Login

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ८१

सुरुवात एका नवीन नात्याची
अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ८१

मागील भागाचा सारांश: ऋतुजा व तिच्या घरचे शिफ्टिंग करण्यात व्यस्त होते. ऋतुजा सोबत बोलणं होत नसल्याने अभिराज तिच्या घरी गेला. ऋतुजाने घरी खोटं बोलून ती अभिराज सोबत बाहेर जेवायला गेली. दोघांनी भरपूर गप्पा मारल्या. घरी यायला उशीर झाल्यावर ऋतुजाची आई तिच्यावर रागावली होती.

आता बघूया पुढे….

दुसऱ्या दिवशी सकाळी ऋतुजाला उठायला उशीर झाला होता. ती पटपट आवरुन डबा घेऊन नाश्ता न करता ऑफिसला निघून गेली.

"ऋतू, कधीकधी किती रागवते. आज नाश्ता न करताच ऑफिसला गेली. माझ्यावरचा राग अन्नावर काढण्याची काहीच गरज नव्हती." ऋतुजाची आई किचनमध्ये काम करता करता बोलत होती.

"वैशाली, ऋतूला उठायला उशीर झाला होता, म्हणून नाश्ता न करता गेली असेल. तिला जर अन्नावर राग काढायचा असता, तर ती डबा घेऊन गेली नसती. काल तिला घरी उशीरा घरी येण्यावरुन बोलायची गरज नव्हती. आता ती आपल्या घरी थोड्या दिवसांची पाहुणी आहे. आपणच तिला समजून घ्यायला हवं." ऋतुजाच्या बाबांनी सांगितले.

"तुमचं म्हणणंही खरं आहे. मी एवढी बडबड करायला नको होती. आज रात्री तिच्या आवडीचा काहीतरी पदार्थ करते, म्हणजे तिचा राग जाईल." ऋतुजाच्या आईला तिची चूक उमजली होती.

ऋतुजाला गुलाबजाम आवडायचे, म्हणून आईने तिचा राग घालवण्यासाठी गुलाबजाम केले होते. संध्याकाळी ऑफिस मधून घरात आल्याबरोबर ऋतुजा वास घेऊन म्हणाली,
"आई, आज तू गुलाबजाम केले आहेत का?"

"हो, तुझा राग घालवण्यासाठी तिने गुलाबजामचा घाट घातला आहे." हॉलमध्ये बसलेल्या बाबांनी सांगितले.

ऋतुजाची आई किचनच्या बाहेर येऊन एका कोपऱ्यात चेहऱ्यावर मंद हसू आणून उभी होती. ऋतुजा आईकडे बघून म्हणाली,
"आई, अग पण मी तुझ्यावर रागावलेच नव्हते. काल मला घरी यायला उशीर झाला, तेव्हाच तुझी बडबड ऐकावी लागणार या तयारीत मी आले होते. तुझं बोलण मी कधीच मनावर घेत नाही. मी फ्रेश होऊन येते, मग गुलाबजामची मजा घेते."

शनिवार पर्यंत ऋतुजाच्या घराचं शिफ्टिंग पूर्ण झालं होतं. रविवारी पुजा करुन घरात रहायला जायचं ठरलेलं होतं. वास्तूशांतीचा कार्यक्रम छोटेखानी असल्याने मोजक्या जवळच्या पाहुण्यांना बोलावलं होतं. अभिराज एकटाच कार्यक्रमाला गेला होता.

"अभी, हे काय तू एकटाच आलास? पंकज दादा आणि आरती दीदी आल्या नाहीत." ऋतुजाने पंकजला विचारले.

"कार्यक्रम घरगुती आणि छोटा असल्याने ते दोघे यायला नको म्हणाले." अभिराजने उत्तर दिले.

"ते दोघे घरातीलच आहेत ना. मी नंतर त्यांची शाळा घेईल." ऋतुजा म्हणाली.

ऋतुजाच्या बाबांनी अभिराजची ओळख उपस्थित असलेल्या नातेवाईकांसोबत करुन दिली. कार्यक्रम झाल्यावर अभिराजने ऋतुजा व तिच्या घरच्यांचा निरोप घेतला.

पुढील दोन-तीन दिवसांनी ऋतुजाने अभिराजला संध्याकाळी ऑफिस जवळील कॅफेत बोलावून घेतले.

"आज कशी काय आमची आठवण झाली?" अभिराजने विचारले.

"तुझी आठवण दररोजचं येते. आज भेटून बोलावसं वाटलं म्हणून बोलावलं." ऋतुजाने उत्तर दिले.

"चेहऱ्यावरुन उदास दिसत आहेस. काही झालंय का?" अभिराजच्या बोलण्यात काळजी होती.

"अभी, नवीन फ्लॅटमध्ये रहायला गेल्यापासून माझी जाम चिडचिड व्हायला लागली आहे." ऋतुजाने उत्तर दिले.

"नवीन जागेत रमायला वेळ लागणारच, त्यामुळे चिडचिड होणे स्वाभाविक आहे." अभिराज म्हणाला.

"फक्त त्यामुळेच नाही. आमच्या जुन्या घरी असताना जास्तीत जास्त वेळ आम्ही तिघेच असायचो. रणजीत दादा आणि ते कधीतरी यायचे. आता होतं काय ना, सकाळी मला, रणजीत दादा व अर्पिता वहिनी आम्हा तिघांना आपापल्या कामावर जाण्याची घाई लागलेली असते. पहिले फक्त माझी एकटीची धावपळ असायची. आरव मधेमधे करायला असतोच.

संध्याकाळी घरी गेल्यावर सुद्धा त्याचा दंगा सुरु असतो. थोड्यावेळ शांतता लाभत नाही." ऋतुजा तिचं मन मोकळं करत होती.

"ऋतू, हे सगळं होणं स्वाभाविक आहे. तुला त्या घरात तसंही थोड्या काळ रहायचं आहे. मग आपल्या घरी रहायचं आहे. घरात कमी माणसांची सवय असल्यावर अचानक माणसं वाढली की, आपली चिडचिड होतेच.

रणजीत दादा, अर्पिता वहिनी आई-बाबांसोबत राहतील, हे सगळ्यात चांगलं असेल. तुला त्यांची नंतर काळजी वाटणार नाही. आई-बाबा खुश आहेत ना?" अभिराजने विचारले.

"आई-बाबा खूप जास्त खुश आहेत. आईला रणजीत दादा अतिप्रिय असल्याने तो जवळ आहे, म्हणून तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आहे. आरवमुळे बाबांची चांगलीच करमणूक झाली आहे. आईच्या ताब्यात किचन असलं की बस, बाकी तिला वेगळं काही लागत नाही." ऋतुजाने सांगितले.

"आता जे तू मला सांगत नाहीयेस ते मी तुला सांगतो. पहिले आई-बाबा फक्त तुझ्याशी बोलायचे. तुला जास्तीत जास्त वेळ दयायचे. आता तोच वेळ तुम्हा चौघांमध्ये वाटून जात आहे, म्हणून तुझी जास्त चिडचिड होत आहे." अभिराज म्हणाला.

यावर ऋतुजा म्हणाली,
"अभी, तू काय परफेक्ट ओळखलं? मला हेच म्हणायचं होतं."

"ऋतू, हे विचार तुझ्या मनात येणं स्वाभाविक आहे. पण हे बघ. तू गेल्यावर आई-बाबा एकटे पडणार नाहीत. त्यांना तुझी कमी भासणार नाही आणि हे जास्त महत्त्वाचं आहे." अभिराजने सांगितले.

"अभी, हे सगळं मला कळतंय, पण वळत नाहीये." ऋतुजा म्हणाली.

"हो, पण ते आपल्याला वळवून घ्यावं लागणार आहे. आता मी जे विचारतोय, त्याचा राग मानून घेऊ नकोस. लग्नानंतर पंकज आणि आरती आपल्या सोबत एकाच घरात राहिल्यावर तुला काही प्रॉब्लेम होणार नाही ना?" अभिराजने थोडा विचार करुन विचारले.

"अभी, मी या आधीही सांगितलं आहे की, मला त्यांनी आपल्या सोबत राहिलेलं मला चालणार आहे. लग्नानंतर आपल्याला ऍडजस्टमेंट करावी लागणार, हे आधीच माहीत असल्याने मनाची ती तयारी असते. आता लग्नानंतर आपलं शेड्युल कसं असेल? यावर ते सगळं अवलंबून असेल. समजा लग्न झाल्यावर मला असं काही वाटलंच तर मी तुला तशी कल्पना देईल. आता लगेच वेगळं राहण्याचा विचार करायला नको." ऋतुजाने सांगितले.

"मला तुझं उत्तर माहीत होतं. आरती म्हणत होती की, त्यांच्या दोघांमुळे आपल्यात वाद निर्माण व्हायला नको." अभिराज म्हणाला.

"आरती दीदींना तसं वाटणं स्वाभाविक आहे, पण सुरुवातीला तरी आपण एकत्रच राहुयात. एकदा सूत्र जुळलं की, मग काहीच प्रॉब्लेम येणार नाही. सगळ्यांनी समजून घेतलं की, भांड्याला भांड लागत नाही. आता आमच्याकडे अर्पिता वहिनीला एकत्र राहण्याची सवय नसल्याने बराच त्रास होत असेल, पण त्या समजून घेतच आहेत. नातं टिकवण्यासाठी थोडा समजूतदारपणा दाखवला तर काय हरकत आहे." ऋतुजाने आपली प्रतिक्रिया दिली.