अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७७
मागील भागाचा सारांश: पंकज इंटरव्ह्यूला जाण्याआधी त्याने अभिराज व आरतीच्या पाया पडून आशिर्वाद घेतला. आरतीने अभिराजला अजयला फोन करुन स्वतःहून बोलण्याबद्दल सुचवले. ऑफिसमध्ये हाफ डे सुट्टी टाकून अभिराज हर्षलच्या रुमवर त्याच्या भावाला भेटण्यासाठी गेला. हर्षलच्या रुमकडे बघून अभिराजला हर्षलच्या आठवणी आठवत होत्या. हर्षलच्या भावालाही भरुन आले होते.
आता बघूया पुढे….
"दादा, मला तुझ्या बोलण्याचा अर्थ कळत नाहीये. तू हर्षलच्या मृत्यूला जबाबदार आहेस, असं कसं म्हणू शकतोस?" अभिराजने आश्चर्याने विचारले.
यावर हर्षलचा भाऊ म्हणाला,
"एका वर्षापूर्वी माझं आणि हर्षलचं किरकोळ कारणावरुन भांडण झालं होतं. हर्षलने त्याच्या पगारातील पैसे घरी द्यावे, असे मला वाटत होते. हर्षलचं म्हणणं होतं की, त्याला पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, त्याला घरी पैसे देता येणार नाही. मी रागाच्या भरात त्याला बरंच काही बोलून गेलो होतो.
"एका वर्षापूर्वी माझं आणि हर्षलचं किरकोळ कारणावरुन भांडण झालं होतं. हर्षलने त्याच्या पगारातील पैसे घरी द्यावे, असे मला वाटत होते. हर्षलचं म्हणणं होतं की, त्याला पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे, त्याला घरी पैसे देता येणार नाही. मी रागाच्या भरात त्याला बरंच काही बोलून गेलो होतो.
मी आणि हर्षल त्या दिवसापासून बोलत नव्हतो. हर्षलने एक-दोन वेळेस माझ्यासोबत स्वतःहून बोलण्याचा प्रयत्न केला, पण मी मात्र त्याच्यावर राग धरुन होतो. माझं लक्ष फक्त त्याच्या पगारावर होतं.
हर्षल जेव्हाही कधी घरी यायचा त्यावेळी मी काहीना काही कारण काढून त्याच्या सोबत भांडण करायचो. मला आमच्या शेतीवर कर्ज काढायचे होते, पण काही शेती हर्षलच्या नावावर होती. हर्षलने जमिनीवर कर्ज काढायला नकार दिला. माझं तर तेव्हापासून डोकचं सटकल होतं. आमच्यात त्या दिवशी कडाक्याचं भांडण झालं. मी हर्षलवर हातही उगारला होता. तेव्हापासून हर्षलने माझ्याशी बोलणे सोडले होते.
हर्षल घरीही येत नव्हता. आता यावेळी बाबांनी त्याला फोन करुन बोलावून घेतले होते, त्यात त्याचा अपघात झाला आणि डोक्याला मार लागला. त्या दिवशी तुम्ही सगळे घरी निघून गेल्यावर मी एकटाच हॉस्पिटलमध्ये थांबलेला होतो. डॉक्टर हर्षलला तपासत असल्याने मी बाहेरच थांबलेलो होतो. डॉक्टरांनी परवानगी दिल्यावर मी त्याच्या वॉर्डमध्ये गेलो.
हर्षलने माझ्याकडे डोळे वर करुन बघितले आणि त्याने डोळे घट्ट मिटून घेतले. हर्षलने पुन्हा डोळे उघडलेच नाही. हर्षलच्या मनात माझ्याबद्दल राग होता, म्हणूनच मी त्याच्या नजरेला पडल्यावर त्याने डोळे बंद केले."
"दादा, या सगळ्यावर डॉक्टरांचं काय म्हणणं होतं?" अभिराजने विचारले.
"डॉक्टरांच्या मते, कोमातून बाहेर पडणारा पेशंट मेंदू व हृदयाचे कार्य सुरळीत सुरु न झाल्याने मृत पावू शकतो. यात समोर कोणी असो वा नसो त्याने काहीच फरक पडत नाही." हर्षलच्या भावाने सांगितले.
"तरीही तू स्वतःला दोषी मानतो आहेस. दादा, जे झालं ते आपल्या हातात नव्हतं. उगाच तू स्वतःला दोष देत बसू नकोस." अभिराज म्हणाला.
"अभिराज, ज्या जमिनीसाठी, पैश्यांसाठी मी भांडत होतो, ते सगळं हर्षल इथेच ठेऊन गेला आहे. मला सगळं मिळेल, पण माझा भाऊ परत कधीच मिळणार नाही. आपण स्वार्थापोटी इतके आंधळे होऊन जातो की, समोरचं आपल्याला काहीच दिसत नाही.
माणसापेक्षा पैश्यांना जास्त महत्त्व देतो. नात्यापेक्षा, प्रेमापेक्षा आपल्या स्वाभिमानाला, अहंकाराला जास्त महत्त्व देतो. माझ्या हातून खूप मोठी चूक घडली." हर्षलचा भाऊ पस्तावा व्यक्त करत होता.
अभिराज त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,
"दादा, तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण आता हे सगळ कळून काहीच उपयोग नाही. जे झालं ते झालं, मागचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे चालत रहायचं."
"दादा, तुला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण आता हे सगळ कळून काहीच उपयोग नाही. जे झालं ते झालं, मागचा विचार करत बसण्यापेक्षा पुढे चालत रहायचं."
हर्षलच्या सामानाची पॅकिंग करण्यात अभिराजने त्याच्या भावाला मदत केली. पुढील काहीवेळ दोघांनी गप्पा मारल्या. सगळं सामान पॅक झाल्यावर अभिराजने हर्षलच्या भावाचा निरोप घेतला.
अभिराजने पुढे जाऊन गाडी एका कॅफेजवळ पार्क केली. कॅफेत जाऊन कॉफीची ऑर्डर दिली व तो कोपऱ्यातील एका टेबलच्या इथे जाऊन बसला. खिशातील मोबाईल काढून त्याने अजयचा फोन नंबर डायल केला. कॉफी पिता पिता अजय सोबत बोलण्याचा अभिराजचा प्लॅन होता. पाच ते सहा रिंग गेल्यावर अजयने फोन उचलला,
"हॅलो, अभी दादा काही काम होतं का?" अजयने विचारले.
"काम असल्यावरच फोन करायचा असतो का?" अभिराजने प्रतिप्रश्न केला.
"तसं नाही. बऱ्याच दिवसापासून तुझा फोन आला नव्हता." अजय म्हणाला.
"मी फोन का करत नव्हतो? याच कारण तुलाही माहीत आहे आणि मलाही. आपण त्या विषयावर बोलायला नकोच. शीतल आणि तुझ्यात सगळं व्यवस्थित सुरु आहे ना?" अभिराजने विचारले.
"हो. ऋतुजा वहिनीने सुचवल्याप्रमाणे ती मेहंदीचे डिझाईन्स इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर टाकत आहे. पंकजने ते सगळ कसं हाताळायचं? ते तिला शिकवलं आहे. शीतल तिचं आवडीचं काम करत असल्याने खुश आहे." अजयने सविस्तरपणे सांगितले.
"ते एक बरं झालं. बाकी तुझी नोकरी कशी सुरु आहे? पैश्यांची गरज पडली तर मागून घेत जा." अभिराज म्हणाला.
"दादा, माझं सगळं सुरळीत सुरु आहे. पण तू हे सगळं आज का बोलत आहेस?" अजयने विचारले.
"अजय, आपण आपल्या माणसांना गृहीत धरत असतो. एकेमकांसोबत बोलण्याआधी आपला अहंकार आडवा येत असतो. त्याने फोन केला नाहीये, तर मी कशाला करायचा? असा विचार करत बसतो.
आज हर्षलचा भाऊ भेटला होता, त्याचं बोलणं ऐकल्यावर मला तुला फोन करण्याची उपरती सुचली. जोपर्यंत समोरची व्यक्ती जिवंत आहे, तोपर्यंत आपला अहंकार, स्वाभिमान बाजूला ठेवून बोलून घ्या. एकदा तो गेला की, आपण काहीच करु शकत नाही." अभिराजने सांगितले.
"दादा, तू बोलतोस ते एकदम खरं आहे. मीही यावेळेस विनाकारण सगळ्यांवर राग धरुन ठेवला होता. पुढच्या वेळेस ही चूक होणार नाही. दादा, मला माफ कर." अजयने अभिराजची माफी मागितली.
"अजय, माफी मागण्याची काही गरज नाही. तुला तुझी चूक कळली, यातच सगळं काही आलं. चल मलाही घरी जायला ट्रॅफिक लागेल. नंतर निवांत बोलूयात." अभिराजने एवढं बोलून फोन कट केला.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा