Login

अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ८२

सुरुवात एका नात्याची
अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ८२

मागील भागाचा सारांश: ऋतुजा आणि तिचे कुटुंबीय नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाले. वास्तुशांतीचा छोटेखानी कार्यक्रम मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. घरात माणसं वाढल्याने ऋतुजाला स्वतःच्याच घरात अवघडल्यासारखे झाले होते, तिने तिचं मन अभिराज कडे मोकळं केलं.

आता बघूया पुढे…

शनिवार व रविवार ह्या दोन दिवशी प्रीवेडिंग फोटो शूट करण्याचे ठरले होते. जागा पुण्याजवळील ठरली होती.

"ऋतू, उद्या तू कोणाला सोबत घेणार आहेस? कपडे आणि मेकअपला तुला कोणीतरी मदतीला असायला हवं." अभिराजने ऋतुजाला फोन केल्या केल्या बडबड सुरु केली.

"अभी, इतका पॅनिक होऊ नकोस. मी रश्मीला सोबत घेणार आहे." ऋतुजाने शांतपणे उत्तर दिले.

"पॅनिक असं नाही, पण आपलं फोटोशूट बेस्ट झालं पाहिजे." अभिराज म्हणाला.

"होईल. बरं ऐक, फोटोग्राफर त्याची गाडी घेऊन येईल. आपण बाबांची गाडी घेऊन जाऊयात. तू गाडी चालवू शकशील ना? की दुसऱ्या कोणाला घ्यायचं आहे?" ऋतुजाने विचारले.

"मी गाडी चालवेल. हवंतर सोबत पंकजला घेऊन येतो, म्हणजे काही मदत लागली तर तो असेल." अभिराजने उत्तर दिले.

"गुड. सकाळी घरुन आईकडून जेवणाचा डबा घेते म्हणजे रस्त्यात थांबून जेवणासाठी टाईमपास होणार नाही. उद्या बऱ्यापैकी शूट उरकायला हवं. माझे सगळे कपडे मी बॅगमध्ये पॅक करुन ठेवले आहेत. तुही सगळे कपडे, चप्पल, शूज, घड्याळ सोबत घेऊन ठेव." ऋतुजाने अभिराजला आठवण करुन दिली.

"यस बॉस. सगळं काही सेट आहे?" अभिराज हसून म्हणाला.

"बरं चल. आता बोलत बसून वेळ घालवत नाही. लवकर झोपूयात म्हणजे डोळ्याखाली डार्क सर्कल वाढणार नाही. बाय." अभिराजने काही बोलण्याच्या आता ऋतुजाने फोन कट केला.

ऋतुजाने फोन कट केल्यावर अभिराज मनातल्या मनात म्हणाला,
"ह्या मुली पण ना. दिसण्याला जास्त महत्त्व देत बसतात. आता ऋतू नॅचरली इतकी सुंदर आहे, तरी चांगलं दिसण्याची काळजी करत बसते."

दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ऋतुजा तयार होऊन बसली होती. तिच्या आईने सगळ्यांना पुरतील एवढे मेथी बटाटा मिक्स पराठे करुन दिले होते. रश्मीला ऋतुजाने आपल्या घरी बोलावून घेतले होते. अभिराज व पंकजची ती वाट बघत बसली होती.

बिल्डिंगच्या खाली आल्यावर अभिराजने ऋतुजाला फोन करुन खाली आल्याचे सांगितले.

"आई, मी येते ग." ऋतुजा हातात बॅग घेऊन आईला सांगून घराबाहेर पडत होती, तोच तिची आई म्हणाली,

"ऋतू, अग त्यांना चहापाण्याला वरती बोलवायचं होतं ना."

"आई, आधीच ते उशीरा आलेत. आता अजून उशीर व्हायला नको. तू नंतर केव्हातरी त्यांचं आदरातिथ्य करत बस." ऋतुजा बोलून पटकन घराबाहेर पडली.

गाडीत सगळं सामान ठेवलं. पंकज गाडी चालवायला बसला होता. त्याच्या बाजूच्या सीटवर अभिराज बसला. मागे रश्मी व ऋतुजा बसल्या.

गाडी सुरु झाल्यावर पंकज म्हणाला,
"वहिनी, आज तुम्ही काहीच बोलत नाहीयेत. वातावरण चांगलंच तापलेलं दिसतंय."

"तुम्ही अर्धा तास उशीरा आला आहात. समोरच्याच्या वेळेची काही किंमत असते की नाही?" ऋतुजाने थोडी चिडून प्रतिक्रिया दिली.

"उशीर पंकजमुळे झालेला आहे. माझा काही संबंध नाही." अभिराजने आपली बाजू मांडली.

"दादा, वहिनींच्या नजरेत मला व्हिलन नको करुस." पंकज हसून म्हणाला.

"उशीर कोणामुळेही होवो, तो झाला आहे हे महत्त्वाचं. ऋतूला उशीर केलेला आवडत नाही. ती वेळेच्या बाबतीत एकदम वक्तशीर आहे. आता लक्षात ठेवा, नाहीतर लग्नानंतर याचवरून तुमच्यात भांडण होईल." रश्मीने अभिराजला सांगितले.

"पंकज, तुमचा जॉब कसा सुरु आहे?" ऋतुजाने विचारले.

"चांगला सुरु आहे. कलीग चांगले आहेत, सो काम करताना मजा येते आहे." पंकजने उत्तर दिले.

"अभी, फोटोग्राफरला फोन केला होता का?" ऋतुजाने अभिराजला विचारले.

"हो, तो पंधरा मिनिटांत लोकेशनला पोहोचणार आहे." अभिराजने सांगितले.

थोड्याच वेळेत सगळेजण लोकेशनला पोहोचले होते. फोटोग्राफर आधीच आलेला होता. फोटोग्राफरने आधी कोणते फोटो काढता येतील ते सांगितले, त्याप्रमाणे त्याने दोघांनाही कपडे घालायला सांगितले.

ऋतुजाच्या मदतीला रश्मी असल्याने तिला तयार होणं सोपं गेलं होतं. फोटोशूट करताना फोटोग्राफर अभिराज व ऋतुजाला एकमेकांच्या डोळयात बघायला सांगत होता, पण त्यावेळी दोघांनाही हसायला येत होतं. शेवटी फोटोग्राफर रागावला तेव्हा कुठे दोघांनी सिरीयस होऊन दोघांनी पोज दिल्या.

थोड्यावेळ ब्रेक घेऊन आईने दिलेले पराठे खाल्ले. मजा-मस्ती करत त्यांचं प्रीवेडिंग फोटोशूट पार पडलं.

घरी जाण्याच्या आधी रस्त्यात अभिराजने पंकजला गाडी एका हॉटेल जवळ थांबवायला सांगितली.

"दादा, जाम भूक लागली आहे. बरं झालं तू वेळेवर गाडी थांबवायला सांगितली." पंकज म्हणाला.

"मला तुझा चेहरा वाचता येतो." अभिराज बोलून हॉटेलमध्ये शिरला.

जेवणाची ऑर्डर दिल्यावर अभिराज म्हणाला,
"कितीतरी वर्षांनी एवढं हसलो असेल. मजा आली पण."

"त्यामुळे फोटोग्राफरची बडबड ऐकावी लागली." ऋतुजा म्हणाली.

"एकमेकांच्या डोळयात बघायला लागल्यावर हसू यायचं, त्याला मी काय करु?" अभिराज म्हणाला.

"तुम्ही दोघेही अजिबात रोमँटिक नाहीत." रश्मी मध्येच बोलली.

"आमचा रोमान्स आम्ही चारचौघात दाखवत नाही." ऋतुजाने आपली प्रतिक्रिया दिली.

"तुझं आपलं काहीही असतं."रश्मी म्हणाली.

"उद्याच्या फोटोशूटला एवढाच वेळ लागणार आहे का?" पंकजने विचारले.

"नाही, उद्या तासाभराचं काम राहिल आहे." अभिराजने सांगितले.

वेटर जेवण घेऊन आल्यावर चौघांनी जेवणावर ताव मारला. ऋतुजा व रश्मीला घरी सोडून अभिराज व पंकज त्यांची गाडी घेऊन निघून गेले.

दुसऱ्या दिवशी वेगळ्या लोकेशन वर फोटोशूट होतं. तेही फोटोशूट हसत खेळत पार पडलं. अभिराज व ऋतुजाने व्हिडीओला टाकण्याचे गाण्यांची लिस्ट काढून फोटोग्राफरकडे दिली होती.