अपूर्ण प्रेमकहाणी _
मनाचा कौल _भाग ३
मनाचा कौल _भाग ३
माधवच्या प्रश्नावर उसासा टाकत माला म्हणाली,
"अरे बाबांनी मला सांगितलं की त्यांनी माझं त्यांच्या मित्राच्या मुलाशी रवीशी लग्न ठरवलं. मी त्यांना खूप विरोध केला पण काही उपयोग होत नव्हता. त्यांनी मला सांगितलं की मी जर लग्नाला तयार झाले नाही तर ते आपल्या जीवाचं काहीतरी बरंवाईट करून घेतील. मी मनातून घाबरले आणि अखेर मी त्यांना लग्नाला तयार असल्याचे सांगितले आणि त्या रवीला भेटायला गेले. माझ्या मनात आले की मी त्याला समजावून सांगितल्यावर तो मला नकार देईल. मी त्याला भेटायला गेल्यावर तो खूपच खुश झाला आणि म्हणाला,
"तुमच्या बाबांनी माझ्याशी स्वतःहून लग्न ठरवलं म्हणून बरं झालं नाहीतर मी तुम्हाला मागणी घालणारच होतो. मी तुमच्याच कॉलेजमध्ये होतो. तुमची आणि माधवची मैत्री पण मला माहिती आहे. कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी तुमच्यावर प्रेम करतोय. तुम्ही खूप सुंदर आहात. तुमच्या साध्या राहणीने माझ्या मनावर कधीच भुरळ घातली आहे. तुमचे काळेभोर बदामी टपोरे डोळे, लांब सरळ केसांची पाठीवर रुळणारी एक वेणी, गालावर पडणारी मोहक खळी यात मी कधीच अडकलो आहे. यात सर्वात भर म्हणून तुमचा मृदू स्वभाव. तुम्हाला मी नेहमी सगळ्यांशी खूप हसून खेळून वागताना पाहिलं आहे. आज मी तुम्हाला प्रत्यक्ष विचारतो आहे तुम्हाला माझ्याशी लग्न करायला आवडेल ना."
"मी त्यासाठीच तुमच्याकडे आले आहे. लहानपणापासूनच माझं आमच्या चाळीतल्या माधववर प्रेम आहे त्याला तुम्ही ओळखता असं म्हणालात. आम्ही दोघांनी खूप मोठी स्वप्नं पाहिली आहेत. आमची परिस्थिती खूप बदलली आणि आम्ही मोठ्या बंगल्यात राहायला गेलो. माधव मात्र चाळीतच राहत होता. म्हणून माझ्या बाबांनी आमच्या लग्नाला विरोध केला आणि त्यांनी माझे तुमच्याशी लग्न जमवले. त्याला इथून ताबडतोब दुसरीकडे जायला सांगितलं. असं असताना मी तुमच्याशी लग्न करून कधी सुखी होईन असं तुम्हाला वाटतं का. मी तुम्हाला विनंती करायला आले आहे की तुम्ही या लग्नाला नकार द्या म्हणजे मला थोडा अवधी मिळेल. मी माधवचा शोध घेऊन आम्ही पुन्हा एकत्र येऊ शकू."
"तसं पण माधव आता तुमच्या आयुष्यातून निघून गेला आहे . तुम्ही माझ्याशी लग्न करा मी तुम्हाला खूप सुखात ठेवेन. तुमच्या प्रेमाबद्दल मी कधीही उच्चार करणार नाही. माझ्याशी लग्न केल्याचा तुम्हाला कधीच पश्चाताप होणार नाही याची खात्री बाळगा."
"मला वाटलं तुम्ही मला समजून घ्याल. तुम्ही पण माझ्यावर एकतर्फी प्रेम करत आहात. तुम्ही माझं प्रेम समजून घ्यायला हवं. मी तुमच्याशी लग्न जरी केलं तरी मनाने मी तुमची कधीच होऊ शकणार नाही. त्यापेक्षा तुम्ही एखाद्या तुम्हाला साजेशा मुलीशी लग्न केलं तर तुमचं आयुष्य सुखात जाईल."
"अहो एकदा लग्न झालं, सहवास वाढला की सहवासाने प्रेम निर्माण होईल. मी माझ्या चांगल्या वागण्याने आणि प्रेमाने तुम्हाला जिंकून घेईन. अशी कितीतरी उदाहरणं माझ्या नजरेसमोर आहेत. "
"माझ्या बाबतीत असं काहीच घडणार नाही कारण मी लहानपणापासूनच त्याच्यावर खूप प्रेम करते. कृपा करून तुम्ही मला नकार द्या. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही दुसऱ्या मुलीशी लग्न केलं तर तुमच्यात पण सहवासाने प्रेम निर्माण होऊ शकेल."
(मालाची विनंती रवीने मान्य केली की मालाला रवीशी लग्न करावं लागलं. नक्की काय घडलं पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा