भाग एक
"ए तायडे, अजून आहे का ग हे? खुप छान आहे."
"अरे वेड्या ह्याला समोसा म्हणतात. आज दिवाळी आहे म्हणून काही लोक आले होते सिग्नल वर वाटायला. तिथं मी होते मला पण भेटलं."
"हो मला माहितीये. मी रोज बघायचो दुकानात. खूप वेळा लोकांना खाताना पाहून मला पण इच्छा व्हायची खायला आणि गण्या ने तर माहितीये का एका काकांच्या हातून हिसकावून घेतला होता."
"काय..? तुला किती वेळा सांगितलं आहे त्याच्या सोबत राहायचं नाही ते. तु तर नाही ना केलं अस कधी..?
"नाही ग तायडे. मी खूप वेळा त्या शेट जी कडे मागितलं त्याने कधी दिलं नाय. नेहमी हाड तुड करून हकलावून दिलं पण असं गण्या सारखं कधीच केलं नाय ग मी." हे ऐकुन मिता ने सुटकेचा निःश्वास सोडला.
"तायडे एक विचारू का..?"
"विचार"
"आपण कधी करायची दिवाळी साजरी..?"
"अरे आपल्या सारख्यांची कुठे आलीय दिवाळी. लोक कधी कधी जे देतात त्यातच तर दिवाळी होते आपली. तेच घ्यायचं गोड मानून."
"मला बी फटाके हवे." थोडा वेळ गप्प राहून संजू म्हणाला.
"आता हे काय नवीन..? तुला कशाला हवेत फटाके?"
"मला दिवाळी साजरी करायचीय मला फटाके हवेत. नाहीतर.."
"नाहीतर काय..?" हातातलं काम टाकून मिता त्याच्या कडे पाहत म्हणाली.
"मी जाईन गण्या सोबत फटाके चोरी करायला." असं म्हणत तो तिथून पळून गेला. तिने त्याला खूप आवाज दिला पण त्याने मागे वळून पाहिले नाही. कधी न हट्ट करणाऱ्या संजू ला असं हट्ट करताना पाहून मिता चकित झाली. त्याहून आता म्हणजे फटाके आणायचे कुठून हा मोठा प्रश्न तिच्यापुढे निर्माण झाला.
डोक्यावर निव्वळ ताडपत्रीच छप्पर असलेल्या घरात मिता आणि तिचा लहान भाऊ संजू राहत असे. वडील दारू पिऊन आई ला मारत असायचे. त्याच जाचाला कंटाळून आईने गाडी खाली येऊन आत्महत्या केली होती. रस्त्यावर राहणारे लोक म्हणून पोलिसांनी देखील इतकी काही चौकशी केली नाही. काही महिन्यांनी दारूच्या अती सेवनाने वडिलांचं ही निधन झालं होतं. त्यावेळी मिता लहान होती. त्यावेळी तिला ह्यातलं काहीच कळत नव्हतं. परिस्थिती ने तिला लहान वयातच चटके दिले त्याचमुळे का होईना ती लहान वयातच मोठ्यांसारखी समजूतदार झाली आणि तिच बालपण हरवलं. बाजूच्या राहणाऱ्या लोकांनी तिला आणि तिच्या भावाला कसबस जगवल होत. जशी ती कळत्या वयात येऊ लागली, तिला शेजारी आपल्या सोबत तिला भीक मागायला सिग्नल ला नाहीतर स्टेशन वर घेऊन जाऊ लागली. पण तिने सगळ्यांकडे हाथ पसरले पण ते कामासाठी. लोकांची अगदी लहान सहान काम करून ती त्यातून मिळालेल्या पैशातून आपल्या आणि भावाची भूक भागवत. काम मिळवणं सोप नव्हतं. काही लोक शिवीगाळ करून दूर ढकलून द्यायचे. पण काही मायेने जवळ बोलवून पाच दहा रुपये हाथी ठेवायचे. मग ती सुद्धा त्यांच्या हातातलं सामान उचलून घेई तर काम सांगायला लावे. रोज ती अश्याच्या देवमाणसांच्या शोधात असायची पण कधीच तिने भिक नाही मागितली. जगण्याची आस नसणाऱ्या अन् मरणाची भीती नसणाऱ्या मिता ला ह्या नशिबाकडून काहीच अपेक्षा नव्हत्या. तिला चांगल्या वाईट गोष्टी माहीत होत्या. समंजस होती ती. तिलाही आपल्या भावाला चांगला सवयी अंगी लावायच्या होत्या पण ते इतकं सोपं नव्हतं. अल्लड वय असणाऱ्या संजू ला बाहेर च्या जगाची ओढ लागली होती. त्यातच तो ज्या संगतीत राहायचा ती सगंत चांगली नव्हती. ती संगत म्हणजे गण्या. मारामारी करणे, शिवीगाळ करणे, बाजारात किंवा इतर ठिकाणी जाऊन तिथल्या वस्तू चोरून आणणे हाच त्याचा दिनक्रम असायचा. मोठा असल्याने तिथल्या मुलांना तो चोऱ्या करणे, पाकीट कसा मारतो हे सगळं सांगे. त्याच्या मुळे इतर मुले ही बिघडत चालली होती. पण मिताला तिच्या भावाची काळजी होती. आधी सगळे निमूट पणे ऐकणारा संजू हट्ट करायला लागला होता. खोटं बोलून दिवसेंदिवस गण्याच्या संगतीत राहत होता.
एके संध्याकाळी मिता नुकतीच दिवसभर काहीना काही काम करून घरी आली. आज तिला जास्तीचे काम केल्याने पैसे रोजपेक्षा थोडेफार जास्त मिळाले होते. त्यातून तिने आजच्या रात्रीच्या जेवण्याची सोय आणि संजुसाठी खुप हौसेने चित्रकलेचे साहित्य आणले होते. संजू अडखळत घरी आला. त्याचा अवतार पाहून मिताला क्षणभर भोवळ च येणार होती. जवळच्याच दुकानात गण्या आणि त्याच्या साथीदारांसोबत संजू फटाक्यांची चोरी करताना पकडला गेला आणि तिथेच लोकांनी पकडुन मारहाण केली. चपळ गण्या तर पळून गेला पण बाकी काही मुलंसुद्धा अडकली गेली आणि खुप मार खाल्ला. मिताला ज्या गोष्टीची भिती आणि राग होता आज तेच झालं होत.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा