Login

अपूर्णतेचा कलंक २

एका निपुत्रिक स्त्रीचा लढा
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

जलद कथालेखन (संघ कामिनी)

अपूर्णतेचा कलंक

©® भालचंद्र नरेंद्र देव

भाग २

श्रुतीच्या आयुष्यात जणू नंतरचे क्षण एकसंध झाले होते, एकच दिवस पुन्हा पुन्हा जगू लागावा, अशी काहीशी तिच्या आयुष्याची जडणघडण झाली होती. मूल नसल्यामुळे होणारा समाजाचा दबाव आता तिला आतून पोखरू लागला होता.

सुरुवातीला लोक कुजबुजायचे. आता ते उघड बोलायला लागले होते.

सोसायटीत कुणाचेही बाळंतपण झाले की कार्यक्रमासाठी श्रुतीला निमंत्रण दिले जायचे नाही.

सासूबाई देखील सहज बोलून जात,
“बरोबर आहे, नाहीतर अपशकुन व्हायचा. बाळंतीण स्त्रीभोवती अपुऱ्या स्त्रीने फिरू नये असे म्हटलेलेच आहे.”


गणपती, दिवाळी, होळी सगळ्या सणांमध्ये तिला काठावरच उभे केले जाई. कधी पूजेसाठी कुंकवाचे ताट देखील तिच्या हातात दिले जात नसे. तिने विचारले तर तिला उत्तर मिळत असे,

“मातृत्व न आलेल्या वांझ बायका पूजेच्या वस्तूंना हात लावत नाहीत.”

अगदी नुकतीच एक घटना घडली होती. त्यांच्या शेजारच्याच घरातील वहिनींचे बाळ गर्भातच गेले आणि गावात कुणीतरी म्हणाले,

“श्रुती आली होती ना त्याच दिवशी. काहीतरी दृष्ट लागली असेल तिचीच.”

श्रुतीच्या काळजावर हे सगळे एकेक करून घाव करत होते; पण आकाश? तो अजूनही शांत, न बोलणारा... समजूनही न समजल्यासारखे करत घरात ये जा करत असे.

ती दरमहा डॉक्टरांकडे जाऊ लागली होती. सोनोग्राफी, ब्लड टेस्ट, हार्मोन टेस्ट यांत काहीच अडचण नव्हती. तिचे सगळे रिपोर्ट्स साफ होते. शेवटी एक दिवस तिने आकाशसमोर विषय काढला.

“आकाश, मी माझे सगळे रिपोर्ट्स तपासून घेतले आहेत. सगळे नॉर्मल आहेत. डॉक्टर म्हणाले, तूही एकदा चेकअप करून घ्यावेस.”

त्याचा चेहरा पटकन उतरला. तो उठला, खोलीतच चालू लागला.

“माझ्यात काही प्रॉब्लेम असण्याचा प्रश्नच येत नाही!” त्याचा आवाज थोडा वाढला होता.

"हे असले डॉक्टरांच्या सल्ल्यांवर विश्वास ठेवणे बंद कर! हे सगळे तुझ्या शरीराशी संबंधित आहे, माझ्याशी नाही!”

श्रुती गप्प झाली. तिने केवळ आश्चर्यपणे आणि रागाने त्याच्याकडे पाहिले. तिच्या नजरेत प्रश्न होते; पण तिला त्याच्याबरोबर वाद घालायचा नव्हता.

आकाशला काही क्षणांनी त्याचा वाढलेला आवाज लक्षात आला आणि मग पुढे तो हळुवारपणे श्रुतीला म्हणाला,

“काय पाहिजे तुला? मी तुझ्यासोबत आहे ना. लोक काय बोलतातच, त्यांच्याकडे का लक्ष देतेस? आपला राजाराणीचा संसार आहे कशाला लोकांच्या बोलण्यांना एवढे महत्त्व द्यायचे?”

पण श्रुतीला हेच कळत नव्हते की आकाश तिला खरंच समजून घेत नव्हता? की तो काहीतरी लपवायचा प्रयत्न करत होता?

ती विचार करू लागली, ‘जर दोष माझ्यात नाही आणि तो तपासायला तयार नाही, तर खरे काय आहे ते कसे कळणार?’

हल्ली तिला रात्री झोप येण्यास बराच वेळ लागत असे. त्यात विचार करून करून तिचे डोके दुखू लागे; पण आजच्या त्या आकाशच्या एका वाक्याने तिला आतून हादरवून टाकले होते.

“हे सगळे तुझ्या शरीराशी संबंधित आहे, माझ्याशी नाही!”

‘तिचे अस्तित्व केवळ एक ‘शरीर’ आहे का?’, ‘आई होणे हे एकट्या तिच्या हातात असते का?’, ‘ही एकट्या स्त्रीची जबाबदारी आहे का?’ हे प्रश्न तिच्या मनाला पोखरत होते.

सकाळी आरशासमोर उभी राहून तिने स्वतःला पाहिले. सडपातळ शरीर, कोमल चेहरा; पण डोळ्यांत एक प्रकारची खिन्नता पसरलेली होती.


तिने मनाशी ठरवले ‘हे असे चालणार नाही. मला याचे उत्तर जाणून घ्यायचे आहे आणि त्यासाठी मला काहीही करावे लागले तरी मी ते करीन, भले ते चुकीचे असले तरी देखील!’

क्रमशः

© भालचंद्र नरेंद्र देव (संघ कामिनी)
0

🎭 Series Post

View all