अपूर्ण प्रेमकहाणी_
मनाचा कौल _ भाग ५(अंतिम)
मनाचा कौल _ भाग ५(अंतिम)
मालाने माधव बरोबर राहण्याच्या स्वप्निल भावना व्यक्त केल्यावर माधव पण खूप हळवा झाला. त्यालाही वाटू लागले की काय हरकत आहे आता आपण दोघांनी एकत्र राहिलं तर. माधवने या जगाचा हर तऱ्हेने अनुभव घेतला होता म्हणून तिला समजावण्याच्या इराद्याने तो म्हणाला,
"माला आता अचानक तू माझ्या जीवनात आलीस तर लोक काय म्हणतील. तुला तुझी नोकरी आहे. तुझं आयुष्य सुरळीतपणे चालू आहे. तुझ्या मैत्रिणींबरोबर तू सुखात रहा अशीच अधूनमधून फिरायला जात जा. जीवनाचा आनंद घे."
"अरे लोक म्हणजे तरी कोण रे. जेव्हा आपल्याला गरज होती तेव्हा आपल्या पाठीमागे कोणी खंबीरपणे उभं राहिलं का? तुझ्या घरचे पण तू असा अचानक निघून गेल्यावर सुद्धा आयुष्य जगतच राहिले ना. माझ्या सुखाचं म्हणशील तर मी माझ्या मनातलं दुःख मनातच ठेवलंय. हा सुखी आयुष्याचा मुखवटा आहे. माझं खरं सुख तुझ्याबरोबर राहण्यात आहे. आता तू माझा हट्ट समज आणि मान्य कर."
माधवला त्याही परिस्थितीत मालाच्या अढळ प्रेमाचं कौतुक वाटलं. आपलं पण मालावर अजून पराकोटीचं प्रेम आहे. आयुष्यात आपली ताटातूट होईल असं त्यावेळी कधीही वाटलं नव्हतं. आपण दोघांनीही सुखी संसाराची स्वप्न रेखाटली होती. स्वप्नांचा इमला असा कधी ढासळेल विचारच केला नव्हता. तो द्वीधा मनःस्थितीत सापडला. आयुष्याच्या सांज उतरणीवरती मालाचा सहवास त्याला हवाहवासा वाटू लागला.
"तू कायम अशी मुंबई शहरात राहिलेली आहेस तुला हे असं आडगावात येऊन राहणं करमणार नाही. त्यापेक्षा तुझी नोकरी चालू ठेव आणि मी सुद्धा मुंबईला येईन. आपण कुठेतरी उपनगरात एखादा छोटासा फ्लॅट घेऊन राहूया. आता मला कोणी नोकरी तर देणार नाही हे नक्कीच. पण मी हा माझा व्यवसाय इकडून जिन्नस मागवून पुढे चालवू शकेन. म्हणजे आपण आपल्या कामांमध्ये व्यस्त राहू आणि एकमेकांसोबत राहायचं आपलं स्वप्नही पूर्ण होईल."
"नाही नाही माधव आता मला त्या शहराचा पण कंटाळा आलाय. मी माझ्या नोकरीचा राजीनामा देऊन मला जे पैसे मिळतील ते आपण बँकेत ठेवू त्याचं व्याज मिळेलच. तुझ्या व्यवसायात मी तुला मदत करेन. इथे शांत निवांत या गावातच आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत करूया. या निसर्गाच्या सानिध्यात खूप मोकळं मोकळं वाटतंय. मुख्य म्हणजे मला माझं प्रेम याच गावात परत मिळालं आहे."
"मलासुद्धा तुझ्याबरोबर राहायला नक्कीच आवडेल. आता आपल्याला कोणीच वेगळं करू शकणार नाही. आता आपण आपल्या मनाचा कौल काय याचाच विचार करू. उशिरा का होईना आपण एकत्र येतोय याचे कारण आपल्या दोघांमध्ये असलेली आंतरिक ओढ." असं म्हणून माधवने मालाचे हात हातात घेतले. आत्यानंदाने दोघे एकत्र गुणगुणू लागले,
'युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा
युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा
सहवासाची ओढ निरंतर
सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा...'
युगायुगांचे नाते अपुले नको दुरावा
सहवासाची ओढ निरंतर
सहवासाची ओढ निरंतर नको दुरावा...'
समाप्त
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा