Login

अपूर्णतेचा कलंक ४

एका निपुत्रिक स्त्रीचा लढा
" चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ "

जलद कथालेखन (संघ कामिनी)

अपूर्णतेचा कलंक

©® भालचंद्र नरेंद्र देव

भाग ४

घरातल्या गणपतीची स्थापना झालेली होती. संपूर्ण कुटुंब, शेजारी-पाजारी आणि नातेवाईकांनी घर भरलेले होते. पूजेचे वातावरण, मंत्र, टाळ-मृदुंग यांमध्ये दिवसभर घर गजबजलेले होते; पण श्रुती मात्र अजूनही एकटीच होती. गोंधळातही एका शांत कोपऱ्यात बसून होती. तिला गणपती मूर्तीजवळ जाण्याची परवानगी नव्हती. अगदी दुपारच्या आरतीच्या वेळी देखील तिला कापूर आरती घेऊ दिली नव्हती.

संध्याकाळी आरतीनंतर सर्व मंडळी बसली होती आणि अचानक आकाशची आई सरोजताई, सगळ्यांसमोर आकाशच्या वडिलांना बोलू लागली. तिचा आवाज उंचावलेला आणि टोचणारा होता.

“अहो, वय निघून जातंय. नातू बघायला कधी मिळणार देव जाणे! समोरच्या एकताच्या घरात बघा, काही वर्षांतच दोन मुले बागडायला देखील लागली आणि यांचे लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी अजून काहीही नाही. मी काय म्हणते, आता श्रुतीवर फार वेळ वाया घालवायला नको. आकाशचे दुसरे लग्न केले तर निदान घरात बाळांचे पाय तरी पडतील.”

सगळ्यांच्या नजरा श्रुतीकडे वळल्या. कुणी हसत होते, कुणी दया दाखवत होते; पण कुणीच विरोध करत नव्हते. आकाश बसून होता. उलट तो देखील त्याच्या आईकडे पाहत हसत होता. त्याला सगळे माहीत असून देखील तो त्याच्या आईला विरोध करत नव्हता.

श्रुतीला प्रचंड राग आला. तिच्या छातीतून घुसमट बाहेर पडणार होती; पण फरक इतकाच की आज ती अश्रूंनी नाही, तर शब्दांतून प्रकट झाली.

ती रागाने उभी राहिली. सगळ्या गर्दीकडे पाहत त्यांना म्हणू लागली,

“तुम्ही म्हणता मी दोषी आहे, कारण मी आई होऊ शकले नाही; पण तुमची खरे ऐकायची तयारी आहे का?”

गर्दी गप्प झाली. तिने एक क्षण आकाशकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर भीती दाटू लागलेली.

श्रुती पुढे म्हणाली,
“मी नाही, तर तुमचा मुलगा… आकाशचे शरीर अपूर्ण आहे. त्याच्यातच मूल होण्याची क्षमता नाही. हे मला खूप आधीच समजले होते; पण मी गप्प राहिले. त्याच्या आत्मसन्मानासाठी, तुमच्या कुटुंबाच्या इज्जतीसाठी!”

तिचे शब्द जणू स्फोट झाले होते. लोक अवाक झाले. कोणाच्या तरी तोंडातून अचानक आवाज आला, “काय?”

आकाश उठला, “श्रुती, थांब.”

पण ती आता थांबणारी नव्हती.

“मी इतकी वर्षं अपशकुनी समजली गेले. लोकांच्या बोलण्याने खचले, सणांमध्ये मला बाजूला ठेवले गेले; पण आता मी स्वतःला हरवू शकत नाही. मीही माणूस आहे. माझ्या मनात देखील भावना आहेत. मी दोष नसताना दोष झेलण्याचा निर्णय घेतला होता; पण आता कुठल्यातरी दुसऱ्या स्त्रीच्याबरोबर देखील हेच होईल. त्यामुळे आता मी शांत बसणार नाही.”

सरोजताई सुन्न झाल्या होत्या. त्यांचा चेहरा पांढराफटक पडला. सगळीकडे चिडीचूप शांतता झाली, एकदम शांत!

श्रुती अखेर म्हणाली,
“हे सगळे मी सूड घेण्यासाठी सांगितलेले नाही. मी केवळ माझा स्वाभिमान वाचवण्यासाठी बोलत आहे. कारण सत्य जितके लपवले जाते, तितकेच ते वेदनादायक ठरते.”

तिने आत जाऊन तिची पर्स घेतली. साडी नीट करत दारापाशी आली आणि निघता निघता शेवटचे वाक्य बोलून गेली,
“मी आता ह्या खोट्या आयुष्याचा भाग राहणार नाही. तुम्हाला नातवाची अपेक्षा आहे; पण मला सन्मानाची! आणि आता माझे मूक राहणे संपले आहे.”

ती दरवाजा उघडून निघून गेली. आकाश मागे उभा राहिला. सुन्न, अपराधी, कोसळलेला... त्याच्या डोळ्यांत पश्चात्ताप होता; पण आता वेळ निघून गेलेली होती.

क्रमशः

© भालचंद्र नरेंद्र देव (संघ कामिनी)
0

🎭 Series Post

View all