अरेंज कम लव्ह मॅरेज भाग ८३
मागील भागाचा सारांश: अभिराज व ऋतुजाचे प्रीवेडिंग फोटोशूट मजेत पार पडले. पंकज व रश्मी त्यांच्या मदतीला गेले होते.
आता बघूया पुढे….
नेहमीप्रमाणे ऋतुजा ऑफिस मधून येऊन फ्रेश होत होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. स्क्रीनवरील नाव बघून ऋतुजाच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल आली.
"बोला मॅडम, बाळाच्या आईला मला फोन करायला वेळ कसा मिळाला?" ऋतुजाने फोन उचलून विचारले.
"आता बाळाची मावशी फोन करत नाही म्हटल्यावर त्याच्या आईला पुढाकार घ्यावा लागेल ना." शरयूने हसत उत्तर दिले.
"बोल, काय म्हणतेस? कशी आहेस?" ऋतुजाने विचारले.
शरयू म्हणाली,
"माझं सगळं सध्या बाळाभोवती सुरु आहे. तुझी लग्नाची तयारी कुठंवर आली? अभिराज व माझी भेट घालून देणार आहेस की नाही?"
"माझं सगळं सध्या बाळाभोवती सुरु आहे. तुझी लग्नाची तयारी कुठंवर आली? अभिराज व माझी भेट घालून देणार आहेस की नाही?"
"जवळपास सगळीच खरेदी झाली आहे. थोडं किरकोळ सामान घ्यायचं राहील आहे. अभिराज आणि तुझी भेट आता आमच्या लग्नातच होईल." ऋतुजाने सांगितले.
"बरं, ऐक. मी तीन-चार दिवसांनी आईकडे येणार आहे. केळवणासाठी तुला आणि तुझ्या आई-बाबांना घरी यायचं आहे. आईने फोन करुन सांगायला सांगितलं होतं." शरयू म्हणाली.
यावर ऋतुजा म्हणाली,
"मी येईल, पण आई-बाबा येतील असं वाटत नाही. लग्नाला मोजून पंधरा दिवस राहिले आहेत. कामं बरीच बाकी आहेत. शिवाय सगळीकडचं जेवण करुन त्या दोघांची तब्येत बिघडायला नको, म्हणून ते दोघे कुठेच जेवायला जाणार नाहीयेत."
"मी येईल, पण आई-बाबा येतील असं वाटत नाही. लग्नाला मोजून पंधरा दिवस राहिले आहेत. कामं बरीच बाकी आहेत. शिवाय सगळीकडचं जेवण करुन त्या दोघांची तब्येत बिघडायला नको, म्हणून ते दोघे कुठेच जेवायला जाणार नाहीयेत."
"बरोबर आहे. आई-बाबांची तब्येत महत्त्वाची आहे. तुला कधी जमेल, ते मला सांगशील." शरयू म्हणाली.
"हो, मी तुला कळवते. मी इतक्यात ऑफिस मधून आले आहे. तुला निवांत फोन करते, नाहीतर भेटल्यावर बोलूयात." ऋतुजाने बोलून फोन कट केला.
ऋतुजा रूममध्ये फोन चार्जिंगला लावून हॉलमध्ये गेली, तर आरव तिच्या बाबांसोबत मस्ती करत होता. ऋतुजाची आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती, तर अर्पिता तिला मदत करत होती.
"आज सासू-सुना मिळून स्वयंपाक करत आहेत." ऋतुजा किचनमध्ये जाऊन म्हणाली.
"स्वयंपाक आईचं करत आहेत, मी फक्त थोडीफार मदत करते. आरवकडे बाबा लक्ष देतात, मग मला स्वयंपाक घरात वेळ देता येतो." अर्पिताने सांगितले.
"तू कोणाशी फोनवर बोलत होतीस?" आईने ऋतुजाला विचारले.
"शरयूचा फोन होता. केळवणासाठी आमंत्रण देत होती. कोणाकडे जेवायला गेलं नाही, तरी चालेल, पण रश्मी व शरयूच्या घरी जावंच लागेल." ऋतुजाने सांगितले.
"आता जवळच्या मैत्रिणी म्हटल्यावर जावं लागेलचं. ऑफिस मधून किती दिवसांची सुट्टी काढली?" अर्पिताने विचारले.
"एक महिना." ऋतुजाने उत्तर दिले.
"लग्न, त्यानंतरचे विधी आणि हनिमून यात तेवढे दिवस निघूनच जातील." अर्पिता म्हणाली.
"ऋतू, रणजीत कधीपर्यंत घरी येईल? हे फोन करुन विचार. लवकर येणार असेल तर त्याच्या साठी जेवणाला थांबूयात, नाहीतर जेवण करुन घेऊ." आईने सांगितले.
ऋतुजाने रणजीतला फोन केला, तर तो पंधरा मिनिटात येणार आहे हे कळल्यावर सगळेजण त्याच्या साठी जेवायला थांबले होते. रणजीत आल्यावर एकत्र बसून गप्पा मारता मारता सगळ्यांनी जेवण केलं.
शरयू तिच्या आईच्या घरी आल्यावर तिने ऋतुजाला फोन करुन कळवले होते. ऋतुजाला वेळ मिळाल्यावर ती शरयूकडे केळवणासाठी गेली होती.
शरयूने पाट मांडला होता, त्याभोवती फुलांची रांगोळी काढली होती. जेवणाचे ताटही मस्त सजवलेले होते.
"ह्या ताटाकडे बघून काही खाण्यापेक्षा बघतच रहावे वाटत आहे." ऋतुजाने आपली प्रतिक्रिया दिली.
"आपण फोटो काढले आहेत, ते नंतर बघत बस. आता जेवणाला सुरुवात कर. थंड होऊन जाईल आणि माझं बाळही झोपेतून उठेल. मग आपल्याला गप्पा मारता येणार नाही." शरयूने सांगितले.
ऋतुजा व शरयूने गप्पा मारता मारता जेवण केले.
"ऋतू, अभिराज खान्देश मधील असल्याने तुमच्या चालीरीती बऱ्यापैकी वेगळ्या असतील ना? तुला सगळंच ऍडजस्ट करायला वेळच लागेल." शरयूला प्रश्न पडला होता.
"हो, चालीरीती बऱ्यापैकी वेगळ्या आहेत. अभी आणि त्याच्या घरचे सगळेजण समजूतदार आहेत, सो ते मला समजून घेतील. आता हेच बघ ना, त्यांच्याकडे हळद वेगवेगळी होते. मुलाची त्याच्या घरी आणि मुलीची तिच्या घरी. आता त्याचं घर आहे सुरतला आणि आमचं लग्न आहे पुण्याला.
आमच्याकडे मुला-मुलीची हळद एकत्रच होते. इतक्या लांबून लग्नाच्या दिवशी येणं शक्य नसल्याने त्यांनी आमच्याकडील पद्धतीने लग्न करायचं ठरवलं आहे. अभीच्या घरचे समजदारी दाखवत आहेत." ऋतुजाने सांगितले.
"आता सगळ्यांचे गोडवे गात आहेस. पुढे जाऊन गाऱ्हाणे करायला माझ्याकडेच येशील." शरयू मिश्किल हसून म्हणाली.
"असं का म्हणतेस ग?" ऋतुजाने विचारले.
"ऋतू, तू जसं त्यांचं वर्णन करत आहेस, ते तसे असतीलही. पण घर म्हटलं की, भांड्याला भांड लागणारचं. अभी सगळंच समजून घेईल, पण घरातील बाकीचे सगळेच तसे असतील असं नाही. मला तुला घाबरवून द्यायचं नाहीये, फक्त थोडी ऍडजस्टमेंट करायला तयार रहा, म्हणजे ऐनवेळी तुला त्रास होणार नाही." शरयूने ऋतुजाला समजावून सांगितले.
"हो. मी सगळं लक्षात ठेवेल. तुला ऍडजस्ट करायला त्रास झाला का?" ऋतुजाला प्रश्न पडला होता.
"लग्न झाल्यावर आपण दुसऱ्याच्या घरी जातो. तिकडे सगळंच वेगळं असतं. आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार आहे, हे मुलींना कुठेना कुठे माहीत असतंच. माझ्याही मनाची तयारी होती, पण सगळ्यांची मनं सांभाळताना दमछाक होते. नवरा आपल्याला समजून घेणारा असला की, त्याच्याकडे मन मोकळं करता येतं.
आपण सगळ्यांना समजून घेतो आहे आणि आपल्याला मात्र कोणीच समजून घेत नाही, हे ज्यावेळी कळतं तेव्हा वाईट वाटतं. पंकज मला समजून घ्यायचे, पण त्यांच्या घरातील इतरजण अजिबात ऍडजस्ट करायला तयार नव्हते. शेवटी पंकजने वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. आता तुला सगळंच सांगत बसत नाही. कधीतरी या विषयावर बोलूयात." शरयू बोलत असतानाच तिचं बाळ झोपेतून उठलं आणि त्या दोघींचं बोलणं अर्धवट राहिलं.
रश्मीच्या घरीही ऋतुजाचं साग्रसंगीत केळवण झालं. ऋतुजा बाकी कोणाच्या घरी केळवणाला गेली नाही.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
