Login

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७८

सुरुवात एका नवीन नात्याची

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७८

मागील भागाचा सारांश: हर्षलचा भाऊ जमिनीसाठी हर्षल सोबत भांडत होता, त्याच्याशी त्याने अबोला धरलेला होता. हर्षल गेल्यावर त्याला समजले की, माणूस असेपर्यंत त्याच्याशी बोलून घ्यावं, तो गेल्यावर आपण काहीच करु शकत नाही. अभिराजने अजयला स्वतःहून फोन केला, तर अजयनेही त्याची माफी मागितली.

आता बघूया पुढे….

"दादा, यायला बराच उशीर केलास. तू तर आज हाफ डे घेणार होतास ना?" अभिराज घरी गेल्यावर आरतीने विचारले.

"हो, मी आज हाफ डे घेतला होता. हर्षलच्या भावाची भेट झाल्यावर गप्पा मारण्यात वेळ निघून गेला. तेथून निघाल्यावर अजयला फोन केला होता. पुढे ट्रॅफिक लागली. ही पुण्याची ट्रॅफिक म्हणजे डोक्याला ताप झालीय." अभिराजने उत्तर दिले.

"चला तू अजयला फोन केलास, हे बरं झालं." आरती म्हणाली.

"आपले पंकज महाराज अजून आले नाहीत वाटतं. दिवसभरात त्याचा काही फोनही आला नाही. इंटरव्ह्यूचं पुढे काय झालं, काही कळवलं नाही. तुला त्याने फोन केला होता का?" अभिराजने विचारले.

"मला त्याच्या इंटरव्ह्यू बद्दल काही कल्पना नाही. मी घरी आल्यावर त्याला फोन केला होता, तर त्याने तो बिजी असल्याचा मॅसेज केला होता. बाकी मला कसलीही कल्पना नाही." आरतीने सांगितले.

आरती बोलत असतानाच दरवाजावरील बेल वाजली. आरतीने दरवाजा उघडला तर दरवाजात पंकज उभा होता.

"पंकज, तुला शंभर वर्ष आयुष्य आहे. आता आम्ही तुझ्या बद्दलच बोलत होतो." आरती पंकजला बघून म्हणाली.

पंकज घरात येत म्हणाला,

"एवढं आयुष्य कशाला? जेवढ आहे तेवढंच भरपूर आहे."

"पंकज, इंटरव्ह्यूचं काय झालं?" अभिराजने खुर्चीत बसत विचारले.

"माझ्या हातात पेढ्याचा बॉक्स आहे, तो बघून तरी तुम्हाला समजेल असं वाटलं होतं." पंकज चेहऱ्यावर हसू आणून म्हणाला.

अभिराज आपल्या जागेवरुन उठून पंकजकडे गेला आणि त्याच्या पाठीवर थाप मारुन मिठी मारली. आपल्या हातातील पेढ्याचा बॉक्स उघडून पंकज अभिराजला पेढा भरवायला लागला, तोच अभिराज त्याला अडवून म्हणाला,

"पंकज, आधी मंदिरात जाऊन देवाला ठेव." 

"अरे दादा, आधी मंदिरात जाऊनच इकडे आलो आहे. खा आता." पंकजने अभिराजला पेढा भरवला, त्यानंतर अभिराज व आरतीने त्याला पेढा भरवला.

"आई-बाबांना फोन केलास का?" आरतीने विचारले.

"हो, आता काही वेळापूर्वी मी आई व बाबा दोघांना फोन करुन सांगितलं. ते खूपच खुशीत होते." पंकजने सांगितले.

"तुझ्या नोकरीचा ताण मिटल्यावर ते खुशीतच असणार. एकेक जबाबदारीतून ते मुक्त होत आहेत." अभिराज म्हणाला.

"दादा, आपण आज बाहेर जेवायला जाऊयात ना. आजचा दिवस एन्जॉय करुयात. हवंतर ऋतुजा वहिनीलाही बोलावून घेऊ." पंकज म्हणाला.

यावर अभिराज म्हणाला,

"मी जरा आज थकलो आहे. आपण जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन आजचा दिवस सेलिब्रेट करुयात. ऋतुजाला बोलवायला नको. त्यांच्या घराचं शिफ्टिंग करायचं असल्याने ती बिजी असेल. तू फोन केला, तर ती नाही म्हणू शकणार नाही. बेटरवे तुझा पहिला पगार आल्यावर तिला पार्टी दे."

पंकजने मान हलवून होकार दिला. पुढील काही वेळात तिघेजण आवरुन जवळच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. जेवणाची ऑर्डर दिल्यावर अभिराज म्हणाला,

"हे बघ पंकज, तुला आता दर महिन्याला पगार मिळणार आहे. हातात पैसे येतील म्हणून उडवायचे नाहीत. जेवढे गरजेचे असतील तेवढेच खर्च करायचे. सगळ्यात महत्त्वाचं दर महिन्याला सेव्हिंग करायचे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायचे. पुढे हेच पैसे तुला अडचणीच्या वेळी कामी येतील." 

वेटर जेवण घेऊन आल्यावर अभिराजचं बोलणं मध्येच थांबलं. 

"दादा, मी नोकरीला लागल्यावर तू मला असा सल्ला कधीच दिला नाही." आरती म्हणाली.

यावर अभिराज म्हणाला,

"तुला त्या सल्ल्याची गरज भासणार नाही, कारण तू एकेक पैसा खर्च करताना विचार करशील. एका मुलाच्या आणि मुलीच्या स्वभावात हाच मोठा फरक असतो. काहीही करताना मुलं एवढा विचार करत नाहीत, पण मुली छोट्यातील छोटी गोष्ट करताना विचार करतात. मी सांगायचे काम केले, आता पंकजने ते ऐकावे की नाही हा त्याचा प्रश्न आहे."

"दादा, तू आजवर मला जे सांगितले आहेस, ते माझ्या चांगल्यासाठीच सांगितले आहेस आणि मी तुझं नक्कीच ऐकेल. तुझं ऐकूनच मी आज इथपर्यंत आलो आहे. तुझं ऐकलं नसतं, तर दहावीला ४०% मार्क्स मिळालेला पंकज आज इंजिनिअर झाला नसता." पंकज म्हणाला.

"बरं आता आपण जेवण करुयात. उद्या सकाळी उठून ऑफिसला जायचं आहे. तुमच्या गप्पा लवकर संपणार नाहीत." आरती म्हणाली.

जेवण झाल्यावर तिघेजण हॉटेल बाहेर पडले. बिल्डिंगच्या खाली गेल्यावर अभिराज म्हणाला,

"तुम्ही दोघे वर जा. मी जरा दोन-तीन राऊंड मारुन वर येतो."

"दादा, ऋतुजा वहिनीशी बोलायचं आहे, हे सरळ सरळ सांग ना." पंकज अभिराजला चिडवण्यासाठी म्हणाला.

"पंकज, तुमच्या समोर ऋतूशी बोलायला मी घाबरतो की काय? चल निघ वर. जास्त शहाणपणा करु नको." अभिराज खोटं चिडण्याचं नाटक करत म्हणाला.

"आरती दीदी, आपल्या अभी दादाला चिडताही येतं बरं." पंकज हसून निघून गेला.

अभिराजने कानात हेडफोन टाकले. ऋतुजाचा नंबर डायल करणार तोच तिचा फोन त्याला आला.

"आपली टेलिपथी जाम भारी आहे. मी तुला फोन करणार होतो, तोच तुझा फोन आला." अभिराजने फोन उचलल्या बरोबर आपली बडबड सुरु केली.

"अभी, समोरुन फोन आल्यावर त्याचं ऐकून घ्यायचं असतं. तुझं आपलं लगेच सुरु होतं." ऋतुजाने आपली प्रतिक्रिया दिली.

"सॉरी, ओव्हर एक्सायटमेंट मध्ये मी बोलायला सुरुवात केली." अभिराज म्हणाला.

"पंकजला नोकरी मिळाल्याचे त्याने कळवले होते, म्हणून फोन केला होता. तू हर्षलच्या भावाला आज भेटणार होता ना?" ऋतुजाने विचारले.

"आज दुपारी हर्षलच्या भावाला भेटलो. त्याच्याशी बोलल्यानंतर अजयला फोन केला होता. खरंतर आज मी हर्षलच्या भावाला भेटून डिस्टर्ब झालो होतो, पण पंकजच्या चेहऱ्यावर नोकरी मिळाल्याचा आनंद बघून माझा मूड सुधारुन घेतला. आता इतक्यात आम्ही हॉटेल मधून जेवण करुन आलो. राऊंड मारत तुझ्याशी गप्पा मारण्याचा विचार केला होता." अभिराजने सांगितले.

"अच्छा. अभी, हर्षल आणि त्याच्या भावाबद्दल विचार करत बसू नकोस, त्याने तुला जास्त त्रास होईल. अजय दादांना फोन करुन बोललास, हे खरंच खूप चांगलं झालं." ऋतुजा म्हणाली.

"ऋतू, तू खरंच माझ्यासाठीच बनलेली आहेस. एखादी मुलगी म्हटली असती की, तू कशाला स्वतःहून फोन केलास, तुला तुझा आत्मसन्मान आहे की नाही." अभिराज म्हणाला.

यावर ऋतुजा हसून म्हणाली,

"मी असं कधीच म्हणणार नाही, कारण मला आत्मसन्मान, स्वाभिमान यापेक्षा नातेसंबंध जास्त महत्त्वाचे वाटतात. मला माणसं जोडायला आवडतात, तोडायला नाही. 

बरं ऐक, मला आई आवाज देते आहे. मी आता फोन कट करते. उद्याचं प्लॅनिंग काय असेल? ते मॅसेज करुन सांग. बाय गुडनाईट." 

अभिराज काही बोलण्याच्या आता ऋतुजाने फोन कट केला.

क्रमशः

©®Dr Supriya Dighe