अपूर्ण

गोष्ट एका अपुर्णतेची
स्वतःच्या पैशांनी घर विकत घेतलं म्हणून अवंतिकाला कित्ती आनंद झाला होता! निदान आता तरी सासुबाई आपलं कौतुक करतील म्हणून ती उगीचच त्यांच्यासमोर उठबस करत होती. "आई, खायला काय आणू? काय करू?" म्हणून विचारत होती. चित्राताई काही बोलत नाहीत हे पाहून, न राहवून तिने चहा करायला घेतला. आल्याचा चहा! अगदी त्यांना आवडतो तसा.

चहाचा वास घरभर पसरला. तशी अवंतिकाला आणखी तरतरी आली.
"आई, चहा घ्या." तिने सासुबाईंच्या पुढ्यात कप टेकवला.

"हे काय, आज इतक्या लवकर चहा?" सासुबाई घड्याळाकडे पाहत म्हणाल्या.

"हो. पाच वाजता नव्या घराची चावी मिळणार आहे. ती घ्यायला जायचं आहे म्हणून म्हंटल पट्कन आवरून घेऊ. आपण दोघी इथून कारने जाऊ. अभिष ऑफिसमधून परस्पर येईल."

"आज चहात आलं जरा जास्तच पडलंय. दोन बिस्कीटं दे बाई." सासुबाई चेहरा कसानुसा करत म्हणाल्या.

"बिस्किटं देते मी. पण चहा झाला की तुम्ही आवरून घ्या." अवंतिका आत आली. चार बिस्किटं एका डिशमध्ये ठेऊन तिने सासुबाईंना दिली.

"तरीही चहा झणझणीत लागतोय." पुन्हा त्यांचा तक्रारीचा सूर कानावर आला.

"नाही आई, चहा छान झालाय. अगदी तुम्हाला आवडतो तसा." अवंतिका हसून म्हणाली खरी. पण सासुबाईंना काहीतरी खटकलं आहे हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होतं.
"काय झालं आई? माझं काही चुकलंय का?" अवंतिका आईंच्या जवळ जात म्हणाली.

"नाही गं. तुम्ही आजकालच्या पोरी कधी, कुठेही चुकत नाही. आम्ही बिनकामाची, म्हातारी माणसं चुकतो."

"म्हणजे? तुम्ही काय बोलता आहात मला काही कळत नाहीय. जर मी तुम्हाला काही बोलले असेन तर सॉरी. पण आजच्या या आनंदाच्या प्रसंगी असं बोलू नका ना. आई, गेली बारा वर्षे मी झपाटून काम केलं. घर - दार सांभाळून प्रमोशनस् स्वीकारली. तीन वेळा वरची पोस्ट हाताळली. हे सगळं सोपं नव्हतं. त्यासाठी काय काय सहन करावं लागलं, हे माझं मलाच माहित."

"पण शेवटी घराकडे, माझ्याकडे, नवऱ्याकडे दुर्लक्ष झालंच ना?" ताईंच्या या वाक्याने अवंतिकाला धक्का बसला.
"आई..काय बोलता हे? मी तुमच्याकडे दुर्लक्ष का करेन? तुमचा पाठिंबा होता म्हणून आज हे नवं घर घेणं शक्य झालं. तुम्ही घरची जबाबदारी घेतलीत. तरी मी सगळं करून जात होते. बाकी वर कामाला मावशी होत्या. शिवाय दोन वर्ष अभिषकडे काम नव्हतं तेव्हा तो हे घर सांभाळायचा ना?" अवंतिका.

"दोन वर्ष नवऱ्याच्या हाताला काम नव्हतं म्हणून तू कमवून घातलंस, तेव्हा कुठे हे घर उभं राहिलं! नाही का? त्याला बायकांसारखी घरातली सगळी कामं करायला लावलीस, शिकवलीस आणि त्यानेही आनंदाने सगळं केलं." सासुबाई नाराजीने म्हणाल्या.

"मी करायला भाग पाडलं नाही. त्याने स्व -खुशीने ते स्वीकारलं होतं. कारण त्याला या फस्ट्रेशन देणाऱ्या कामापासून काही काळ सुटका हवी होती." नाही म्हटलं तरी अवंतिकाचा आवाज चढला होता.

"कसली सुटका? घरातही तेच होतं आणि बाहेरही तेच. पदरी मूल नाही म्हणून तो एकटाच रडत, कुढत बसलेला असायचा. कितीतरी वेळा मी तसं पाहिलं होतं त्याला. शेवटी तुमचा संसार अपूर्ण राहिला म्हणायचा." चित्राताई कुत्सितपणे म्हणाल्या.

"आई, मलाही मूल हवं होतं."

"मग? त्यासाठी प्रयत्न का केले नाहीस?"

"आणखी काय करायला हवं होतं मी?
ते अगणित रिपोर्ट्स, इंजेक्शन्स, औषधं - गोळ्या. कित्येक दवाखान्यांचे उंबरठे झिजवले असतील आम्ही! तासनतास केलेलं वेटींग, हरतर्ऱ्हेच्या ट्रीटमेंटस् आणि कायम हाताशी आलेलं अपयश.." अवंतिका उसासा टाकून म्हणाली. चित्रा ताईंची नजर चोरत तिने चहाचा कप उचलून आत नेला.

"आनंदाच्या प्रसंगी या डागण्या कशाला आई? हे दुःख पचवण्यासाठी अवंतिकाने स्वतःला कामात गुंतवून घेतलं आणि त्याची परिणीती आज तुझ्यासमोर आहे." अभिष आत येत म्हणाला.

"तू आलास? थेट नव्या घरी जाणार होतास ना?"

"हो. बेत बदलला म्हणून आलो. पण बरं झालं आलो ते. नाहीतर तुझ्या मनात काय आहे हे कळलंच नसतं मला." अभिष आईला म्हणाला.


अवंतिकाला हाक मारूनही ती ओ देईना म्हणून तो खोलीत आला.
"अवंतिका, तुला रडायला काय झालं?"

"काही नाही."
अभिषच्या आवाजाने तिने घाईघाईने डोळे पुसले.

"चल, आवर लवकर. आज तुझ्या मालकीचं, हक्काचं घर तुझ्या ताब्यात मिळणार म्हणून तुझा चेहरा कसा फ्रेश हवा ना?" अभिष तिला जवळ घेत म्हणाला. त्याच्या मिठीच्या उबदार स्पर्शाने अवंतिकाचा बांध अखेर फुटला.

"मी ऐकलंय सगळं. तू आईकडे नको लक्ष देऊ. उलट देवाचे आभार मान."

"का? आईंनी निदान आज तरी हा विषय काढायला नको होता रे." अवंतिकाचा चेहरा आश्चर्य, दुःख, निराशा अशा भावनांनी भरून गेला.

"बघ, आज आईच्या मनात जे काही होतं ते बाहेर पडलं. पण मी खुश आहे. तू आनंदी आहेस ना? मग जगाची फिकीर कशाला करतेस? ती बोलून मोकळी झाली इतकंच समज.

"अभि, हे दुःख लपविण्यासाठी मी स्वतःला कामात गुंतवून घेतलं. मन लावून काम केलं.
बाकी कुठल्याही विचारांना मनात थारा दिला नाही. माझ्या पाठीमागे कोण काय बोलतं? काय विचार करतं? हे सगळं मला माहिती होतं. मात्र मनाचा तोल कधी ढळू दिला नाही. आपल्याच माणसांनी असा विचार करावा यापेक्षा मोठं दुःख नाही."

"तू खुश आहेस ना? मग जगाचा, आपल्या माणसांचा विचार आत्ता नको. चल, आवर. आपण दोघे जातोय. इतरांच्या मनाला काय खुपतं यावर आपला आनंद थोडीच अवलंबून आहे? आजवर जसं दुर्लक्ष करत आलीस, तसंच इथून पुढेही करावं लागेल. हे लक्षात ठेव."

अवंतिका झटपट आवरून बाहेर आली. 'आपल्याला नेहमी समजून घेणारा, पाठीशी ठामपणे उभा राहणारा, कायम साथ देणारा नवरा असल्यावर आयुष्य अपूर्ण कसं असेल?'
अवंतिकाने समाधानाने अभिषकडे एक नजर टाकली.

"आई, आज माझ्या बायकोने मेहनतीने कमावलेल्या घराचं पझेशन आपल्याला मिळणार आहे. आम्ही दोघे जाऊन येतोय."

पुढचे काही क्षण शांततेत गेले.
"आणि हो, तुला माहिती आहेच. यामध्ये अवंतिकाचा काहीही दोष नाहीय. दोष तर माझ्यात होता."

"उगीच काहीतरी बोलू नको अभिष. असं काही नसतं. माझ्या मुलांत दोष असूच शकत नाही." चित्रा ताई चिडून म्हणाल्या.

"कोणालाही सांगूनही पटलं नसतं म्हणून अवंतिकाचा असा हट्ट होता की हे बाहेर कोणाला कळता कामा नये. मीही लाजेपोटी बोलू शकलो नाही. ती माझी चूक झाली. तुझ्याकडून थोडंफार का होईना पाठबळ मिळालं असतं तर गोष्टी आणखी सोप्या झाल्या असत्या."

"म्हणजे मी काही लक्ष दिलं नाही असं म्हणायचं आहे तुला?"

"हो. सगळ्याच बाबतीत तटस्थ राहिलं म्हणजे सासू होण्याचं कर्तव्य पार पाडलं असं म्हणता येत नाही." कधी नव्हे ते अवंतिका सासुबाईंना म्हणाली.

"एखादं मूल दत्तक घ्यायचा अवंतिकाचा विचार होता. पण इतकी वर्षे मीच तिला विरोध करत आलो. पण आता नाही..माझ्यामुळे तिला खूप काही ऐकून घ्यावं लागलं. नवरा म्हणून मी कमी पडलो आई.
तूही कधी जवळ येऊन मला विचारलं नाहीस. खोलीत बसून मी एकटाच विचार करायचो. तू येऊन बघायचीस आणि निघून जायचीस. अवंतिकाने मात्र हा दोष स्वतःवर घेऊन, कोणालाही कळू न देता सहन केलं. ती दुःख बाजूला ठेऊन लढली आणि मी मात्र ते दुःख पचवता न आल्याने अजूनही तसाच त्या दुःखाच्या किनाऱ्यावर उभा आहे. घर अपूर्ण का राहिलं याचा विचार तूही करायला हवा होतास."

इतकं बोलून अभिष घरातून बाहेर पडला. पाठोपाठ अवंतिका बाहेर पडली.

चित्रा ताई मात्र आपण कुठे कमी पडलो? याचं उत्तर शोधण्यात मग्न झाल्या. याचं उत्तर त्यांना मिळणार नव्हतं आणि मिळालं तरी त्या मान्य करणार नव्हत्या. हेही तितकंच खरं होतं.

समाप्त.
©️®️ सायली जोशी.

सदर कथानक कुठेही सादर करण्यास परवानगी नाही.