अपूर्ण प्रेमकहाणी _
मनाचा कौल_ भाग ४
मनाचा कौल_ भाग ४
मालाची रवीशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती. ती आर्जवी नजरेने त्याच्याकडे पाहत होती.
"ठीक आहे तुमची तशीच इच्छा असेल तर मी नकार देईन."
नंतर रवीने मला नकार दिला आणि मी बाबांना निक्षून सांगितले,
"मी माधवशिवाय दुसऱ्या कोणत्याही मुलाशी लग्न करणार नाही. आयुष्यभर तशीच राहीन. आणि मी माझा भार तुमच्यावर पडू देणार नाही. मी नोकरी करेन आणि एखाद्या वसतिगृहात वेगळी राहीन. मला वाटलं होतं की असं बोलल्यावर ते थोडा विचार करतील आणि आपल्या लग्नाला परवानगी देतील. परंतु तसं काहीच झालं नाही. नंतर मी घराबाहेर पडले."
"म्हणजे तू लग्न केलं नाहीस."
"नाही केलं आणि आज आपण इतक्या वर्षांनी असे भेटलो आहोत. पण तू का लग्न केलं नाहीस. मला वाटलं तुझं लग्न झालं असेल म्हणूनच तू कधी परतुन आला नाहीस."
"अगं माझ्या मनात पण तूच असताना मी तरी दुसरं कोणाशी कसं लग्न करू शकणार होतो. तिथून निघालो ते सरळ या गावात माझा एक मित्र होता म्हणून इथे आलो. इथे सगळेजण शेती आणि घरगुती व्यवसाय करतात. म्हणून मी हा बंगला भाड्याने घेतला. एका खोलीत राहतो आणि बाकीच्या खोल्या पर्यटकांना राहायला देतो. दोन-तीन बायका सकाळी येऊन जेवण करतात आणि पर्यटकांच्या जेवणाची सोय करतात. कोकणी पदार्थ विकतो. बाहेरच्या शहरात पाठवतो. यावरच माझा उदरनिर्वाह चालला आहे. मला एक सांग तुझ्या आई बाबांचं तुझ्यावर किती प्रेम आहे तरी तू घराबाहेर पडल्यावर त्यांना काहीच वाटलं नाही का!"
"नाही ना रे मला त्याचंच खूप वाईट वाटतं. बाबांचा अहंकार त्यांच्या प्रेमा पेक्षा वरचढ ठरला. आईला मात्र माझ्या जाण्याने खूपच दुःख झाले. मी वसतीगृहात राहत असताना बाबांच्या नकळत ती अधून मधून मला भेटून जायची. मी गेल्यानंतर तिने बाबांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु तो निष्फळ ठरला. माझ्या वियोगामुळे माझ्या आठवणी काढून ती दिवसेंदिवस खंगत गेली आणि दहा वर्षांपूर्वी तिचं निधन झालं. आईच्या निधनाने बाबांचा अहंकार पण गळून पडला. त्यांनी मला आईचं अंत्यदर्शन घेऊ दिलं परंतु त्यांनी मला घरात काही घेतलं नाही."
"सख्खे आई वडील आपल्या मुलीशी असं कसं वागू शकतात काही कळतच नाही."
"या जगात देव आहे यावर माझा विश्वास होता आता तो अधिक दृढ झालाय. आता मी माझ्या मैत्रिणींबरोबर परत जाईन. तिकडची सगळी निरवानिरव करून मी इथे तुझ्याजवळ कायमची येईन."
"माला आता आपलं काय राहिलं आहे. अर्ध्यापेक्षा आयुष्य तर संपलं आहे. इथे येऊन आगीतून सुटून फुफाट्यात पडल्यासारखं तुझं व्हायला नको."
"माधव ते मला काय माहित नाही आपलं किती आयुष्य उरलंय हे सर्व त्या देवालाच माहीत. हो पण या घडीला मला तुझा आधार हवाय. मला तुझ्याकडून काहीच अपेक्षा नाही. आपण दोघं एकत्र राहू हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. कधीतरी तू मला चहा करून दे, कधीतरी मी तुला चहा करून देईन. मी तुझ्यासाठी लोकरीचा स्वेटर विणेन. तुला आठवतं मी आधी पण तुझ्यासाठी एक स्वेटर विणायला घेतला होता पण तो अर्धवटच राहिला. आपण दोघं इथल्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यावर जाऊन बसू. इतक्या वर्षातल्या राहिलेल्या गप्पा निवांतपणे मारू. तारुण्यातलं आपलं जे सुख हरवलं त्याचा शोध घेऊ. एकमेकांच्या सहवासात उरलेलं आयुष्य आनंदाने व्यतीत करू."
(मालाचं माधव बरोबर राहण्याचे स्वप्न पूर्ण होईल का? माधव तिला हो म्हणेल का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
"
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा