Login

अपूर्णतेचा कलंक ३

एका निपुत्रिक स्त्रीचा लढा
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

जलद कथालेखन ( संघ कामिनी)

अपूर्णतेचा कलंक

©® भालचंद्र नरेंद्र देव

भाग ३

श्रुती आता गोंधळलेली नव्हती, ती ठाम होती. आकाशला थेट सांगून काहीच साधणार नाही, हे तिला उमजले होते; पण सत्य शोधणे गरजेचे होते, तेही गप्प राहून! तिने सावधपणे तिची पुढची पावले टाकायला सुरुवात केली.

एका रात्री तिने आकाशचे सॅम्पल गुपचूप चोरून ठेवून घेतले. आकाशला त्याबद्दल काही संशय येणार नाही याची तिने खात्री केली. त्याला काही न समजता, हे सगळे शक्य झाले याबद्दल तिने स्वतःलाच शाबासकीही देऊन टाकली.

आपल्या मेडिकल कॉलेजमधील मैत्रिणीच्या मदतीने केलेल्या टेस्ट्सचे दोन दिवसांनी रिपोर्ट्स आले. श्रुतीचे हृदय धडधडू लागलेले.

रिपोर्ट्स स्पष्ट होते, 'Aakash suffers from azoospermia.' (शुक्राणूंची अनुपस्थिती, पुरुष वंध्यत्व)

ते पाहून श्रुती काही क्षण शांतच बसली. तिला धक्का बसला होता. तिच्या डोळ्यांत पाणी आले, ते दु:खाचे होते की अजून कशाचे हे तिला देखील कळत नव्हते; पण आता तिला उत्तर मिळाले होते. कित्येक वर्षांपासून ती जी 'चूक' स्वतःत शोधत होती, ती तिची नव्हतीच!

पण या सत्याने एक वेगळे ओझे तिच्या मनावर येऊन बसले होते. संध्याकाळी जेव्हा आकाश घरी आला तेव्हा तिने शांतपणे त्याच्याशी बोलायचे ठरवले, न चढणाऱ्या आवाजात, न कुठल्या तक्रारीत; पण तिला त्याच्याकडून उत्तर हवे होते.

“आकाश, मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायचीय; पण तू आधी शांत ऐक.”

आकाश तिच्या चेहऱ्याकडे पाहत थांबला.

ती पुढे म्हणाली, “मी तुझ्या नकळत तुझ्या टेस्ट्स करून घेतल्या. मला माफ कर; पण मला खरे जाणून घ्यायचे होते आणि आता मला ते माहीत झाले आहे.”

आकाशचा चेहरा पांढराफटक पडला.

“काय... काय माहीत आहे तुला? कसल्या टेस्ट्स केल्यास तू? ते पण मला न विचारता?” त्याने चढ्या आवाजात विचारले.

श्रुतीने केवळ मान हलवली. ती त्याच्या आवाजाने या वेळी घाबरलेली नव्हती.

“तीच टेस्ट ज्याला तू सारखा–सारखा नाही म्हणत होतास.”

आकाशला कळून चुकले की श्रुतीला सगळे कळले आहे. तो खुर्चीत बसला. दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकला होता. त्याचे शरीर कंप पावत होते, हात थरथरत होते. काही क्षणांनी तो रडू लागला. जणू कित्येक वर्षांचे दडपण आता त्याच्याकडून बाहेर पडत होते.

“माफ कर मला श्रुती. मी घाबरलो होतो. मी… मी ते सहन करू शकत नव्हतो. 'नपुंसक', 'नामर्द' लोक मला काय काय बोलतील याचीच भीती वाटायची.”

श्रुती त्याच्याकडे पाहत राहिली. तिला राग आला नाही. तिला त्याची कीवही आली नाही. फक्त एक खोल निराशा वाटली होती.

“मी इतकी वर्षं दोषी ठरत गेले, अपशकुनी समजली गेले आणि तू गप्प बसलास! खरे सांगायचे धाडस नव्हते का?”

आकाश पुन्हा डोळे पुसत म्हणाला,
“माझ्या आत्मविश्वासाची धूळधाण झाली असती श्रुती. माणूस म्हणून मी संपलो असतो. मला वाटले होते, हे गुपित लपवता येईल.”

श्रुती थोडा वेळ गप्प बसली. मग म्हणाली,
“हे गुपित लपवून तू स्वतःला वाचवलेस; पण मला हरवलेस.”

आकाश तिला जवळ घेऊन बोलू लागला,
“प्लीज! कोणालाही सांगू नकोस. आई-बाबा, समाज मला वेगळ्याच दृष्टीने पाहतील. माझा सगळीकडे अपमान होत राहील.”

श्रुती शांतपणे उठली.

“मी अजून काही ठरवले नाहीये; पण मला स्वतःवरचा विश्वास परत मिळाला आहे. आता जे पण करायचे आहे ते आपण डॉक्टरकडे जाऊन तुझ्याबद्दल करू शकतो आणि त्याला तू नाही म्हणू नकोस.”

क्रमशः

© भालचंद्र नरेंद्र देव ( संघ कामिनी)
0

🎭 Series Post

View all