अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५३
मागील भागाचा सारांश: ऋतुजा व अभिराजने फ्लॅटचे इंटेरिअर फायनल केले. आरतीने राघवला घरी दादाने भेटायला बोलावल्याचे सांगितले. राघवने तिला आपल्या नात्याला काय नाव देऊयात यावर चर्चा केली, तर आरतीने त्याला सांगितले की, आपण थोडा वेळ घेऊयात.
आता बघूया पुढे….
घरी जायला ऋतुजा व अभिराजला उशीरच झाला होता. पंकज हॉलमध्ये बसलेला होता, तो उदास दिसत होता. निशा व त्याच्यात अजून काही सॉर्ट झाला नसल्याचा अंदाज ऋतुजाला आला होता, पण तिने सगळ्यांसमोर त्याच्याशी बोलणे टाळले.
“पंकज, तुमचं जेवण झालं ना?” अभिराज त्याच्या शेजारी बसत म्हणाला.
“हो. तुम्ही बाहेरूनच जेवण करून आलात ना.” पंकज.
“आज इंटेरिअर फायनल करायला गेलो होतो, तर तिकडेच उशीर झाला. भूक लागली होती, तर मग बाहेरच खाल्लं.” अभिराज.
“इंटेरिअरचे काम व्हायला किती दिवस लागतील?” पंकजने विचारले.
“माझ्यामते दीड महिना तरी लागेलच.” अभिराजने उत्तर दिले.
“इंटेरिअर पूर्ण झाल्यावर मग लगेच शिफ्ट होणार आहेस का?” पंकजचा पुढील प्रश्न.
“हो, असाही तिकडचा हप्ता सुरूच आहे, तर इकडेही भाडं कशाला भरायचं.” अभिराजचे उत्तर.
“दादा, मी तुमच्या सोबत तिकडे रहायला येणार नाही. तुमची प्रायव्हसी मला डिस्टर्ब करायची नाहीये. मी एखाद्या पीजी मध्ये राहील. आरतीचा निर्णय तिच्यावर आहे, पण मला तरी वाटतंय की, तुम्हाला दोघाना तुमचा संसार करू द्यावा.” पंकज.
“आम्ही दोघे आमचा संसार करतच आहोत. तुम्ही दोघे आमच्या सोबत राहिल्याने आमची प्रायव्हसी डिस्टर्ब होत नाही, रादर ती आम्ही होऊ देत नाही.
हे जे तुझ्या डोक्यात सुरू आहे, ते कोणी भरलं आहे? इतक्या दिवसात तुला ऋतू किंवा माझ्याकडून तुझी आम्हाला अडचण होत आहे असं काही आढळलं का? तसं असेल स्पष्टपणे सांग.” अभिराज.
“दादा, तुम्ही ते मला जाणवू दिलं नाही त्यात तुमचा मोठेपणा आहे.” पंकज.
ऋतुजा बेडरूममध्ये होती, पण तिने सगळं ऐकलं होतं. ती कपडे बदलून बाहेर आली.
“पंकज दादा, तुम्ही पीजी मध्ये रहायला पैसे द्याल ना तर तेवढेच मेस व रूम भाडं उद्यापासून मला देत जा. मला एक्सट्रा इन्कम सुरू राहील आणि तुम्हालाही आमची प्रायव्हसी डिस्टर्ब केल्यासारखं वाटणार नाही.”
“वहिनी, तुम्ही पण ना…” पंकज हसला.
“मी सिरियसली बोलतेय. दोन पैसे जास्त मिळत असतील तर ते कोणाला नकोय.” ऋतुजा.
“ऋतू, तू विषय कुठल्या कुठे नेत आहेस? पंकजचा परत गैरसमज होईल.” अभिराज.
“यात गैरसमज होण्यासारख काहीच नाहीये. ते सगळं बाजूला ठेवा. आपण एकाच फॅमिलीतील आहोत, तर तुम्हाला अस का वाटत आहे? किंवा अस तर काही नाही ना की, आम्ही दोघे असल्याने तुम्हाला तुमची प्रायव्हसी मिळत नाहीये. काल अभी जे बोलला ते तुमच्या मनाला लागलं आहे का?
तुम्हाला तुमची स्पेस हवी असेल आणि आमच्या सोबत राहताना ती मिळत नसेल तर बिनधास्त दुसरीकडे शिफ्ट व्हा, पण आमच्या प्रायव्हसी बद्दल बोलू नका.” ऋतुजा डायरेक्ट बोलली.
अभिराजला आत्ताशी ऋतुजाच्या बोलण्याचा रोख कळला.
“पंकज, ऋतू जे बोलत आहे त्याला मी सहमत आहे. तुझ्या मनात जे असेल ते खरं खर सांग. तुला बाहेर रहायचं असेल आम्ही दोघेही तुला अडवणार नाही, पण एक दुसरी जी बाजू आहे ती लक्षात घे.
बाहेर एकटा राहिलास, तर खर्च वाढेल. पुढील दोन ते तीन वर्षात तुझं लग्नाच बघावं लागेल, तेव्हा तुझ्याकडे तुझा फ्लॅट आहे का? हे मुलीकडचे विचारतील, तेव्हा जर तुला स्वतः फ्लॅट घेतलेला आहे, हे दाखवायचे असेल, तर आजपासून तुला सेव्हिंग करावी लागेल आणि एक वर्षाच्या आत फ्लॅट बुक करावा लागेल.
तुला घराच्या खर्चाला हातभार लावायचा असेल, तर महिन्याला दोन-तीन हजार देत जा. मी त्याला नाही म्हणणार नाही, पण बाहेर राहण्याच्या निर्णयाचा एकदा फेरविचार कर.” अभिराजने त्याला समजावून सांगितले.
“दादा, मी या सगळ्याचा सारासार विचारच केला नव्हता. बर झालं तू मला समजावून सांगितलं. माझ्या बोलण्याने तुम्ही दुखावले गेला आहात. आय एम रिअली सॉरी.” पंकज खाली मान घालून म्हणाला.
“तू सॉरी का बोलत आहेस?” आरतीने हॉलमध्ये येऊन विचारले.
“तू इथे हजर असतीस तर तुला आपोआप कळलं असत. आपण एकाच घरात राहतो, शिवाय घरही फार काही मोठं नाहीये, तरीही तुला आमच्या गप्पा ऐकून इथे यावं वाटलं नाही याचंच दुःख जास्त आहे.” अभिराज म्हणाला.
“दादा, ते मी हेडफोन घालून मुव्ही बघत होते. तुमच्या गप्पा सुरु आहेत हे मला कळलंच नाही. राघव या विकेंडला घरी आला तर चालेल का? तुला त्याची भेट घ्यायची होती ना?” आरतीने विषय बदलला.
“ऋतू, विकेंडला काही प्लॅन नाहीये ना?” अभिराजने ऋतुजा कडे बघितले.
“रश्मीचा होणारा नवरा पुण्यात येणार आहे, तर तिने शनिवारी आपल्याला डिनरला इन्व्हाईट केलं आहे.” ऋतुजाने सांगितले.
“ओके. शनिवारी सकाळी अकरा वाजता राघवला बोलावं.” अभिराजने सांगितले.
आरतीने होकारार्थीं मान हलवली.
“अभी, बराच उशीर झाला आहे. झोपायला हवं.” ऋतुजा घड्याळात बघून म्हणाली.
“हो, एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचंच राहून गेलं. उद्या संध्याकाळी ऋतुजाच्या गाडीची डिलिव्हरी मिळणार आहे, तर तुम्हाला दोघाना जमत असेल तर साडेपाच पर्यंत शोरूमला या.” अभिराज.
“दादा, मी येईल.” पंकज.
“मला लवकर कंपनीतून निघता आलं तर मी येईल. मी येणार असेल तर तसं कळवते.” आरती.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा