Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५६

Story After Marriage
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५६

मागील भागाचा सारांश: ऋतुजाची गाडी घेण्यासाठी अभिराज, पंकज व ऋतुजा गेले होते. आरती गेली नव्हती. पंकजला त्याच्या एका मित्राकडून कळले की, आरती त्यावेळी राघव सोबत होती. याचा पंकज व अभिराजला खूप राग आला होता.

आता बघूया पुढे….

ठरलेल्या वेळेप्रमाणे राघव अभिराजच्या घरी आला होता. आरतीने राघव व सगळ्यांची एकमेकांसोबत ओळख करून दिली. ऋतुजाने त्याला पाणी व चहा दिले. त्याच्या साठी ऋतुजाने इडली सांबर बनवले होते.

अभिराज व पंकज राघवशी बोलून त्याची सगळी माहिती घेत होते. गप्पा मारता मारता इडली सांबर खाऊन झाले होते.

“राघव, तुमच्याशी भेट झाल्यापासून आमची बहीण आमच्याशी खोटं बोलायला लागली आहे.” अभिराज म्हणाला.

“सॉरी मला तुमच्या बोलण्याचा रोख कळला नाही. मी तिला तुमच्याशी तिला खोटं बोलायला लावतो, अस तर तुमचं म्हणणं नाहीये ना?” राघव.

“आता कालचच उदाहरण घ्या. आम्ही सगळेजण गाडी घेण्यासाठी शोरूमला गेलो होतो. आरतीलाही बोलावले होते, पण तिने ऑफिसच कारण सांगितलं आणि त्याचवेळी ती तुमच्या सोबत होती.” अभिराजने आरतीकडे बघितले.

“हो, काल तिने हाफडे घेतला होता. आम्ही दोघे मुव्ही बघायला गेलो होतो, त्यामुळे संध्याकाळी आम्ही दोघे सोबतच होतो, पण तिने मला गाडी घ्यायला जायचं आहे असं काही सांगितलं नाही, तसं ती बोलली असती तर मी कालचा प्लॅन कॅन्सल केला असता.” राघवने त्याची बाजू क्लिअर केली.

“आरती, तू अस का केलंस? आमच्याशी खोटं का बोललीस?” अभिराजने विचारले.

“मला तुमच्या सोबत यायचं नव्हतं. खर कारण सांगितलं असत तर तुम्ही मला त्यावरून ऐकवलं असत. मला माझ्या आयुष्यातील काही क्षण आनंदाने जगायचे आहेत, ते तुमच्या मुळे स्पॉईल करण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये.” आरतीच बोलणं ऐकून अभिराजला खूप राग आला होता.

“आरती, तू डोक्यावर पडली आहेस का? तू काय बोलते हे तरी तुला कळतय का?” अभिराज चिडला होता.

“अभी, शांतपणे बोल.” ऋतुजाने त्याला शांत केलं.

“आरती, तू हे सगळं करून काय सिद्ध करू इच्छिते आहे. आपण दररोज भेटत असतोच ना, मग एखादा दिवस तू तुझ्या फॅमिलीला दिला तर काही बिघडत नाही. तुला हे अस वागून काय मिळणार आहे. तुला जर अस वागायचं असेल आणि तू माझ्यामुळे तुझ्या फॅमिली पासून दुरावणार असशील, तर मी आत्ताच्या आता आपल्यात जे काही आहे लगेच संपवतो.

मी ज्या आरतीला ओळखतो, ती ही आरती नाहीये. तुला पुन्हा मानसिक त्रास व्हायला लागला आहे का? गाडी ऋतुजा वहिनींसाठी घेतली, तुझ्यासाठी घेतली नाही हे तुला पटलेलं नाहीये का?” राघवलाही आरतीचा रागच आला होता.

“आरती, राघव काय बोलताय याची उत्तरे दे. तुझ्या मनात नेमकं काय आहे ते सगळयांना कळू तरी दे.” अभिराज शक्य तेवढ्या खालच्या स्वरात बोलला.

“राघव जे म्हणतो ते खरं आहे. मी पुन्हा ऋतुजा सोबत माझं आयुष्य कंपेअर करायला लागले आहे. हे सगळं मी माझ्या नकळत करते आहे.” आरती खाली मान घालून म्हणाली.

अभिराजने डोळे मिटून आलेला राग गिळला, तो राघवकडे बघून म्हणाला,
“आता तुम्ही मला सांगा. तुमच्या दोघांमध्ये जे आहे ती फक्त मैत्री आहे की अजून काही?”

“माझ्याकडून आम्ही त्यापुढे गेलो आहोत. मी अनेकदा यावर आरती सोबत बोललोही आहे, पण तीच म्हणणं आहे की आपण एकमेकांना वेळ देऊयात. लगेच नात्यावर शिक्कामोर्तब करायला नको.” राघवने सांगितले.

“आता ती जे काही बोलली ही तिच्या स्वभावाची दुसरी बाजू आहे, ती माहीत असून सुद्धा तुम्ही तिच्याशी लग्न कराल का?” अभिराज.

“हो. मी तिला सगळ्या बाजूने स्विकारायला तयार आहे. मी एक सल्ला देईल की, तिला काही दिवस सुरतला रहायला पाठवा. तिकडे रहायला गेल्यावर तिला इकडच्या आयुष्याची किंमत कळेल. अस प्रत्येक वेळी ऋतुजा वहिनींसोबत तुलना करणे चुकीचे आहे.

वहिनी तिला घरात सहन करून घेत आहेत तेच खूप आहे. तिचा परिणाम तुमच्या संसारावर व्हायला नको.” राघवने सुचवले.

“राघव, मी सुरतला गेल्यावर आपल्याला दोघाना दररोज भेटता येणार नाही. आपल्या बोलण्यावर सुद्धा मर्यादा येईल.” आरती.

“ते एकवेळ मला चालेल, पण तुझा हा स्वभाव मला मान्य नाहीये. तसही एका प्रोजेक्ट साठी कंपनी मला सहा महिन्यांसाठी कॅनडाला पाठवणार आहे. तेवढ्या दिवस तू सुरतला राहिलीस की तुझ डोकं जागेवर येईल.” राघव.

“तू हे मला आधी सांगितलं का नाही?” आरती.

“आता सांगतोय ना.मला सकाळीच कळलं.” राघव.

“बर ते ठीक आहे, पण तुमच्यातील नात्यावर त्या नंतर शिक्कामोर्तब करायचा का?” अभिराजने विचारले.

“हो, आरतीला वेळ हवा आहे, तर सहा महिन्यात तिचाही विचार होऊन जाईल.” राघव.

“ओके चालेल, मग सहा महिन्याने आपण पुन्हा भेटुयात.” अभिराज.

चालेल, मी निघतो आता. आरती, आपण परवा भेटून बोलूयात.” राघव सगळ्यांचा निरोप घेऊन घराबाहेर पडला.

राघव निघून गेल्यावर आरती म्हणाली,

“दादा, तू खरंच मला सुरतला पाठवणार आहेस का?”

“हो, आता पाणी माझ्या डोक्यावरून चाललं आहे. तू ऋतूसोबत तुलना करून सगळ्यांनाच दुःखी करत आहेस आणि ते मला पटत नाहीये. तुझी जबाबदारी घेणं मला चुकीच वाटत आहे. आता आई आल्यावर तिच्यासोबत तू सुरतला जा. राघव चांगला मुलगा आहे. तुला त्याच्यासोबत लग्न करायचं असेल तर मी अडवणार नाही.” अभिराज त्याच्या रूममध्ये निघून गेला, त्याच्या पाठोपाठ ऋतुजाही गेली.

“पंकज, तू तरी दादाला समजावून सांग. मला सुरतला जायचं नाहीये.” आरती.

“तू स्वतः तुझ्या पायावर धोंडा मारून घेतला आहे. तू काल जे वागली ते चुकीचं होतच, पण आज जे काही बोललीस ते त्याहून चुकीच होत. मी तुझी आता काहीच मदत करू शकत नाहीये.” पंकज म्हणाला.