Login

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ८०

सुरुवात एका नवीन नात्याची
अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ८०

मागील भागाचा सारांश: अभिराज ऋतुजाला आपला नवीन फ्लॅट दाखवायला घेऊन गेला होता. लग्नानंतर निवांत फ्लॅटचं इंटेरिअर करुन घेऊयात असं ऋतुजाने अभिराजला सुचवले. अभिराजला ऋतुजाचे म्हणणे पटले होते.

आता बघूया पुढे….

नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट व्हायचं असल्याने ऋतुजाच्या घरी सामान भरायची धावपळ सुरु होती. सुरुवातीला गरजेपुरते लागणारे सामान घेऊन जाणार होते. नंतर जसा वेळ मिळेल तसा बाकीचं सामान घेऊन जायचे असे ठरले होते.

ऑफिस मधून घरी आल्यावर ऋतुजाचं आपलं सामान भरण्यातचं वेळ जात होता. यात ती अभिराज सोबत कमी बोलत होती. एके दिवशी रात्री नऊच्या सुमारास अभिराज ऋतुजाच्या घरी गेला. अभिराजला अचानक घरी आलेलं बघून ऋतुजाचे बाबा म्हणाले,
"अभी, आज इकडे असा अचानक कसा आलास?"

"इथे मागच्या कॉलनीमध्ये माझा एक मित्र रहायला आला आहे, त्याच्याकडे आलो होतो, तर म्हटलं तुम्हालाही भेटून जाऊ." अभिराजने उत्तर दिले.

"आम्हाला की ऋतुजाला?" हातात पाण्याचा ग्लास घेऊन येत ऋतुजाची आई म्हणाली.

यावर अभिराजने खाली मान घालून फक्त स्माईल दिली.

"आता आला आहेस,तर जेवणच करुन जा." ऋतुजाचे बाबा म्हणाले.

"नाही नको. मित्रासोबत माझं खाऊन झालंय." अभिराजने सांगितले.

तेवढ्यात ऋतुजा तिच्या रुममधून बाहेर आली. समोर अभिराजला बघून ती आश्चर्याने म्हणाली,
"अभी, तू कधी आलास?"

"आत्ताच." अभिराजने उत्तर दिले.

"काही खायला आणलं आहेस का?" ऋतुजाने विचारले.

अभिराजने मान हलवून नकार दर्शवला, पण ती अशी का बोलत होती? हे त्याला कळत नव्हते.

"ऋतू, तू त्याला असं का विचारलं?" ऋतुजाच्या बाबांनी विचारले.

"बाबा, आईने आज शेवग्याच्या शेंगांची भाजी केली आहे. मला अजिबात आवडत नाही. मला असं काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होत आहे." ऋतुजाने सांगितले.

"ऋतू, दररोज भाजी काय करायची? हा किती मोठा प्रश्न असतो, हे तुला लग्न झाल्यावर कळेल. एरवी शेवग्याच्या शेंगांची भाजी खायची. आज काय झालंय, काय माहीत?" ऋतुजाच्या आईने प्रतिक्रिया दिली.

"तुला जर चटपटीत खाण्याची इच्छा होत असेल, तर आपण बाहेर जाऊन खाऊ शकतो." अभिराजने सुचवले.

"चालेल. मी पाच मिनिटाच्या आत आवरुन येते." ऋतुजा एकदम खुश होत रुममध्ये गेली.

आई-बाबांच्या परवानगीची वाट न बघता ऋतुजा अभिराज सोबत घराबाहेर पडली. ऋतुजाने अभिराजला गाडी जवळच्या हॉटेलमध्ये घ्यायला सांगितली. हॉटेलमध्ये गेल्यावर ऋतुजाने ऑर्डर दिली.

"ऋतू, हे काय होतं? मी तुला असं कधीच बघितलं नव्हतं. आई-बाबांना काही बोलायला वेळही दिला नाही. त्यांना काय वाटलं असेल?" अभिराज आश्चर्याने ऋतुजाकडे बघून बोलत होता.

"अभी, तुला माझ्याशी बोलायचं होतं, म्हणून तू घरी आला होतास. घरातील वातावरण बघता आपल्याला एकमेकांशी बोलता आलं नसतं, म्हणून मला हे नाटक करावं लागलं. कारल्याची भाजी सोडली तर जवळपास सगळ्याच भाज्या मी खाते." ऋतुजा हसून म्हणाली.

"म्हणजे तू हे सगळं माझ्यासाठी केलंस?" अभिराजने विचारले.

"नाही. मी हे आपल्यासाठी केलं. अभी, जसं तुला मला भेटावं वाटतं, तसंच मलाही तुला भेटायची इच्छा होते. घर शिफ्टिंग चालू असल्याने इतकी काम आहेत की, त्यातून तुझ्याशी बोलायला सुद्धा वेळ मिळत नाही. मलाही तुझी खूप आठवण येते. एकतर आपले ऑफिस सुद्धा दूर आहेत, शिवाय तू आणि मी वेगवेगळ्या एरियात राहतो, त्यामुळे दररोज भेटणं तर शक्य नाही, पण आठवड्यातून एक-दोन वेळेस भेटावं असं वाटतं." ऋतुजा बोलत असताना अभिराज तिच्याकडे एकटक बघत होता.

वेटर ऑर्डर घेऊन आल्यावर अभिराजची तंद्री भंग पावली. ऋतुजाने व्हेज मंच्युरीअन ऑर्डर केले होते.

"अभी, माझ्याकडे फक्त असा बघत राहणार आहेस की, काही खाणार सुद्धा आहेस. माझ्याकडे बघून पोट भरणार नाहीये." ऋतुजा खाता खाता म्हणाली.

"पोट भरेल की नाही माहीत नाही, पण मन मात्र भरेल." अभिराज म्हणाला.

"अभी, लग्नानंतर मला असंच चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यावर काही तक्रार न करता बाहेर घेऊन येशील ना?" ऋतुजाने विचारले.

"हो मग. हे काय विचारण झालं. तुझ्यासाठी काही पण करायला तयार आहे आणि असेल. समजा कधी मला तुझ्या मनातील भावना समजल्या नाहीत तर माझा कान पिरगळून सांगत जा." अभिराजने सांगितले.

"फक्त कान पिरगळणार नाही, तर कानात ओरडून सांगेल." ऋतुजा हसून म्हणाली.

"आज तुला काही चावलंय का? वेगळीच वागत, बोलत आहेस." अभिराज म्हणाला.

"अभी, नेहमी सिरीयस राहून कंटाळा येतो रे. तुझ्यासमोर ओपन होणार नाही, तर कोणासमोर होणार. मी अशीही आहे, हे फक्त माझ्या जवळच्या काही लोकांनाच माहीत आहे. तू तर माझ्या सगळ्यात जवळचा आहेस, मग तुला तर माझं हे रुप माहितीचं असायला हवं ना." ऋतुजाने सांगितले.

"हो बरोबर. आपल्या दोघांचं एकमेकांना सगळंच माहीत असायला हवं. ऋतू, आपल्यात काहीच सिक्रेट असायला नको. जे आहे ते सरळ काहीही विचार न करता सांगून मोकळं व्हायचं." अभिराज म्हणाला.

"हो, मी हेच म्हणणार होते. बाकी पंकज दादांचा जॉब कसा सुरु आहे? घरी सगळं ठीक आहे ना?" ऋतुजाने विचारले.

"हो, सगळं ठीक आहे. पंकजचा जॉबही व्यवस्थित सुरु आहे. घरी सध्या फक्त आपल्या लग्नाची चर्चा सुरु असते. अर्थात मला ते वातावरण आवडत आहेच." अभिराजने सांगितले.

"आमच्याकडेही तसंच सुरु आहे." ऋतुजा म्हणाली.

गप्पा मारता मारता अभिराज व ऋतुजाने जेवण केले. ऋतुजा तिचं आवडीचं आईस्क्रीम खायला अभिराजला घेऊन गेली. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर ऋतुजा म्हणाली,
"अभी, मला आता घरी सोडून दे आणि तुही घरी जा. आपल्या गप्पांच्या नादात बराच उशीर झाला आहे. अजून उशीर झाला, तर आमच्या मातोश्रींच्या अंगात दुर्गामाता संचारतील."

"तुला घरी सोडून जाण्याची अशी इच्छा होत नाहीये." अभिराज म्हणाला.

"अभी, अजून थोडे दिवस. मग आपण कायम सोबतच राहणार आहोत." ऋतुजा म्हणाली.

अभिराजने ऋतुजाला तिच्या घरी सोडले. घरात पाऊल ठेवल्याबरोबर ऋतुजाची आई म्हणाली,
"ऋतू, लग्नाच्या आधी रात्रीच्या वेळी असं इतक्या वेळ फिरणं योग्य दिसत नाही. कोणी पाहिलं तर उगाच वेगवेगळ्या चर्चा करत बसतात."

यावर ऋतुजा एक खोल श्वास घेऊन म्हणाली,
"आई, पहिली गोष्ट मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत फिरत होते. मला त्याच्या सोबत वेळ घालवणे चांगलं वाटतं. दुसरी गोष्ट मला कोणाला काय वाटतं? याचा विचार करण्याची गरज वाटत नाही. तिसरी गोष्ट सुलभा मावशीची भाषा बोलणं बंद कर. मला यावर अजून भाष्य करुन माझा मूड खराब करायचा नाहीये."

एवढं बोलून ऋतुजा आपल्या रुममध्ये निघून गेली. ऋतुजाने ज्या आवेगात दरवाजा लोटला, त्यावरुन तिला आईच्या बोलण्याचा किती राग आला असेल? हे समजून येत होते.