अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५२
मागील भागाचा सारांश: निशा व ऋतुजा मध्ये पंकज व निशा मधील रिलेशन बद्दल चर्चा झाली. विक्रमच सतत घरच्यांबद्दल तक्रार करणं रश्मीला वेगळंच वाटत होतं, त्यावर ऋतुजा व तिच्यात गप्पा झाल्या.
आता बघूया पुढे….
इंटेरिअर डेकोरेटरच्या ऑफिस जवळ अभिराज ऋतुजाच्या आधी पोहोचला होता. ऋतुजा पोहोचल्यावर घराच्या इंटेरिअर बद्दल इंटेरिअर डेकोरेटर व या दोघांमध्ये चर्चा झाली. त्यांच्या मध्ये बऱ्याच वेळ चर्चा सुरू होती.
जवळपास सगळं फायनल करूनच ऋतुजा व अभिराज ऑफिसच्या बाहेर पडले.
“ऋतू, आज मस्तपैकी बाहेर जेवण करून जाऊयात.” अभिराज म्हणाला.
“चालेल, मी आरती ताईंना तसं कळवते.” ऋतुजा.
“कशाला? काल कुठे तिने फोन करून कळवल होत.” अभिराज.
“मग त्यांच्यात व माझ्यात काहीच फरक उरणार नाही.” ऋतुजाने फोन करून आरतीला ते दोघेजण जेवायला घरी येणार नसल्याचे कळवले.
ऋतुजा अभिराजच्या गाडीवर बसली. एका फेमस हॉटेलमध्ये अभिराज ऋतुजाला घेऊन गेला.
“अभी, इथलं जेवण कॉस्टली आहे.” ऋतुजा गाडीवरून उतरल्यावर म्हणाली.
“असुदेत. आपण हैदराबादला गेलो असतो तर आपला खर्च झालाच असता ना, तर मग आता इथं थोडाफार खर्च केला तर काही बिघडत नाही.” अभिराज.
दोघेजण हॉटेल मध्ये गेले, तेथील अंबियन्सचे निरीक्षण ऋतुजा करत होती. एका टेबलच्या इथे जाऊन ते दोघेजण बसले. वेटरला पहिले त्यांनी ऑर्डर दिली.
“ऋतू, इंटेरिअरच काम माझ्यामते एक ते दीड महिन्यात पूर्ण होईल. मग लगेच आपण आपल्या फ्लॅटवर रहायला जाऊयात.” अभिराज.
“त्याआधी वास्तुशांती करावी लागेल.” ऋतुजा.
“हो, मी आई-बाबांशी बोलतो. पुजा मोठी करायची की छोटी करायची ते त्यांच्याशी डिस्कशन करून ठरवू.” अभिराज.
“हो, चालेल.” ऋतुजा.
जेवण करता करता दोघेजण गप्पा मारत होते.
“ऋतू, तुला आरती बद्दल काय वाटत?” अभिराज.
“मला प्रश्नच कळला नाहीये.” ऋतुजा.
“तिचं आणि त्या मुलाच काही सुरू असेल का?” अभिराज.
“माहीत नाही, पण ज्याअर्थी त्यांनी आपल्याला आधी उघडपणे सांगितलं नाही म्हटल्यावर काही असूही शकेल.” ऋतुजा.
“एकदा त्या मुलाची भेट घ्यावी लागेल. आरती पुन्हा चुकीच्या व्यक्तीत अडकायला नको.” अभिराज.
“हो, माझही हेच म्हणणं आहे.” ऋतुजा.
“तुला अजून एक विचारायचं होत. काल आरती जेव्हा बोलली की, आई पुण्याला येणार आहे, तर त्यावर तू काहीच प्रतिक्रिया दिली नाहीस.” अभिराज.
“आधी त्या येणार होत्या, मग कॅन्सल झालं. आता परत त्या येत आहेत, तर यावर मी रिऍक्ट होणं मला गरजेच नाही वाटलं. मी त्यांना या असंही म्हटले नाही आणि येऊ नका असंही म्हटले नाही. जो निर्णय होता, तो त्यांचा होता. सो यात मला काय वाटतं हा प्रश्नच उदभवत नाही.” ऋतुजा.
“मला वाटलं होतं की, तुला आईचा राग आला असेल.” अभिराज.
“मला राग आला तरी त्याने काही फरक पडणार आहे का?” ऋतुजा.
“आई आपल्याकडे आल्यावर तू तिच्याशी व्यवस्थित वागशील ना?” अभिराज.
“अर्थात. माझ्या आणि त्यांच्यात अबोला रहावा अस काहीच आमच्यात घडलेल नाहीये. आता हा टॉपिक पुरे. आपण या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेऊयात.” ऋतुजा.
—---------------------------------------------------
“तू इतरवेळी जेव्हा माझ्यासोबत असतेस तेव्हा फोन उचलत नाहीस, तो कोणाचाही असो, मग आज कसा काय फोन घेतलास?” राघवने आरतीला विचारले.
राघव व आरती आरतीच्या घराजवळील कॅफेत बसलेले होते.
“काल फोन उचलला नाही म्हणून घरी रामायण घडलं. आज तीच पुनरावृत्ती नको होती.” आरती.
“जास्त काही घडलं नाही ना?” राघव.
“दादाने तुला घरी भेटायला बोलावलं आहे.” आरती.
“तुमच्याकडे मुलगी व मुलगा मैत्री करू शकत नाहीत का?” राघव.
“मैत्री करायला प्रॉब्लेम नाहीये, पण मी घरी कोणालाच तुझ्या सोबत मैत्री बद्दल सांगितलं नव्हतं आणि दादाच अस म्हणणं आहे की, मी पुन्हा कोणत्याच चुकीच्या व्यक्ती मद्धे अडकायला नकोय.” आरती.
“मी तुला चुकीची व्यक्ती वाटतोय का?” राघव.
“राघव, तू जर मला चुकीचा वाटला असता तर अशी दररोज तुला भेटले असते का? आपण सोबत नसलो तरी सतत एकमेकांना मॅसेज करत असतो. रात्री दोन वाजता तुला माझी आठवण आली तर व्हिडीओ कॉल करतोस आणि मी पण नाही म्हणत नाही, हे तू चुकीचा वाटत असता तर केलं असत का?
दादाला माझ्याबाबत काळजी वाटणे स्वाभाविक आहे. शिवाय तो तुला भेटला नाहीये म्हणून तो अस बोलतोय. तुझी व त्याची भेट झाल्यावर त्याचे तुझ्या बद्दल असणारे विचार नक्कीच बदलतील.” आरती.
“मी घरी कधी येऊ?” राघव.
“पुढच्या आठवड्यात आई येणार आहे, ती येण्याआधीच ये. आई असेल तर ती अजून प्रश्न विचारत बसेल.” आरती.
“मग या विकेंडला येतो.” राघव.
“चालेल. मी दादाला विचारून तुला वेळ सांगते.” आरती.
“सगळं ठीक आहे, पण त्यांनी आपल्या नात्याबद्दल विचारलं तर काय सांगायचं?” राघव.
“ जे आहे ते सांगायचं.” आरती.
“म्हणजे माझ्या मनात तुझ्यासाठी ज्या भावना आहेत, त्या सांगू असच ना?” राघव.
“राघव, आपल्यात फक्त मैत्रीच आहे ना, मग तेच सांगायचं.” आरती.
“आरती, तुला सिरियसली वाटत. आपल्यात जे सुरू आहे ती फक्त मैत्री आहे म्हणून.” राघव.
“मला माहित नाही.” आरती.
“तू या प्रश्नापासून का लांब पळत आहेस? कधीना कधी या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागणार आहेच ना.” राघव.
“हो, पण उत्तर शोधण्याची लगेच घाई करण्याची आवश्यकता नाहीये. आपण दोघेही एकटे होतो. आपली भेट झाल्यावर एकमेकांसोबत बोलायला लागलो. आपले वाईब्स मॅच होतात म्हणून आपण एकमेकांना भेटत असतो.
मी तुझ्यासोबत असताना आयुष्यात सगळ काही परिपूर्ण वाटतं. तुझ्याशी बोलल्याशिवाय मला करमत नाही. हे सगळं खरं असलं, तरी आपल्याला एकमेकांना समजून घेण्यासाठी अजून वेळ द्यावा अशी माझी इच्छा आहे.
आपण दोघेही आधी एका टॉक्सिक रिलेशनशिप मध्ये होतो. तेव्हाही आपल्या पार्टनर सोबत अस काही होईल हे आपल्याला वाटल होत का? सो पुढे जाऊन पश्चाताप करण्यापेक्षा आताच थोडं थांबुयात. थोडा वेळ घेऊ आणि मगच आपल्या नात्याला नाव देऊ.” आरती.
“तू म्हणत आहेस तेही बरोबर आहे. तुला जेव्हा आपल्या नात्याला नाव देण्याची इच्छा होईल त्यावेळी तुच स्वतःहून मला सांगशील, तोपर्यंत मी हा विषय काढणार नाही.” राघव.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा