Login

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७९

सुरुवात एका नवीन नात्याची
अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ७९

मागील भागाचा सारांश: पंकजला नोकरी मिळण्याच्या आनंदात अभिराज, आरती व पंकज बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. अभिराजने पंकजला काही सल्ले दिले. पंकजने त्याच्या यशाचं श्रेय अभिराजला दिले.

आता बघूया पुढे…..

"ऋतू, हर्षलच्या भावाकडून त्याच्या मृत्यूबद्दल काही समजलं का?" ऋतुजा ऑफिसमध्ये गेल्याबरोबर रश्मीने विचारले.

"रश्मी, माझं याबाबतीत अभीसोबत काहीच बोलण झालं नाही. एक काम कर ना, तुच त्याला फोन करुन विचार." ऋतुजाने रश्मीला सुचवले.

"मी अभिराजला फोन करेलच, पण तुमच्या दोघांमध्ये सध्या संभाषण होत नाहीये का?" रश्मीला प्रश्न पडला होता.

आपल्या हातातील फाईल बाजूला ठेवत ऋतुजा म्हणाली,
"रश्मी, सध्या इतकी कामं आहेत. आम्हाला दोघांना इतक्या विषयांवर बोलायचं असतं की, त्यात एखादा विषय राहून जातो. कामांमुळे आमच्यात प्रॉपर बोलणंही होत नाहीये."

"तुझ्या चेहऱ्यावरुन ते समजतंय, पण एवढया कसल्या कामात व्यस्त आहेस?" रश्मी म्हणाली.

"अग, एकामागून एक सुरुच असतं. घरात आई-बाबांचं लग्न या विषयावर काहीना काही बोलणं चालू असतं. त्यात आता नवीन फ्लॅटवर रहायला जायचं म्हणजे ते एक वेगळं टेन्शन आहे. आता त्यात अभीचं सुरु आहे की, त्याच्या फ्लॅटचं इंटेरिअर लग्नाआधी पूर्ण करुन घ्यायचं, म्हणजे लग्नानंतर नवीन फ्लॅटमध्ये रहायला जाता येईल. आमच्या घराच्या शिफ्टिंग मुळे आमचं प्रीवेडिंग शूट पुढे ढकललं गेलं आहे. सगळाचं गोंधळ सुरु आहे. चल मी आता ही फाईल जरा मॅडमला जाऊन दाखवते. संध्याकाळी मला लवकर निसटायचं आहे. तू तोपर्यंत अभीला फोन करुन घे." ऋतुजा बोलून हातात फाईल घेऊन निघून गेली.

रश्मीने अभिराजला फोन करुन तिच्या मनातील प्रश्नांची समाधानकारक उत्तरे घेतली.

संध्याकाळी अभिराज ऋतुजाला तिच्या ऑफिस जवळ घ्यायला आला.

"ऋतू, फ्लॅटच्या साईटवर जाऊयात की, तुला काही खायचं आहे?" ऋतुजा गाडीवर बसत असताना अभिराजने विचारले.

"आधी विठोबा मग पोटोबा." ऋतुजाने उत्तर दिले.

"तू म्हणी उलट्या अर्थाने वापरायला लागलीस." गाडी सुरु करत अभिराज म्हणाला.

"अभी, जास्त बडबड करण्यापेक्षा या एकमेकांसोबत शांत राहून प्रवास करण्याचा आनंद घेऊयात ना." ऋतुजाने सुचवले.

अभिराजने मान हलवून होकार दर्शवला. डेस्टिनेशन पर्यंत पोहोचेपर्यंत आपण एकही शब्द बोलायचा नाही, असे अभिराजने ठरवले होते.

संध्याकाळची वेळ होती. मंद गार वारा सुरु होता. वाऱ्याने ऋतुजाचे केस भुरभुर उडत होते. ऋतुजा दोन्ही हाताने केस उडू न देण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात अभिराजने जोरात ब्रेक दाबला. ऋतुजा त्याच्या अंगावर जाऊन धडकली. नकळतपणे एकमेकांना झालेला स्पर्श त्यांना वेगळंच काही सांगू पाहत होता. ऋतुजाच्या चेहऱ्यावर थोडे हसू आले होते.

ऋतुजाच्या चेहऱ्यावरील हावभाव अभिराजने आरश्यातून टिपले होते. ऋतुजाच्या चेहऱ्यावरील हलकेसे हसू बघून त्याच्या चेहऱ्यावरही हसू आले होते. अभिराज पुन्हा ब्रेक दाबेल आणि आपण त्याच्या अंगावर पुन्हा धडकू, म्हणून तिने दोन्ही हात त्याच्या खांद्यावर ठेवले होते.

अभिराजने गाडी एका बिल्डिंगच्या खाली उभी केली. ऋतुजा गाडीवरुन उतरली. अभिराज अजूनही काहीच बोलत नाहीये, हे बघून ती म्हणाली,
"अभी, आता बोललास तरी चालेल."

अभिराज हसून म्हणाला,
"थँक् गॉड. मला केव्हाचं बोलायचं होतं, पण तुला आवडेल की नाही? याचा विचार करुन काहीच बोलत नव्हतो.

ऋतू, आपल्यात शांतताही बरंच काही बोलून गेली. शांतता इतकी छान असते, असं माहीत असतं तर मी तुझ्यासोबत जास्त बोललो नसतो."

"अभी, आता आपण ज्या कामाला आलो आहोत, ते करुयात का? तुला बोलण्याची संधी मिळाली की, तू बोलत सुटतो." ऋतुजा कमरेवर हात ठेवून चिडून म्हणाली.

"सॉरी यार, माझं हे असंच असतं. माझ्यामागे ये." अभिराज पुढे चालत होता, त्याच्या पाठोपाठ ऋतुजा चालत होती. अभिराज तिला एका फ्लॅटमध्ये घेऊन गेला.

"हा आहे आपला गरिबाचा महाल." अभिराज फ्लॅटकडे बघून म्हणाला.

"गरिबाचा म्हणू नकोस. तू मोठ्या कष्टाने हा फ्लॅट घेतला आहेस. तू जरी मिश्कीलपणे म्हणाला असशील, तरी माझ्यासाठी हा महालापेक्षा कमी नाहीये. पण हा आपल्या स्वप्नाचा महाल असणार आहे. ह्याच घरात आपण आपलं भविष्य जगणार आहोत. " ऋतुजा म्हणाली.

"अगदी खरं आहे. ऋतू, फ्लॅट बघून इंटेरिअर कसं असावं? असं तुला वाटतं." अभिराजने ऋतुजाकडे बघून विचारले.

"अभी, एक सांगू. इतक्या घाईत तू फ्लॅटचं इंटेरिअर करु नकोस. लग्न झाल्यावर आपण यावर निवांत विचार करु. आधीच आपल्या दोघांनाही लग्नाची भरपूर कामं आहेत." ऋतुजा म्हणाली.

"माझ्या लक्ष्मीला मला ह्या घरात आणायचे होते." अभिराज म्हणाला.

"अभी,मला तुझ्या भावना समजत आहेत, पण हे सगळं आत्ता केलं, तर तुझी खूप धावपळ होईल. शिवाय घाईत करता करता आपल्याला बरंच कॉम्प्रमाइज करावं लागेल. अभी, आपलं लग्न हा आपल्या आयुष्यातील एक खास क्षण आहे आणि तो तू एन्जॉय करावास असं मला वाटतं." ऋतुजा म्हणाली.

"तुझं म्हणणं बरोबर आहे. आरतीही मला तेच म्हणत होती. धावपळ तर होईलचं. आपण लग्नानंतर फ्लॅटचं काम करुयात." अभिराजला ऋतुजाचं बोलणं पटलं होतं.

"आता आपण निघूयात का?" ऋतुजाने विचारले.

"जरावेळ बसू म्हटलं तर तू ऐकणार नाहीस. चल निघूयात." अभिराज म्हणाला.

निघताना ऋतुजा गाडीवर बसत असताना अभिराज मिश्किल हसून म्हणाला,
"माझ्याजवळ सरकून बसलीस, तर ब्रेक दाबल्यावर तुला माझ्या अंगावर आदळण्याची गरज पडणार नाही. कंबरेला धरलंस तर अजून बेटर होईल."

"बरं. आता कुठेच थांबू नकोस. मला डायरेक्ट घरी सोड. आता तसंही आपल्याला घरी जायला ट्रॅफिकमुळे उशीर होणार आहे." ऋतुजाने इकडे तिकडे बघत त्याला सांगितले.

"आता तुही काही बोलणार नाहीस आणि मीही काही बोलणार नाहीये. मला आपल्यातील अबोल शांततेचा आनंद घ्यायचा आहे." अभिराज गाडी सुरु करत म्हणाला.

जोपर्यंत ऋतुजा त्याच्या जवळ सरकून बसत नाही, तोवर अभिराज गाडी पुढे नेत नव्हता. जागच्या जागी थांबून गाडीची मूठ आवळून गाडी रेस करत होता. ऋतुजाला त्याची ती भाषा उमगली होती. ऋतुजा शेवटी त्याच्याजवळ सरकून बसली.

आपल्या दोन्ही हातानी त्याच्या कंबरेभोवती तिने विळखा घातला होता. अभिराजने गाडी सुरु केल्यावर तिने आपली मान त्याच्या खांद्यावर टाकून दिली होती. तिच्या मुलायम केसांचा स्पर्श त्याच्या मानेला होत होता. त्या होणाऱ्या थोड्याशा स्पर्शातून दोघे भरपूर काही बोलून जात होते. पुढे गेल्यावर अभिराजने एका हाताने तिचा एक हात हातात घेतला. ऋतुजाने हात झटकून त्याच्या हातातील हात बाजूला केला.

अभिराजने ब्रेक मारुन गाडी थांबवल्यावर ऋतुजा मान वर करत म्हणाली,
"अभी, गाडी का थांबवलीस?"

"घरी जायचं नाहीये का?" अभिराजने विचारले.

ऋतुजा आजूबाजूला बघत म्हणाली,
"अरे बापरे! घर आलंपण. मला तंद्री लागली होती."

ऋतुजा पटकन गाडीवरुन खाली उतरली. अभिराजने तिचा हात धरुन स्वतःकडे खेचलं.

"मला नीट बाय न म्हणता निघून जाणार आहेस का?" अभिराजने ऋतुजाच्या चेहऱ्याकडे बघत विचारले.

ऋतुजा गालातल्या गालात हसून म्हणाली,
"अभी, नीट बाय म्हणजे काय असतं?"

"आता तुला ते सांगावं लागेल. मला काय म्हणायचं आहे? हे जसं तुझ्या लक्षात आलं नसेल का? मुद्दाम वेड पांघरुण पेडगावला जाण्याचं नाटक करत आहेस." अभिराजने सांगितले.

अभिराजच्या हातातील आपला हात सोडवत ती म्हणाली,
"अभी, मला आता जाम झोप येत आहे. पटकन घरात जाऊन जेवण करते आणि झोपते."

"स्वप्नात मला बघण्याची जास्त घाई झाली आहे वाटतं." अभिराज स्माईल देऊन म्हणाला.

"इतका कॉन्फिडन्स की, माझ्या स्वप्नात तुच येशील म्हणून." ऋतुजा म्हणाली.

"माझ्या स्वप्नात तर तुच येशील. तुझा तो स्पर्श, मऊ केस. लाजून लाल झालेला चेहरा." अभिराज बोलत असतानाच ऋतुजा म्हणाली,

"अभी, बसं झालं. तुही जा आणि मलाही जाऊदेत प्लिज."

"तू लगेच नाही गेलीस, तर मग तुझा पाय निघणार नाही, बरोबर ना. मी लगेच जातो, फक्त ते तीन मॅजिकल शब्द म्हणून जा." अभिराज मिश्किल हसून म्हणाला.

"अभी, मी जाते." असं बोलून ऋतुजा जवळ जवळ पळालीचं.

अभिराज मात्र तिच्या पाठमोऱ्या प्रतिमेकडे बघत तिथेच चेहऱ्यावर हसू आणून पुढील कितीतरी वेळ विचार करत बसलेला होता.