अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ४०
मागील भागाचा सारांश: ऋतुजाने आईला व अभिराजला रश्मी व शिवमचं काय झालं? ते सांगितले. तसेच रश्मीच्या चेहऱ्यावरील हसू परत आणण्यासाठी काहीतरी करावे लागेल हा विचार ऋतुजा करत होती.
आता बघूया पुढे….
शुक्रवारी संध्याकाळी ऑफिस मधून निघताना ऋतुजा रश्मीला म्हणाली,
"रश्मी आज आपण तुझ्या फेव्हरेट कॅफेमध्ये जाऊन कॉफी पिऊयात ना. हे बघ नाही म्हणायचं नाही. मी पहिल्यांदा तुला विचारत आहे."
ऋतुजाने फोर्स केल्याने रश्मी नाहीच म्हणू शकणार नव्हती. ऋतुजा व रश्मी दोघीजणी कॅफेमध्ये गेल्या. ऋतुजाने रश्मीच्या आवडत्या कॉफीची ऑर्डर दिली.
"रश्मी तू असा किती दिवस दुःखी चेहरा घेऊन फिरणार आहेस. मला पहिली रश्मी परत हवी आहे." ऋतुजाने ठणकावून सांगितले.
"ऋतू मनावर मळभ आल्यासारखं वाटत आहे ग. मी उगीच शिवममध्ये गुंतले होते. आता कोणावर विश्वास ठेवावा? हेही कळत नाहीये. आयुष्य असं निरस वाटायला लागलं आहे." रश्मीने सांगितले.
"म्हणजे तुझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा शिवमचं होता का? आमची काही किंमतच नाही राव. असं कुठे असतंय हो. उद्या तू माझ्यासोबत फिरायला येणार आहे, पण हसऱ्या चेहऱ्याने. अभिराजला तुझी ओळख करुन देताना ही माझी दुःखी मैत्रीण असं सांगू का?" ऋतुजाने विचारले.
रश्मी म्हणाली,
"मलाही अभिराजला भेटायचं आहे, पण उद्या नको. माझा अजिबात मूड नाहीये."
"मला तुला विचारलं नाही, तर सांगतेय. आपण उद्या अभिराजला भेटायला त्याच्या फ्लॅटवर जाणार आहोत. अग तिथे त्याचे बहीण भाऊ पण राहतात. मी एकटीच कशी जाऊ? त्यात आई मला एकटीला पाठवणार नाही." ऋतुजा म्हणाली.
यावर रश्मी म्हणाली,
"बरं बाई आपण जाऊयात. तू काही ऐकणार नाहीस. हट्टी आहेस एक नंबरची."
"मला तुझ्याकडून अजून एक मदत पाहिजे आहे." ऋतुजा म्हणाली.
"काय?" रश्मीने विचारले.
"अग मी अभिराजला एकदाही आय लव्ह यू म्हणाले नाहीये, तो सारखं म्हण असं म्हणत असतो. मी त्याला सांगितलं आहे की, मी आय लव्ह यू अश्या क्षणाला म्हणेल की तो क्षण कायम लक्षात राहील. पण आता मला कळत नाहीये की, मी त्याला कसं आय लव्ह यू म्हणू. त्याच्यासाठी काय प्लॅन करु. काही झालं की मला आय लव्ह यू म्हण म्हणून मागे लागलेला असतो." ऋतुजाने सांगितले.
"छानच आहे की. मी तुला जेवढी ओळखते त्यावरुन सुचवते. एखाद्या रम्य संध्याकाळी मोकळ्या जागेवर एकांतात एक गुलाबाचं फुल देऊन त्याला तुझ्या मनात असणाऱ्या भावना सांगून टाक. हवंतर एखादी कविता एका कागदावर लिहून देऊ शकतेस. महत्त्वाचं काय आहे की, तुझ्या मनात त्याच्या बद्दल जे काही आहे, त्या त्याच्यापर्यंत पोहोचणे." रश्मीने सुचवले.
"अग हे मला आवडतं, पण त्याला हे आवडेल का?" ऋतुजाने विचारले.
"त्याला हे आवडले तरच तो तुझ्यावर प्रेम करु शकेल. तू त्याचा विचार कर, पण तुला हे आवडतं ते त्याच्या पर्यंत पोहोचू दे ना. जे मला सांगायचीस तेच मला तुला सांगावे लागेल का? नाही ना. अभिराजला फक्त तू त्याला आय लव्ह यू म्हणणे अपेक्षित आहे. ते तू कुठे म्हटली याचा फार काही फरक पडणार नाहीये. तुला तो क्षण खास करायचा आहे, तर तुझ्या पद्धतीने तू तो क्षण खास करावा असे मला वाटते." रश्मीने सांगितले.
ऋतुजा म्हणाली,
"मला आत्ताशी तुझा मुद्दा कळाला. मी काहीतरी प्लॅन करते. उद्या मी तुला तुझ्या घरी घ्यायला येईल, लक्षात ठेव."
ऋतुजाने कॉफीचं बिल दिलं आणि दोघीजणी आपापल्या घराच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतुजाने अभिराजला ती व रश्मी त्यांच्या घरी जाणार असल्याचे कळवले होते. आरतीने दाळबाटीचा बेत करण्याचे ठरवले होते.
ऋतुजा रश्मीला घेण्यासाठी तिच्या घरी गेली. रश्मी तयारचं होती. ऋतुजा व रश्मी काही वेळातचं अभिराजच्या घरी गेले. ऋतुजाने दारावरील बेल वाजवली, तर दरवाजा पंकजने उघडला.
