने ते एका बंगल्यात शिफ्ट झाले. असं असलं तरी माला आणि माधव यांच्या भेटीगाठी चालूच होत्या. परंतु आता मालाच्या बाबांना श्रीमंत जावयाची स्वप्नं पडू लागली. त्यांनी त्यांच्याच एका व्यावसायिक मित्राच्या बिल्डर लाईन मधल्या श्रीमंत मुलाशी मालाचे लग्न करण्याचे ठरवले. त्यांनी माधवला मालाला न भेटण्याचे निक्षून सांगितलं. माधव त्यांना म्हणाला,
"बाबा माझं आणि मालाचं एकमेकांवर नितांत प्रेम आहे. तुम्ही तर पाहिलंच आहे आमची लहानपणापासून खूप गहिरी मैत्री आहे. मी फक्त तिचा नवरा म्हणून नाही राहणार तर मी तिच्याशी तिचा मित्र म्हणून वागेन. तिला काय हवं नको, तिचं दुखलं खुपलं ह्याची मी नेहमीच काळजी घेईन. तिला खूप सुखात ठेवेन. तुम्ही आणि आई मला खूप चांगले ओळखता. आम्हाला दूर करू नका. आमच्यापैकी कोणीच सुखी होणार नाही. हवं असेल तर तुम्ही मालाला एकदा विचारून बघा. तीसुद्धा तेच सांगेल. मी तर मालाशिवाय दुसऱ्या कोणाशी कधीच लग्न करू शकणार नाही."
माधवने खूप वेळा कळकळीने विनवून सांगितलं तरी सुद्धा बाबांनी त्याचं काहीच ऐकलं नाही. इतकंच काय तर त्यांनी त्याच्याकडून वचन घेतले की तो हे शहर सोडून दुसरीकडे जाईल आणि पुन्हा कधीच येथे परतणार नाही. तो त्यांच्या मित्र-मैत्रिणींपैकी कोणाच्याही संपर्कात राहणार नाही. शेवटी नाईलाजाने माधवने त्याच्या घरी सांगितलं की त्याला बाहेरगावी नोकरी मिळाली आणि तो तिथेच जात आहे. दोन दिवसांत अतिशय जड अंतःकरणाने तो तिथून निघून गेला. माधवने त्याची कर्मकहाणी मालाला सांगताच तिचे डोळे भरून आले.
"बाबा आपल्याशी खूपच वाईट वागले. मी तुला खूप शोधलं रे. नियतीने आपली आणि आपल्या प्रेमाची खूप क्रूर चेष्टा केली. बाबांनी तुझ्या कर्तबगारीवर विश्वास ठेवून श्रीमंत जावयाचा मोह टाळला असता तर आपण एकत्र असतो रे."
"पण तुझं तर दुसऱ्या मुलाशी लग्न झालं ना मग तुझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही.श्रीमंतीच्या काही खुणा नाहीत. हे कसं काय!"
(मालाच्या आयुष्यात त्यानंतर काय घडलं पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा