अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७२
मागील भागाचा सारांश: अभिराजने रश्मीला फोन करुन रोहनचं खरं रुप तिच्या डोळ्यांसमोर आणलं, तसेच त्याच्या पासून दूर कसं व्हायचं? हेही सांगितलं.
आता बघूया पुढे…
शॉपिंगला जाण्यासाठी सकाळी सकाळीच ऋतुजाच्या घरी गडबड सुरु होती. अर्पिताला एकटीला आलेलं बघून पियूने विचारले,
"वहिनी, दादा आणि आरव कुठे आहेत?"
"आपल्या बायकांच्या शॉपिंगला बराच वेळ लागेल असं रणजीतचं म्हणणं होतं, आरव कंटाळून जाईल, तो मला नीट शॉपिंग करु देणार नाही. रणजीत त्याला रेस्टॉरंटला घेऊन गेले आहेत. तिकडे तो व्यवस्थित खेळतो. गरज पडली तर रणजीत आरवला घेऊन आपल्याला जॉईन होतील." अर्पिताने सांगितले.
"ऋतू, आपण अर्ध्या तासात निघू, हे अभिराजला कळवले का?" ऋतुजाच्या बाबांनी विचारले.
"हो बाबा, मी त्याला काही वेळापूर्वीचं सांगितले." ऋतुजाने उत्तर दिले.
"अर्पिता, नाश्ता करते का?" ऋतुजाच्या आईने विचारले.
"नको आई, मी घरुन नाश्ता करुन आले आहे." अर्पिताने सांगितले.
"अर्पिता, मग एक रव्याचा लाडू तरी खा. किती दिवसांपासून तू माझ्या हातचा रव्याचा लाडू खाल्लाच नाहीये." सुलभा म्हणाली.
सुलभाच्या हातातून रव्याचा लाडू घेत अर्पिता म्हणाली,
"मावशी, तुमच्या हातच्या रव्याच्या लाडूला मी नाही कशी म्हणू शकेल."
"मावशी, तुमच्या हातच्या रव्याच्या लाडूला मी नाही कशी म्हणू शकेल."
"सुलभा, रव्याच्या लाडूचं कौतुक करत बसलीस, तर आपल्याला घरातून निघायला उशीर होईल. एकतर तुम्हा बायकांना खरेदी करायला किती वेळ लागेल. आजच्या दिवसात निदान ७५% खरेदी तरी झाली पाहिजे." मनोहर काका चिडून म्हणाले.
"माझ्या रव्याच्या लाडवाचं कोणी कौतुक करत असलं, तर ते ह्यांना अजिबात बघवत नाही." सुलभाने आपली प्रतिक्रिया दिली.
"मावशी, प्लिज आत्ता तुमचं हे लाडू पुराण सुरु करु नका. आपल्याला खरंच निघायला उशीर होईल." ऋतुजा म्हणाल्यावर सुलभाने बोलणं आवरतं घेतलं.
पुढील काही वेळातच ऋतुजाने दोन कॅब बुक केल्या.
"बाबा, मनोहर काका, पियू तुम्ही तिघे एका कॅबमध्ये जा. मी, आई, सुलभा मावशी आणि अर्पिता वहिनी एका कॅबने येतो." ऋतुजाने सगळ्यांना बोलावून सांगितले.
"ऋतू, आपली गाडी घेऊन गेलो असतो ना?" ऋतुजाची आई म्हणाली.
"आई, लक्ष्मी रोडला दुकानाच्या आसपास पार्किंग मिळत नाही. उगाच पायपीट करत फिरावी लागते. शिवाय आपल्याला तुळशीबागेतही जायचं आहे. आपल्या सोबत आपली गाडी नसली की, पार्किंगचे टेन्शन राहणार नाही.
आता राहिला प्रश्न कपड्यांच्या बॅग्सचा तर आपण एवढे सगळेजण आहोत, तर प्रत्येकाने आपल्या हातात दोन बॅग धरल्या तरी चौदा बॅग होतील. आता सगळ्या शंका मिटल्या असतील तर आपण निघूयात का? खाली कॅबवाला येऊन थांबलेला आहे." ऋतुजा म्हणाली.
आता राहिला प्रश्न कपड्यांच्या बॅग्सचा तर आपण एवढे सगळेजण आहोत, तर प्रत्येकाने आपल्या हातात दोन बॅग धरल्या तरी चौदा बॅग होतील. आता सगळ्या शंका मिटल्या असतील तर आपण निघूयात का? खाली कॅबवाला येऊन थांबलेला आहे." ऋतुजा म्हणाली.
सगळेजण पटपट घरातून बाहेर पडले. ऋतुजाने ठरवून दिल्याप्रमाणे सगळे कॅबमध्ये बसले. कॅबमध्ये बसल्यावर सुलभा म्हणाली,
"ऋतू, आज तुला बराच उत्साह आलेला आहे. काल खरेदीचं नाव घेतलं तर तुझा चेहरा पडला होता. एका दिवसात असा काय बदल घडला?"
"ऋतू, आज तुला बराच उत्साह आलेला आहे. काल खरेदीचं नाव घेतलं तर तुझा चेहरा पडला होता. एका दिवसात असा काय बदल घडला?"
"मावशी, माझं लग्न आहे म्हटल्यावर खरेदीसाठी मी उत्साही असणारच ना. काल ऑफिस मधून दमून आले होते, थकवा जाणवत असल्याने चेहऱ्यावर उत्साह दिसून येत नव्हता. तुमच्यासारखा सतत उत्साह मला दाखवता येत नाही." ऋतुजाने सांगितले.
"सुलभा, तिला इरिटेट करु नकोस. तिचा मूड खराब करुन देशील." ऋतुजाच्या आईने सुलभाला समजावले.
