Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४७

Story After Marriage
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ४७

मागील भागाचा सारांश: अभिराज व ऋतुजा ज्या ट्रेनिंगला जाणार होते, ते ट्रेनिंग अचानक कॅन्सल झालं. ते पुण्यात नसल्याने अभिराजची आई येणार होती, पण ट्रेनिंग कॅन्सल झाल्याचे कळताच त्याच्या आईने येणं कॅन्सल केलं. ऋतुजाला ही गोष्ट अजिबात पटली नव्हती.

आता बघूया पुढे…..

घरून लवकर निघाल्याने ऋतुजा कंपनीत लवकरच पोहोचली होती. ती तिच्या डेस्कच्या इथे जाऊन बसली होती.

“ट्रेनिंग कॅन्सल झाल्याने मूड ऑफ झालाय का?” ऋतुजाने समोर बघितले तर पाटील मॅडम तिथे उभ्या होत्या.

“मूड ऑफ झाला होता, पण इतकाही नाही.” ऋतुजाने उत्तर दिले.

“आज वेळेपेक्षा लवकर आली आहेस.” पाटील मॅडम.

“घरात थांबले असते तर कोणालातरी बोलले असते, भांडण होण्यापेक्षा घराबाहेर पडलेल बर.” ऋतुजा.

“तू माझ्या केबिनमध्ये ये, मग आपण बोलूयात.” पाटील मॅडम त्यांच्या केबिनमध्ये निघून गेल्या. ऋतुजाही त्यांच्या पाठोपाठ गेली.

“आज तू ज्या कारणाने लवकर घरी आलीस, माझंही लवकर येण्याचं तेच कारण आहे.” पाटील मॅडम.

ऋतुजा यावर फक्त हसली.

“या सासवांचा जन्मच आपल्याला त्रास देण्यासाठी झालेला असतो.” पाटील मॅडम.

“तुम्ही एकत्र राहतात का?” ऋतुजाने विचारले.

“हो. सुरुवातीला मला गरज होती, मुलं लहान होती तेव्हा त्या आल्या नाहीत. आता डॉक्टर दवाखाना सुरू झाला, मग आल्या आहेत. आपण कितीही केलं तरी त्यांची बडबड सुरूच असते. आज सकाळी तेच झालं. मुलांचे डबे करून दिले व राहिलेला स्वयंपाक करत होते. त्यांची बडबड सुरू झाली, मग किचन मधील सगळा पसारा ठेवून इकडे निघून आले. नवऱ्याला सांगितलं, तू आणि तुझी आई बघून घ्या.

माझ्याही संयमाला अंत आहे ना. मी ऐकून घेते म्हटल्यावर त्या बोलतच राहतात. आता बस झालं, मी काहीच ऐकून घेणार नाही. प्रत्यत्तर करणे माझ्या संस्कारांमध्ये बसत नाही, त्यामुळे आता कृतीतून माझा निषेध नोंदवणार आहे.” पाटील मॅडमने सांगितले.

ऋतुजाने तिच्या सासूबाईंचा आजचाच किस्सा सांगितला व ती पुढे म्हणाली,

“मॅडम, माझं लग्न आता अलीकडेच झाल आहे, तरीही त्या अस करत आहेत. माझं काय चुकलंय हेच मला कळत नाहीये.”

“आपलं चुकतंय हाच आपला विचार चुकीचा आहे. तू काहीच चूक करत नाहीये. तुला मी एक सल्ला देते. तुझ्या सासूबाई तुम्ही घरी असल्याने आल्या नाहीत, यावर कोणाशीच बोलू नकोस. अगदी नवऱ्याशी सुद्धा. या विषयाला तुझ्या आयुष्यात फार काही महत्त्व नाही हे जाणवून दे.

या बायका अटेंशन सिकर असतात. आपण अस दाखवायचं की मला या सगळ्याने काहीच फरक पडत नाही. आताही जरी समजा त्या आल्यात तर हा विषय काढायचा नाही. आपण भल आणि आपलं काम भल. जास्त चांगलं बनायला जायचंच नाही, मग तोच चांगुलपणा आपल्या अंगलट येतो.” पाटील मॅडम.

“ही कल्पना छान आहे. त्या विषयावर मी बोलणारच नाही. तुमच्याशी बोलून बर वाटल, नाहीतर डोकं दुखत होत.” ऋतुजा.

“या असल्या घटनांचा त्रास करून घ्यायचा नाही.” पाटील मॅडम.

“चला मॅडम, मी येते. आजपासून नवीन प्रोजेक्ट वर्क सुरू होईल.” ऋतुजा.

“कधी बोलावसं वाटलं तर बोलत जा.” पाटील मॅडम.

ऋतुजा पाटील मॅडमच्या केबिन मधून बाहेर पडली. रश्मी डेस्कवर बसून कामाला लागली होती.

“तू इतक्या वेळ कुठे होतीस?” रश्मीने ऋतुजाला विचारले.

“पाटील मॅडमच्या केबिनमध्ये होते. आज मी व त्या लवकर आलो होतो, तर अशाच गप्पा मारत होतो.” ऋतुजाने उत्तर दिले.

“मी आज रिझाईन देणार आहे.” रश्मी.

“इतक्या लवकर?” ऋतुजा.

“आई म्हणतेय की लग्नाआधी काही दिवस आराम करून घे. नंतर आयुष्यभर कामच करायचं आहे. मलाही आईच म्हणणं पटलय. आज रेजिग्नेशन लेटर दिलं म्हणजे नोटीस पिरियड एक महिना करून मला सुट्टी घेता येईल.” रश्मी.

“ओके. जशी आपली इच्छा.” ऋतुजा.

ऋतुजा व रश्मी बोलत असतानाच निशा त्यांच्या जवळ आली.

“ऋतुजा मॅडम, मला तुमचा मोबाईल दोन मिनिटांसाठी मिळेल का?” निशाने विचारले.

“हो, पण कशासाठी?” ऋतुजा.

“माझा मोबाईल बिघडला आहे. माझ्या मित्राला फोन करून निरोप देते, नाहीतर तो फोन लागत नाही या काळजीने दिवसभर चिंतेत राहील.” निशा.

“त्याचा मोबाईल नंबर तुला पाठ आहे का?” ऋतुजा.

“हो.” निशा.

“नंबर पाठ आहे म्हटल्यावर तुमच्यातील मैत्री बरीच स्पेशल दिसतेय.” ऋतुजा.

“असेल कदाचित.” निशा.

निशाने मोबाईल नंबर सांगितला, ऋतुजाने नंबर मोबाईल मध्ये केला व त्यावर पंकजच नाव आलं. ऋतुजा निशाकडे बघून म्हणाली,

“हा नंबर तर माझ्या दिराचा आहे.”

“पंकज तुमचा दिर आहे.” निशा आश्चर्य चकित झाली होती.

“हो.” ऋतुजा.

“पण हे कसं शक्य आहे?” निशा.

“मी त्याची वहिनी असणं का शक्य नाही.” ऋतुजा.

“मग त्याने आजवर तुम्ही या कंपनीत जॉब करता हे मला सांगितलं का नसेल?” निशा.

“आता हे तू त्यांनाच विचार.” ऋतुजा.

“मी त्याला नंतर फोन करते.” निशा गोंधळलेली होती.

निशा निघून गेल्यावर रश्मी म्हणाली,

“हिला तर तुझ्या बद्दल खरच माहिती नव्हती, पण ही इतकी शॉक का झाली? तुझ्या दिराने हिला काही वेगळं तर सांगितलं नाहीये ना?”

“आज रात्री मी त्यांनाच विचारते.” ऋतुजा.

“हो, हेच बेटर राहील. हा जो काही मॅटर असेल तो इतक्या लवकर समक्ष येईल हे वाटलं नव्हतं.” रश्मी.

“तू जॉब सोडणार आहे, पण मला इथेच टिकून रहायचं आहे. मी आता माझ्या कामावर लक्ष केंद्रीत करते. तुझ्याशी नंतर गप्पा मारते.” ऋतुजा आपल्या कामाला लागली.