Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५४

Story After Marriage
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५४

मागील भागाचा सारांश: पंकजने अभिराजला सांगितले की, तो नवीन फ्लॅटवर त्यांच्या सोबत शिफ्ट होणार नाही, यावरून अभिराज, पंकज व ऋतुजा मध्ये चर्चा झाली. अभिराजने त्याला सगळ्या बाजू समजावून सांगितल्यावर पंकजने त्यांच्या बरोबर राहणे किती फायदेशीर आहे हे त्याला कळले. राघवला अभिराजने शनिवारी घरी भेटायला बोलावले.

आता बघूया पुढे….

सकाळी सगळेजण आपापलं नेहमीप्रमाणे आवरण्यात बिजी होते. पंकजच्या चेहऱ्यावरून तो अजूनही उदास असल्याचे ऋतुजाला आढळले. तिला पंकज सोबत निशाबद्दल बोलायचं होत, पण सगळ्यांसमोर घरात बोलणे तिला पटत नव्हते.

“पंकज दादा, आज मला कंपनीत सोडाल का? आज नेमकं मला लवकर जायचं आहे आणि माझा नेहमीचा कॅब वाला आज येणार नाहीये. अभीला मी सोडवायला सांगितलं असत, पण त्याला मला कंपनीतून सोडून त्याच्या कंपनीत जायला उलट पडेल.” ऋतुजाने त्याला स्पष्टीकरण दिले.

“वहिनी, इतक सगळं बोलण्यापेक्षा पंकज मला आज कंपनीत सोडव एवढं बोलल्या असत्या तरी चाललं असत. तुमचा माझ्यावर तेवढा हक्क आहे.” पंकज म्हणाला.

“तुम्ही तुमचं पटकन आवरून घ्या. मी पण आवरते.” ऋतुजा तिच्या रूममध्ये गेली.

“मी तुला सोडवलं असत ना, तू उगाच त्याला का म्हणालीस?” अभिराजने विचारले.

“मला त्यांच्याशी बोलायचं आहे. घरात बोलता येणार नाही.” ऋतुजा हळू आवाजात म्हणाली.

पुढील काही वेळात आवरून ऋतुजा व पंकज घराबाहेर पडले. थोडं पुढे गेल्यावर ऋतुजा म्हणाली,

“पंकज दादा, इथे पुढे जे नाश्ता सेंटर आहे, तिथे गाडी थांबवाल. घरातून निघताना नाश्ता करायचं राहून गेलं.”

पंकजने काही न बोलता गाडी नाश्ता सेंटर जवळ थांबवली.

ऑर्डर देण्याआधी ऋतुजाने पंकजला विचारले, तर तो बोलला,

“तुम्हाला उशीर होईल, मी तुम्हाला सोडवल्यावर नाश्ता करेल.”

“मला काही उशीर होत नाहीये. मला तुमच्याशी बोलायचं होत म्हणून आज लवकर तुम्हाला घेऊन आले.” ऋतुजा अस बोलल्यावर मग पंकजने ऑर्डर दिली.

“तुम्ही इतके उदास का आहात?” ऋतुजाने विचारले.

“मी उदास नाहीये. तुम्ही उगीच काहीतरी बोलत आहात.” पंकजने उत्तर दिले.

“बरं, निशा व तुमच्यात काय झालंय, हे डिटेलमध्ये सांगा. कारण तुमच्या उदासीच कारण निशा आहे हे मला माहित आहे. आता भाव न खाता बोलायला सुरुवात करा. हा विषय घरात सगळ्यांसमोर बोलणे मला योग्य वाटलं नाही. तुम्ही मला सगळं सांगितल्यावर मी तुमची मदतच करणार आहे.” ऋतुजा.

“तुम्ही तिच्या कंपनीत जॉब करत असल्याचं मी तिला सांगितलं नाही यावरून तिला खूप राग आला आहे. त्याबद्दल मी तिला सॉरी बोललो, पण ती काही ऐकायला तयारच नाहीये. सतत एकच टॉपिक लावून धरला आहे.

वहिनी, मैत्रीत आपण एकमेकांना समजून घेतो. एकमेकांच्या चुका पोटात घालतो ना, मग हे अस वागणं कितपत योग्य आहे?” पंकज.

“काही मुलींना अस खोटं बोललेलं किंवा लपवलेलं आवडत नाही. समोरचा व्यक्ती आपल्या सोबत सगळ्याच बाबतीत प्रामाणिक असावा असं त्यांना वाटत असत.” ऋतुजा.

“वहिनी, पण मी खरच तिच्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली होती का? तुम्हाला काय वाटत?” पंकज.

“तिच्यासाठी जरी ती मोठी गोष्ट असेल, तरीही तिने एवढं ताणून धरायला नको. नात कोणतंही असो ते ताणल की तुटतच.” ऋतुजा.

“मी तिला हेच बोललो पण तिला तिच म्हणणं सोडायचंच नाहीये.” पंकज.

“अस असेल तर काही दिवस तिच्याशी बोलू नका.” ऋतुजा.

“वहिनी, ती अशी आहे की, मी जर तिच्याशी बोलणं सोडलं तर ती पण स्वतःहून बोलायला येणार नाही.” पंकज.

“पंकज दादा, नात्याची गरज दोघाना असली पाहिजे. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने तिला समजावल आहे ना, मग तिला थोडा वेळ द्या. काही दिवस तिच्याशी संपर्क करू नका. तिलाही तुमचं महत्त्व कळू द्या.” ऋतुजा.

“वहिनी, ती नेमकी कशी आहे हेच मला कळलं नाहीये असंही म्हणायला काहीच हरकत नाहीये. आता ती जिथे राहते आहे ती जागा मी तिला शोधून दिली होती. मी शोधलेल्या जागेत तिला रहायचं नाहीये, म्हणून ती दुसरीकडे जागा शोधते आहे. बर हे तिने मला सांगितलं असत तरी मला काही वाटलं नसतं, पण हे मला तिच्या घरमालकाकडून कळलं.” पंकज.

“थोडक्यात काय तर तिला तुमच्यापासून दूर जायचं आहे.” ऋतुजा.

“मलाही तेच वाटत आहे.” पंकज.

“आता मला एका प्रश्नाचं खर उत्तर द्या. तुम्हाला ती आवडत होती का?” ऋतुजा.

“हो, मी तिच्यात अडकायला लागलो होतो.” पंकज.

“मग तुम्ही वेळेतच तिच्यातून बाहेर पडायला हवी. ती तुमच्या सारख्या एका सुस्वभावी मुलाला डीझर्व्ह करतच नाही. समजा, यदा कदाचित तुमचं नात पुढं जरी गेलं तरी त्यात नेहमी ती रुसून बसेल आणि तुम्हाला तिची समज काढावी लागेल.

तुम्हाला ती समजून घेईल अस वाटत नाही. माझं आणि तिचं जेवढं बोलणं झालं त्यावरून ती मला प्रॅक्टिकल जास्त आणि इमोशनल कमी भासली.” ऋतुजा.

“वहिनी, हे सगळं माझा मेंदू स्वीकारतो आहे, पण ये दिल समझता नही.” पंकज.

“पंकज दादा, तुम्हाला तुमच्या आयुष्यात बरच पुढे जायचं आहे. एका चुकीच्या नात्यात अडकून स्वतःच नुकसान करू नका. प्रेम, लग्न हे सगळं होत राहील, पण हा उमेदीचा काळ पुन्हा येणार नाही. आता कमावण्याचे दिवस आहेत कमवून घ्या. लव्ह मॅरेज एखादी चुकीची व्यक्ती आयुष्यात येण्यापेक्षा अरेंज मॅरेज करुन एखादी योग्य मुलगी आयुष्यात येउदेत.

तुमच्याकडे पैसे नसतील, तर तुमच प्रेम जास्त काळ टिकत नाही, कारण आयुष्य जगायला पैसे लागतात. माझ्या व तुमच्या दादामध्ये प्रेम आहेच ना, शिवाय आम्ही दोघेही आर्थिक बाजूने सक्षम आहोत आणि त्याचमुळे आमच्यातील प्रेम टिकून आहे.” ऋतुजा.

“वहिनी, तुम्ही खूप छान समजावून सांगितले. आता निशा सोबत स्वतःहून बोलून मी माझा स्वाभिमान दुखावून घेणार नाही. समजा, ती स्वतःहुन काही बोलायला आली तरी तिच्याशी अंतर ठेवून वागण्यास सुरुवात करेल. तिच्यात अडकणार तर नाहीच. काही नात आमच्यात असलं तरी ते फक्त सो कॉल्ड मैत्रीच असेल.

वहिनी, इथून पुढे मला काहीही प्रॉब्लेम वाटला तर मी तुमच्याशी बोलत जाईल. तुम्ही सरळ, सोप्या भाषेत अस समजावून सांगतात आणि ते मला लगेच पटलं सुद्धा.” पंकज स्माईल देऊन म्हणाला.

“चला आता निघायला हवं, नाहीतर उशीर होईल.”

ऋतुजाला पंकजने तिच्या कंपनीत सोडवले. गेटच्या इथे निशा व पंकजची नजरानजर झाली. पंकज तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून गेला.