Login

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७१

सुरुवात एका नव्या नात्याची
अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७१

मागील भागाचा सारांश: अभिराजच्या फ्लॅटचं काम जवळपास पूर्ण होत आलं होतं. फ्लॅटचं इंटेरिअर आणि फर्निचर कसे करायचे? यासाठी ऋतुजाला फ्लॅट बघण्यासाठी जाऊयात असं त्याने सांगितलं. ऋतुजाने लग्नाच्या शॉपिंगचा विषय सांगितल्यावर अभिराज आरतीला घेऊन त्यांच्या सोबत जॉईन होणार असल्याचे त्याने सांगितले. रोहन बद्दल ऋतुजाने विचारणा केल्यावर अभिराजने रश्मीला फोन करायचा ठरवला होता.

आता बोलूया पुढे….

घराजवळ पोहोचल्यावर पार्किंग मध्ये थांबून अभिराजने रश्मीला फोन लावला. पाच ते सहा रिंगनंतर रश्मीने फोन उचलला. अनोळखी नंबर बघून रश्मीने विचारले,

"हॅलो, कोण बोलतंय?"

"हॅलो रश्मी, मी अभिराज बोलतोय." अभिराजने उत्तर दिले.

"तुम्ही यावेळी मला कसा काय फोन केला? ऋतू ठीक आहे ना?" रश्मीला प्रश्न पडला होता.

"ऋतू ठीक आहे. मला एक सांग, घरी गेल्यानंतर तू रोहनला फोन केला होता का?" अभिराज म्हणाला.

रश्मी म्हणाली,
"नाही. त्याने केलेला मेल मी अजून बघितलाच नाहीये. आता थोड्या वेळात मला काही अडलं तर आमचा फोन होईलच, पण तुम्ही हे का विचारत आहात?"

"मी ते सगळं सांगतो, पहिले मला एक सांग, तुला त्याने कश्या संबंधी मेल केला आहे?" अभिराजने विचारले.

"रोहन वेबसाईट डेव्हलपरचे काम करतो ना? त्याला त्या कामात कोणाची तरी मदत हवी होती. मलाही त्यात इंटरेस्ट असल्याने मी त्याची मदत करायचे ठरवले होते. मलाही त्यातून थोडाफार इन्कम मिळेल." रश्मीने सांगितले.

अभिराज म्हणाला,
"अच्छा, तुला त्याने असं सांगितलं. हे बघ रश्मी, रोहन अजिबात चांगला मुलगा नाहीये. त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस. तो तुला एखाद्या मोठया प्रकरणात अडकवू शकतो. रोहन एक नंबरचा फ्रॉड मुलगा आहे. मुलींसोबत खोटं बोलून त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा त्याचा प्लॅन असतो.

स्वतःची मानसिक आणि शारीरिक गरज संपली की, त्या मुलींना तो वाऱ्यावर सोडून देतो. रोहन माझा मित्र नाहीये, तो एक डेव्हलपर म्हणून खरंच खूप चांगला आहे, त्यात तो अतिशय हुशार आहे. मी त्याच्या सोबत कामापुरता संबंध ठेवतो.

रोहन सोबत काम करण्याआधी एकदा माझ्याशी तू बोलायला हवं होतं. नशीब तुमच्या कामाला अजून सुरुवात झाली नाही. तू माझ्या बहिणी सारखी आहेस. माझ्यावर विश्वास ठेव आणि त्या मुलापासून दूर रहा."

"माझा तुमच्यावर विश्वास आहेच. मला माणसांची ओळख नाहीये, हे हर्षल नेहमी म्हणायचा ते काही खोटं नाही. पण आता त्याच्या पासून पत्ता कसा कट करु?" रश्मीने विचारले.

"रोहनने जो मेल तुला केलेला तो ओपन कर त्यातील काम करण्याचा हळूवार त्याला दाखवण्यापुरता प्रयत्न कर. तो एकच गोष्ट शंभर वेळा सांगून थकला पाहिजे असा अभिनय कर. शेवटी त्याला कळून चुकेल की, तू त्याचं कोणतंच काम करु शकणार नाही. रोहनने तुला जर तुझ्या रिलेशनशिप बद्दल विचारले,तर तुला बॉयफ्रेंड आहे, असं सांग. रोहनला हळुवारपणे तुझ्या आयुष्यातून तुला बाजूला करावे लागेल.

डायरेक्ट त्याला इग्नोर करायला गेलीस, तर तो तुला वेगळ्या पद्धतीने त्रास देऊ शकतो किंवा मी तुला त्याच्या बद्दल सांगितलं, हा त्याला डाऊट येऊ शकतो." अभिराजने सांगितले.

यावर रश्मी म्हणाली,
"हो, चालेल. मी असंच काहीतरी करते. रोहनला संशय येणार नाही, असं मी वागते. बरं झालं तुम्ही मला हे सगळं सांगितलंत, नाहीतर मी नको त्या चक्रव्यूहात अडकले असते. या सगळ्यात ऋतुजावरही मी रागावून बसले."

"इट्स ओके. ती तशीही समजदार आहे. तिला तुझी काळजी वाटली, म्हणूनच तिने माझ्या कानावर टाकलं. तू लकी आहेस की, ऋतू सारखी मैत्रीण तुझ्या आयुष्यात आहे. मी मात्र माझा मित्र गमावून बसलोय." अभिराज म्हणाला.

"हर्षल होताच तसा. आत्ताही कधी कधी त्याचं बोलणं, वागणं आठवलं की, चेहऱ्यावर हसूही येतं आणि डोळयात पाणीही येतं. बरेच क्षण असे येतात की, त्यावेळी हर्षलची खूप आठवण येते. पण आता तो कधीच मदतीला धावत येणार नाही, हे कटू सत्य स्विकारावे लागते. माझ्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त मिस करत असाल ना?" रश्मीने विचारले.

"आठवण ज्याची येते ज्याला आपण विसरलेलो असतो. हर्षल, आमची मैत्री माझ्या कायम स्मरणात असेल." अभिराजने उत्तर दिले.

"हर्षल गेला त्या रात्री नक्की हॉस्पिटलमध्ये काय घडले होते, हे कळालं का? म्हणजे शुद्धीत येऊन सुद्धा तो अचानक कसा काय गेला?" रश्मी म्हणाली.

यावर अभिराज म्हणाला,
"मी त्यानंतर त्याच्या घरी फोन करुन चौकशी केली नव्हती. सोमवारी हर्षलचा भाऊ त्याचं सामान घेऊन जाण्यासाठी येणार आहे. आता काही वेळापूर्वीचं त्याचा फोन आला होता. आमची भेट तेव्हा होईलचं, तेव्हा हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं होतं? ते मी त्याला विचारतो. तसाही त्यावेळी फक्त तो एकटाच हॉस्पिटलमध्ये होता. मला काही कळलं की, मी तुला कळवतो."

"हो, चालेल." रश्मी म्हणाली.

"रोहनने जर अतित्रास दिला, तर मला फोन कर. आपण बघू." अभिराजने बोलून फोन कट केला.

अभिराज सोबत बोलून झाल्यावर रश्मीने ऋतुजाला मॅसेज केला,
"सॉरी यार. मी उगाच त्या रोहन वरुन तुझ्यावर चिडचिड करत बसले. तू अभिराजला सांगितलंस, म्हणून माझ्यासमोर रोहनच खरं रुप आलं. थँक् यू सो मच अँड सॉरी वन्स अगेन."