Login

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७४

सुरुवात एका नवीन नात्याची
अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७४

मागील भागाचा सारांश: अभिराज व ऋतुजाने डिझायनर ब्युटीकमध्ये जाऊन लग्नासाठी लागणाऱ्या कपड्यांची निवड केली, तसेच फोटोग्राफर कडे जाऊन प्रीवेडिंग फोटोशूट बद्दल चर्चा केली.

आता बघूया पुढे….

"ऋतू, मनासारखे कपडे मिळाले का?" ऋतुजा घरात गेल्याबरोबर आईने विचारले.

"हो. मी तुला फोटोज व्हाट्सअपला टाकलेत बघ. आम्ही काही बदल सुचवले आहेत. पंधरा दिवसांत कपडे भेटतील." ऋतुजाने सोप्यावर बसत सांगितले.

"सकाळपासून मोबाईल हातात घ्यायला वेळच नाहीये. आता काही वेळापूर्वी रणजीत आणि अर्पिता गेले. घरातला सगळा पसारा आवरला. तुझे बाबाही त्यांच्यासोबत फ्लॅटचं काम कुठंवर आलंय, ते बघायला गेलेत. जरावेळ मी आराम करते. खरेदी करुन थकलेली दिसते आहेस. तुही आराम कर." ऋतुजाची आई म्हणाली.

"हो ना. जाम कंटाळा आला आहे. मीही जरावेळ पडते." ऋतुजा उठून आपल्या रुममध्ये निघून गेली.

ऋतुजा इतकी थकली होती की, कपडे न बदलता झोपून गेली. साधारणपणे एक तासाने ती झोपेतून उठली. झोपेतून उठल्यावर तिला आरतीला फोन करायचे लक्षात आले.

आरतीने तीन ते चार रिंगमध्ये फोन उचलला,
"हं बोल ऋतू, काय म्हणतेस? सगळी मनासारखी खरेदी झाली ज?" फोन उचलल्याबरोबर आरतीने विचारले.

"हो. अभीने सांगितलं असेलच ना?" ऋतुजा म्हणाली.

"तो आल्यापासून झोपलेला आहे." आरतीने सांगितले.

"हम्मम, एवढ्या लांब गाडी चालवून थकला असेल." ऋतुजा म्हणाली.

"हो. बाकी तू फोन सहज केला होतास का?" आरतीने विचारले.

"काल खरेदीच्या गोंधळात आपलं नीट बोलणंच झालं नाही. तुमचा चेहरा उदास वाटत होता. सगळं काही ठीक आहे ना? हेच विचारायला फोन केला होता." ऋतुजाने सांगितले.

आरती पुढे म्हणाली,
"ऋतू, अभी दादा खरंच खूप नशीबवान आहे की, त्याला तुझ्यासारखी लाईफ पार्टनर मिळाली आहे. मी काही न बोलता माझ्या चेहऱ्यावरील भावावरुन तू माझ्या मनात काय सुरु असेल? याचा अंदाज लावलास, तर दादाची किती काळजी घेशील?"

"ते सगळं ठीक आहे. तुम्हाला काय झालंय? ते सांगा." ऋतुजाने विचारले.

"ऋतू, माझी नोकरी व्यवस्थित सुरु आहे. सोबत काम करणारे सगळेच चांगले आहेत. अभी दादा आणि पंकज घरातील कामांना हातभार लावतात. तोही प्रॉब्लेम नाहीये. फक्त मी मनापासून आनंदी होत नाहीये. राहून राहून मनात विचार येतो की, आपल्याच बाबतीत हे सगळं विचित्र का घडलं? बाकीच्यांप्रमाणे नॉर्मल आयुष्य माझ्या वाट्याला का आले नसेल? मग मन नाराज होतं. माझ्या मनात काय सुरु आहे? हे नेमकं मला तुला सांगता येत नाहीये." आरतीने सांगितले.

"आरती दीदी, आपल्या मनातील सगळंच काही समोरच्यापुढे मांडता येत नाही. तुमच्या मनात जे विचार येत आहेत, ते स्वाभाविक आहे. हृदय आणि मेंदू असलेली तुम्ही एक व्यक्ती आहात, हे त्याचंच लक्षण आहे. तुम्हाला मन आहेत, म्हणून त्या भावना उत्पन्न होत आहेत.

दीदी, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी दुःख असतंच. फरक एवढाच आहे की, काहीजण व्यक्त होतात, काहीजण नाही होत. आता तुम्हाला अर्पिता वहिनीकडे बघून वाटलं असेल की, त्या त्यांच्या आयुष्यात किती सुखी असतील? त्यांच्याकडे सगळंच आहे, पण खरंतर असं नाहीये. त्यांच्याही आयुष्यात काहीतरी कमी असेलच.

आपल्याकडे जे नाही त्याचा विचार करण्यापेक्षा जे आहे, त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करुयात. तुम्ही सकाळच्या वेळेत एखादा योगासनांचा क्लास जॉईन करा. रात्री जेवण झाल्यावर वॉक करायला जात चला. वॉक करताना गाणी ऐका किंवा आईसोबत फोनवर बोला. एकदा रुटीन सेट झालं की, तुमच्या मनातील विचार कमी होतील.

शेवटी जे आहे ते स्विकारायला हवं. जे झालं त्याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्या हातात जे आहे, त्याचा विचार करा. आज एवढं तत्वज्ञान पुरेसे आहे." ऋतुजाने हसत सांगितले.

"ऋतू, तत्वज्ञान कसलं ग. तू मला समजावून तर सांगते आहे. तू बोलली की माझ्या डोक्यात सगळं काही घुसतं. तुझं समजावून सांगणं मला आवडतं." आरती म्हणाली.

"दीदी, तुम्हाला कधीही माझ्यासोबत बोलावंसं वाटलं, तर हक्काने फोन करत जा " ऋतुजाने सांगितले.

"हो, नक्कीच." आरतीने प्रतिक्रिया दिली.

"चला मी आत्ताच झोपेतून उठले आहे. फ्रेश होते आणि चहा पिते." ऋतुजा.

"हो चालेल, बाय." आरती.

फोनवर बोलून झाल्यावर ऋतुजा फ्रेश होऊन किचनमध्ये गेली, तर तिची आई चहा बनवत होती.

"आई,मलाही चहा देशील. चहा प्यायल्याशिवाय आळस काही जाणार नाही." ऋतुजा म्हणाली.

"तुझ्यासाठी चहा आधीच ठेवला आहे, तुला बोलवायला येणारच होते, तेवढयात तू आलीस." आईने सांगितले.

"अजून बाबा आले नाहीत का?" ऋतुजाने आजूबाजूला बघत विचारले.

"नाही. आपल्या नवीन फ्लॅटच्या शेजारच्या फ्लॅटमध्ये एक फॅमिली रहायला आली आहे. त्यांच्या सोबत गप्पा मारत बसले आहेत." आईने उत्तर दिले.

"अरे वा! बाबांनी तर तिथे आधीच त्यांचं सर्कल तयार करायला सुरुवात केली आहे. चांगलं आहे." ऋतुजाने आपली प्रतिक्रिया दिली.

चहा कपात गाळत असताना तिची आई म्हणाली,
"तू हॉलमध्ये जाऊन बस, मी चहा घेऊन येते, मग आपण गप्पा मारुयात."

ऋतुजा हॉलमध्ये जाऊन बसली. आई चहाचे दोन कप हातात घेऊन हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसली.

"रणजीत व तुझे बाबा म्हणत आहेत की, पुढच्या आठवड्यात छोटीशी पुजा घालून नवीन घरात रहायला जाऊयात." आईने ऋतुजाला सांगितले.

"इतक्या लगेच! आई, किती धावपळ होईल. शिवाय आता लग्नाची तयारीही करायची आहे." ऋतुजा म्हणाली.

"हो, मी तेच त्या दोघांना सांगत होते, पण रणजीतचं म्हणणं होतं की, आपण सगळे एकत्र राहत असल्यावर कामं वाटून जातील. हे घर छोटं पडतं. त्या घरात पाहुणे आले तरी गर्दी होणार नाही." आई म्हणाली.

"दादाचं म्हणणं सगळं बरोबर आहे, पण सगळीच घाई एकदम होईल. असो एकदा दादा आणि बाबांनी ठरवलं आहे म्हटल्यावर आपण तिथे काहीच बोलू शकणार नाही." ऋतुजाने सांगितले.