"अभिराजची भेट झाल्यावर ऋतूची आपोआप कळी खुलेल." अर्पिता ऋतुजाला चिडवण्यासाठी म्हणाली.
"वहिनी, प्लिज लगेच सुरु होऊ नका." ऋतुजाने रिप्लाय दिला.
बोलता बोलता कॅब लक्ष्मी रोडला येऊन पोहोचली होती. दोन्ही कॅब लागोपाठचं आल्या होत्या. पुढील पाच मिनिटात अभिराज व आरती दोघेही तिथे आले होते. ऋतुजाच्या घरच्यांनी आरतीची चौकशी केली.
सुरुवातीला कोणत्या दुकानात जायचं? हे सर्वानुमते ठरवण्यात आले होते. साड्यांची खरेदी करण्यासाठी साड्यांच्या सेक्शनमध्ये सगळेजण जाऊन बसले. ऋतुजाच्या आईला व मावशीला साड्या काही सहजासहजी पसंत पडत नव्हत्या. ही नको, ती नको करत करत जवळपास दुकानातील सगळ्या साड्या त्यांच्यासमोर मांडण्यात आल्या होत्या. ऋतुजा तर डोक्यालाच हात लावून बसली होती.
"आई, मावशी तुम्ही दोघींनी जर असं केलं, तर आज दिवसभरात कोणाचीच खरेदी करुन होणार नाही. एक काम करा. तुम्ही दोघी राहिलेल्या साड्या बघा. मी, पियू, आरती दीदी, अर्पिता वहिनी बाजूला एक डिझायनर साड्यांचं दुकान आहे, तिथे जाऊन बघतो." ऋतुजा आपल्या जागेवरुन उठत म्हणाली.
ऋतुजाच्या आईने मान हलवून होकार दर्शवला.
"मीही तुमच्या सोबत येतो." अभिराज म्हणाला.
पाचही जण साडीच्या दुकानातून बाहेर पडले.
"ऋतू दीदी, तू बरं आयडिया शोधून काढलीस. नाहीतर आपण तिथेच अडकून बसलो असतो. मला तर जाम बोअर झालं होतं." पियू म्हणाली.
"बोअर सगळेच झाले असतील, फक्त कोणीच बोलू शकलं नसतं. मलाच बोलावं लागलं. बरं ते जाऊदेत तू लग्नात साडी घालणार आहेस की, वेगळं काही, ते ठरव. अर्पिता वहिनी, आरती दीदी तुमचं काय?" ऋतुजाने विचारले.
"मी एखादी डिझायनर साडी बघते." अर्पिताने उत्तर दिले.
"मीही साडीच घेईल. आमच्या आईच्या मते बाईचं रुप साडीत खुलून दिसतं." आरतीने सांगितले.
"मला घागरा घ्यायचा आहे." पियूने उत्तर दिले.
"आपण तुमच्या दोघींसाठी या दुकानात साड्या बघूयात, मग पियूचा घागरा बघू." ऋतुजाने सुचवले.
"मला काय वाटतं? त्यापेक्षा आपण काहीतरी खाऊयात ना?" अभिराज म्हणाला.
"अभी, आत्ता काही खात बसलो, तर टाईमपास होईल. पहिले काहीतरी खरेदी होऊन जाऊदे. तेवढंच मनाला समाधान." ऋतुजा म्हणाली.
डिझायनर साडीच्या दुकानात गेल्यावर अर्पिता व आरती दोघींना तिथे साड्या आवडल्या होत्या. दोघींची साड्यांची खरेदी झाली होती. तोपर्यंत ऋतुजाच्या आई व मावशीचीही खरेदी झाली होती.
जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी पेटपुजा केली. खाऊन झाल्यावर पियूला घागरा घेतला.
ऋतुजाच्या बाबांची व मनोहर काकांची खरेदी अवघ्या अर्ध्या तासात झाली. कपड्यांची खरेदी झाल्यावर साडीवर मॅचिंग ज्वेलरी घेण्यासाठी तुळशी बागेत घुसले. ज्याला जे आवडेल ते त्याने घेतलं. शेवटी आईस्क्रीम खाल्लं.
"पियू, तुझी राहिलेली शॉपिंग आपण जवळच्या दुकानात करुयात." सुलभाने सांगितले.
"आरती, तुझं काही घ्यायचं राहिलं आहे का?" अभिराजने विचारले.
"थोडंफार राहिलं आहे, ते मी सुरतहून घेईल." आरतीने उत्तर दिले.
"तुमच्या दोघांच्या शॉपिंगचं काय?" अर्पिताने विचारले.
"वहिनी, मी एका डिझायनरला विचारुन ठेवलं आहे. मला त्याचं कलेक्शन आवडलं आहे. मी आणि ऋतू एकदा उद्या त्याच्याकडे जाऊन येतो. प्रीवेडिंग फोटो शूट साठीही कपडे फायनल करावे लागतील. उद्या काहीतरी फायनल करुन घेऊ." अभिराजने सांगितले.
"चला मग निघूयात." ऋतुजाचे बाबा म्हणाले.
"हो, आम्हीही निघतो." अभिराजने दुजोरा दिला.
"अर्पिता, रणजीत आणि आरवला घरी बोलावून घे. अभिराज तुम्ही दोघे घरी जेवायला चला ना." ऋतुजाची आई म्हणाली.
"नाही, नको. तुम्ही सगळेही बरेच दमला आहात. आज नको. उद्या मी ऋतूला घ्यायला येईल." एवढं बोलून अभिराज व आरती दोघे निघून गेले.
ऋतुजाने कॅब बुक केली. कॅबमध्ये बसून ते घराच्या दिशेने मार्गस्थ झाले.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
