आरोप भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगावकर
©® आरती पाटील - घाडीगावकर
" बघ आई - दादा, वहिनी बाहेर या मुलाला भेटायला येते. मी या आधी सुद्धा यांना एकत्र बघितलं आहे. " स्वरा आपल्या आई आणि भावाला लांबून मार्केटमध्ये उभं राहून मीनलला कोणाबरोबर तरी बोलताना दाखवत होती आणि आई - दादाला सांगत होती.
मीनलला असं मुलासोबत बोलताना बघून रितेशला खूप राग आला. त्यात त्या मुलाने दोघेही पाठमोरे असताना मीनलच्या कमरेवर हात ठेवला. ते पाहून तो खूपच चिडला. रागात तो घरी गेला आणि मीनलच्या आई वडिलांना फोन करून लगेच बोलावलं. " आताच्या आता या. नाहीतर पुढे जे होईल त्याला मी जबाबदार नाही. " असं म्हणत त्याने फोन कट केला. 
मीनल आणि रितेशच्या लग्नाला अजून वर्षे देखील झालं नव्हतं. स्वराच लग्न दोन वर्षांपूर्वी याच गावात झालं होत. इथे ती आणि तिचा नवरा राहत होते, तर सासू सासरे दुसऱ्या गावी राहत होते. म्हणून मनाला वाटेल तेव्हा स्वरा माहेरी यायची आणि मीनलवर हुकूम सोडायची. 
मीनल नोकरी करणारी मुलगी होती. त्यामुळे सर्व सांभाळून घरचं करता करता तिची दमछाक व्हायची. त्यात स्वराच नेहमी काहीतरी असायचाच.
मीनल स्वयंपाक, टिफिन, घरकाम उरकून निघालेली असताना स्वरा उशिरा उठून चहा - नाष्टासाठी नेमकी माहेरी यायची. ती निघताना, " मला जरा पोहे बनवून जा. माझ्यासाठी चहा बनवून जा. " असं सुरू असायचं. सुरुवातीला मीनलने केलं. पण नेहमी असं व्हायला लागलं. कामावर ओरडा बसू लागला. तेव्हा मीनलने नकार दयायला सुरुवात केली. 
मीनल म्हणायची, " ताई, तुम्ही सकाळी येणार असाल तर रात्री मला मेसेज करून आधीच सांगत जा. आणि काय खाणार ते सुद्धा म्हणजे मी ते वेळेत करून तेही निघत जाईन. " 
यावर सुद्धा स्वराला राग यायचा. ती म्हणायची, " माझं घर आहे आणि मी आधी सांगायचं का येतेय म्हणून? " यावरून वाद सुरू झाले. नंतर नंतर मीनल स्वराकडे आणि तिच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून निघू लागली. यावरून मीनल आणि स्वरामध्ये मोठं भांडण सुद्धा झालं. त्यात मीनलने स्वराला ऐकवलं. याचा स्वराला राग येत होता आणि तीने याचा वचपा काढायचं ठरवलं. हळूहळू ती आपल्या भावाचे कान भरू लागली. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं पण हळूहळू त्याच्या डोक्यात सुद्धा मीनलबद्दल राग जमा होऊ लागला. 
आज सुट्टीचा दिवस. मीनल काही कामासाठी बाहेर पडली, लगेच स्वरा घरी आली आणि आई - भावाला म्हणाली. एवढे दिवस सांगतेय तर पटत नाहीये ना आज स्वतःच्या डोळ्यांनी बघा. असं म्हणत ती त्या दोघांना मार्केट मध्ये घेऊन आली होती. झालेला प्रसंग बघून रितेशने सासू सासऱ्यांना फोन करून बोलावून घेतलं होत. रितेशच्या आवाजावरून तिचे आई वडील देखील काळजीने धावतपळत आले. कारण ते शेजारच्याच गावात राहत होते. 
काही वेळाने मीनल घरी आली तर सर्वजण हॉल मध्येच बसले होते. आई वडिलांना पाहून तिला अतिशय आनंद झाला. ती आनंदाने म्हणाली "आई - बाबा तुम्ही ? " असं म्हणत ती मिठी मारणार तोच बाबाचा चिडका स्वर कानावर आला. " कोणाला भेटायला गेली होतीस ? " 
मीनलला काही कळलं नाही. ती गोंधळून म्हणाली, " म्हणजे ? कशाबद्दल बोलताय तुम्ही ? "
" तू जे तोंड काळ करत होतीस ना मार्केटमध्ये त्याबद्दल विचारत आहेत ते. " रितेश रागाने म्हणाला. 
त्याला चिडलेला पाहून मीनल पुरती गडबडली. 
" नक्की काय झालंय मला नीट सांगाल का ? " मीनलने विचारलं.
" अरे वाह..! तू करायचं आणि आम्ही ते घाणेरडे प्रसंग परत सांगायचे ? " स्वरा तिरस्कृत पणे म्हणाली. 
" तू मार्केटमध्ये कोणत्या मुलासोबत होतीस मीनल ?" डोळ्यात पाणी आणून मीनलच्या आईने विचारलं. 
" आई अगं मी का कोणत्या मुलासोबत जाऊ ? मी तर पुढच्या आठवड्यात तुमची एनिवर्सरी आहे म्हणून वेदिकाला घेऊन मार्केटमध्ये थोडी शॉपिंग करत होते. तुम्हांला कोण म्हणाल मी एखाद्या मुलासोबत आहे म्हणून ? " मीनलने रागाने प्रश्न केला.  
" कोणी कशाला सांगायला हवं. आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. आणि नंतर त्याने तुझ्या कमरेत हात देखील... शी मला बोलताना सुद्धा लाज वाटते.  बरं झालं स्वराने वेळेवर तुझं खरं रूप दाखवलं. " रितेश. 
मीनलच्या लक्षात आलं. हे सर्व स्वराच्या डोक्याचा भाग आहे. 
" ठीक आहे. मग आता पुढे काय करायचं ? " मीनल शांतपणे म्हणाली. सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.  सर्वाना वाटलं होत ती घाबरेल, माफी मागेल किंवा सुरुवातीला नकारच देईल. की तीने हे सर्व केलं नाही म्हणून पण इथे तर.....
क्रमश: 
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा