Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५५

Story After Marriage
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५५

मागील भागाचा सारांश: ऋतुजाला पंकज सोबत बोलायचे असल्याने ती त्याला कंपनीत लवकर जाण्याच्या बहाण्याने घेऊन गेली. निशाबद्दल पंकज व ऋतुजा मध्ये बोलणं झालं. ऋतुजाने पंकजला दोन गोष्टी समजावून सांगितल्या.

आता बघूया पुढे….

दुपारी जेवण करताना निशा रश्मी व ऋतुजा सोबत बसली होती.

“तुला इकडे रूम मिळाली का?” ऋतुजाने विचारले.

“हो, कालच फायनल झाली. उद्या सुट्टी आहे तर लगेच सामान आणून शिफ्ट होणार आहे.” निशाने उत्तर दिले.

“तू अशी अचानक इकडे शिफ्ट का होत आहेस?” रश्मीला प्रश्न पडला होता.

“येण्या जाण्यास लांब पडत होते.” निशा.

“ओह!” रश्मी.

“आज तुम्हाला सोडायला पंकज आला होता ना.” निशाने ऋतुजा कडे बघून विचारले.

“हो.” ऋतुजा.

“त्याने माझ्याकडे बघून न बघितल्यासारखे केले.” निशा.

“आता तुमच्या दोघांमध्ये नेमकं काय सुरु आहे हे मला माहित नाहीये. त्यांनीही काही सांगितलं नाही आणि तू त्यांच्यावर माझ्याबद्दल सांगितल नाहीस म्हणून नाराज आहेस एवढंच मला माहित आहे. तसही हा तुमच्या दोघांचा पर्सनल मॅटर आहे, यात मी न पडलेलंच बर.” ऋतुजा अस बोलल्याने निशा पुढे काही बोललीच नाही.

संध्याकाळी कंपनीतून निघून ऋतुजा शोरूमला गेली. अभिराज व पंकज आधीच शोरूमला पोहोचलेले होते.

“आरती ताई येणार आहेत का?” ऋतुजाने विचारले.

“नाही, तिला जमणार नाहीये. तिचा फोन आला होता.” अभिराजने सांगितले.

शोरूम मध्ये जाऊन कागदपत्रांची पूर्तता करून गाडी ताब्यात घेण्यात आली. गाडीसोबत ऋतुजा व अभिराजने फोटोसेशन केले. शोरूम मधून तिघेजण बाहेर पडले.

“आता घरी गाडी कोण घेऊन जाईल?” ऋतुजाला प्रश्न पडला होता.

“मी व तू जाऊयात. मी माझी गाडी ऑफिसला पार्क करून आलोय. पंकज कडे त्याची गाडी आहे.” अभिराज.

“हो, तसही मला एका मित्राकडे काम आहे. मी ते करून घरी येतो. तुम्ही घरी जाताना एखाद्या मंदिरात जा.” पंकज.

“आपण त्याआधी काहीतरी खाऊन आजचा दिवस सेलिब्रेट करूयात. इथे कुठे कॅफे आहे की काय ते सर्च कर.” अभिराज.

“हो, मला एक चांगलं कॅफे माहीत आहे.” पंकज.

पंकजने सांगितलेल्या कॅफेच्या दिशेने तिघेजण गेले. कॅफेत जाऊन तिघांनी ऑर्डर दिली.

“पंकज, आरतीचा हा जो कोणी राघव आहे, त्याच्या बद्दल तुला काय वाटत?” अभिराजने विचारले.

“हे बघ दादा, एकतर आपण दोघेही त्याला भेटलो नाहीयेत, पण ज्या अर्थी तो आपल्याला भेटायला घरी येण्यास तयार झाला त्या अर्थी तो जेन्यून वाटत आहे.

आरती ताई म्हणजे तिला डोक्याचा भाग कमी आहे असं मला वाटत आणि ती राघव मध्ये नक्कीच अडकलेली आहे. शिवाय मागे तिला मानसिक त्रास जो होत होता, तो याच्या संगतीत राहूनच बरा झालेला दिसत आहे.” पंकजने सांगितले.

“हो, म्हणूनच मला त्याला भेटायचं आहे. भेट झाल्यावर तो कसा आहे हे आपल्याला कळेल.” अभिराज.

“आताही ती त्याच्याच सोबत असेल याची मला खात्री आहे.” पंकज.

“तुला एवढी खात्री कशी काय?” अभिराज.

पंकजने आपल्या मोबाईल मधील एक फोटो त्याला दाखवला. आता पाच मिनिटापूर्वी माझ्या एका मित्राने त्या दोघांचा फोटो दाखवला. ती जर फॅमिलीपेक्षा त्याला जास्त महत्व देत असेल तर याला काय म्हणायचं? मला तर तिचा खूप राग येत आहे.” पंकज.

“दोघेही शांत व्हा. तुम्ही त्यांना आज काहीच बोलू नका. उद्या राघवला भेटा आणि मगच बोला. उगाच परिस्थिती अवघड करू नका.” ऋतुजा.

“ऋतू, पण तिने आज इकडे यायला हवं होतं. राघवला इतकं महत्व ती का देत असेल? मला तीच हे वागणच पटत नाहीये.” अभिराज चिडला होता.

“दादा, मला वहिनींच पटलं आहे. आरती ताईचा मेंदू गुडघ्यात आहे, आपण आजच्या दिवस तिच्याकडे दुर्लक्ष करूयात.” पंकज.

खाऊन झाल्यावर तिघेजण कॅफेतून बाहेर पडले. अभिराज व ऋतुजा गाडी घेऊन गणपती मंदिरात गेले. तिथे पाया पडून ते घरी गेले. ते घरी पोहोचण्याआधी आरती घरी पोहोचलेली होती. ऋतुजाने आरतीच ताट केलं. अभिराज खालीच उभा होता.

“आरती ताई, मी गाडी ओवाळायला खाली चालले आहे.” ऋतुजाला वाटले होते की आरती तिच्या पाठोपाठ खाली जाईल, पण आरती खाली गेलीच नाही.

ऋतुजाने गाडी ओवाळली. अभिराज व ऋतुजा घरी परत आले. आरतीला घरात बघून अभिराजला राग आला होता, पण ऋतुजाने त्याला नजरेने शांत रहा असे सांगितले.

“वहिनी, तुम्ही पुजा करून आल्यात पण, मी येणारच होते.” आरती.

“आरती ताई, नॉर्मल गाडीला ओवाळायच होत. एखादी मोठी साग्रसंगीत पूजा करायची नव्हती.” ऋतुजा मिश्किल हसून म्हणाली.

“तुला ऑफिस मधून लवकर निघायला जमलं नाही का?” अभिराजने विचारले.

“हो ना. आज नेमकं काम जास्त होत. मी परमिशन मागायला गेले होते, पण नाही मिळाली.” आरतीने उत्तर दिले.

“मी आता फक्त खिचडीभात करतेय. बाहेरून थोडं खाऊन आल्याने फार भूक नाहीये.” ऋतुजा किचनमध्ये निघून गेली.

आरती हॉल मध्ये मोबाईल वर टाईमपास करत बसलेली होती.

“आरती, हल्ली तुझा मोबाईलचा वापर खूपच वाढला आहे. आता आई येणारच आहे तर तुझी तक्रार तिच्याकडेच करतो.” अभिराज.

“दादा, आईला घाबरायला मी काही लहान राहिली नाहीये.” आरती.

“तेच तर ना, तू लहान राहिली नाहीयेस, पण तुला शिंग फुटले आहेत त्यांची वेळीच छाटणी करावी लागेल.” अभिराज.

“मला समजलं नाही.” आरती.

“आपण या विषयावर उद्या राघवची भेट झाल्यावर बोलूयात.” अभिराज त्याच्या रूममध्ये निघून गेला.