"वेलकम वहिनी. तुमचे पाय आमच्या घराला लागले आणि आम्ही धन्य पावलो." पंकजने त्याच्या अनोख्या ढंगात ऋतुजा व रश्मीचे स्वागत केले.
ऋतुजाने रश्मी व पंकजची एकमेकांसोबत ओळख करुन दिली. आरती दोघींसाठी पाणी घेऊन आली.
"अरे दीदी मी पाणी घेतलं असतं ना, तुम्ही कशाला आणलं." ऋतुजा म्हणाली.
"वहिनी आज तुम्हाला एकदम रॉयल ट्रीटमेंट मिळणार आहे. तुम्ही आमच्या पाहुण्या आहात. लग्न झाल्यावर हे सगळं तुम्हालाच करावं लागणार आहे." पंकज म्हणाला.
ऋतुजाने रश्मी व आरतीची ओळख करुन दिली.
"ज्यांना आम्ही भेटायला आलो आहोत, ते आमचे जिजू कुठे आहेत?" रश्मीने विचारले.
"नवरा मुलगा आतमध्ये तयार होतो आहे. पुढच्या पाच मिनिटांत येईलचं." पंकजने सांगितले.
"ऋतू चहा घेणार की डायरेक्ट जेवण करणार?" आरतीने ऋतुजाला विचारले.
"अहो दीदी काहीच नको. आपण सगळे डायरेक्ट जेवणचं करु." ऋतुजाने सांगितले.
पाच मिनिटात अभिराज हॉलमध्ये आला. अभिराज आल्याबरोबर रश्मी म्हणाली,
"जिजू आत्ता तयार व्हायला इतका वेळ लावत आहात तर लग्नात काय कराल? आमच्या ऋतूला वाट बघायला लावणार का?"
"हा पंकज काहीही सांगतोय. तुम्ही येणार म्हणून घर साफ करत होतो, त्यात अंघोळ राहिली होती. ऋतूने आधीच मला पसंत केलं आहे. आता तिला इंप्रेस करण्यासाठी मी तयार होण्यात वेळ का घालवू?" अभिराज म्हणाला.
"दीदी कशा आहात? सुरतहुन आल्यापासून आपलं काही बोलणंच झालं नाही." ऋतुजाने आरतीकडे बघून विचारले.
"मी बरी आहे. सध्या नोकरी शोधण्याच्या प्रक्रियेत आहे." आरतीने सांगितले.
अभिराज म्हणाला,
"बरं ऐका ना. मला जाम भूक लागली आहे. आम्हाला आज सकाळी नाश्ता मिळाला नाहीये. आपण जेवण करुन घेऊयात, मग निवांत गप्पा मारुयात."
सगळ्यांना अभिराजचं म्हणणं पटलं, मग ते सगळेजण एकत्रचं जेवायला बसले. आरतीच्या हातची दाळबाटी खाल्ल्यावर रश्मी म्हणाली,
"तुमच्या हाताला तर एकदम भारीच चव आहे."
"आमची आरती दीदी एकसे बढकर एक पदार्थ बनवत असते. आईच्या हाताची चव तिने जशीच्या तशी घेतली आहे. आरती दीदी स्वयंपाक खूप मस्त बनवते." पंकजने सांगितले.
पंकजची री ओढत अभिराज म्हणाला,
"आरती सगळाच स्वयंपाक अतिशय टेस्टी बनवते."
"मग नोकरी सोडण्यापेक्षा तुम्ही एखादा कॅफे किंवा हॉटेल टाकू शकतात. घरात बसून सुद्धा तुम्ही हे काम करु शकतात. इथं पुण्यात खाणारे भरपूर आहेत. तुमच्या जर हे आवडीचे काम असेल, तर करायला हरकत काय आहे?" रश्मी म्हणाली.
यावर अभिराज म्हणाला,
"रश्मी तू एकदम भन्नाट आयडिया दिली आहेस, पण त्यासाठी इन्व्हेस्टमेंट भरपूर करावी लागेल. एकतर या फिल्ड मधील नॉलेज कोणालाच नाहीये. तो एक मेन प्रश्न आहे."
"कोणीच नाही असं कसं म्हणता? रणजीत दादा आहे की. एकदा त्याच्या सोबत बोलून बघा. हे बघा पन्नास हजाराची दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतः वीस हजार कमावणारा सध्या जास्त खुश आहे. दुसऱ्याची नोकरी करणे एवढं सोपं असतं का? तुम्हीच एकदा विचार करुन बघा. आरती दिदींमध्ये जर काहीतरी कला असेल, तर त्याच्या आधारे त्या जीवन जगू शकतात ना." रश्मी म्हणाली.
रश्मीच्या बोलण्याला दुजोरा देत ऋतुजा म्हणाली,
"आरती दीदी रश्मी एकदम बरोबर बोलते आहे. तुम्हाला जर कुकिंग मध्ये इंटरेस्ट असेल, तर मी दादासोबत बोलून घेते. दादा तुमची काहीतरी मदत नक्कीच करेल. दीदी कंपनीत जाऊन नोकरी करणे एवढं सोपं नाहीये. शेवटी तुमची इच्छा काय आहे? यावर सगळं अवलंबून आहे. हवंतर तुम्ही एकदा रणजीत दादासोबत बोला."
"आता सध्या दाळबाटी संपवा, मग आपण यावर विचार करु." आरतीने जागेवर विषय बंद केला.
आरतीने त्या विषयावर पुढे बोलायला नकार का दिला असेल? किंवा तिने तो विषय बंद का केला होता? याचे कारण जाणून घेऊया पुढील भागात….
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा