अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५७
मागील भागाचा सारांश: राघव सगळ्यांना भेटण्यासाठी घरी आला होता, त्यावेळी आरतीच्या मनातील सत्य बाहेर पडल. ती ऋतुजा सोबत आपलं आयुष्य कंपेअर करायला लागली होती. ऋतुजाने आता काही महिन्यांसाठी सुरतला जाऊन रहावे असे राघवने तिला सुचवले.
आता बघूया पुढे…..
अभिराज रूममध्ये येरझाऱ्या मारत होता. तो रेस्टलेस झाला होता.
“अभी, रिलॅक्स. तू सगळ्याच एवढं टेन्शन घेऊ नकोस.” ऋतुजा अभिराजला शांत करत होती.
“ऋतू, आरती कडून मला अश्या वर्तणुकीची अपेक्षा नव्हती. तिला सगळं देण्याचा प्रयत्न केला. आज तिने ते सगळं शून्य करून टाकलं आहे.” अभिराज व ऋतुजा बोलत असतानाच त्यांना पंकजचा जोरात ओरडण्याचा आवाज आला.
अभिराज व ऋतुजा घाईने बाहेर गेले, तर आरतीच्या एका हातातून रक्त येत होते.
“दादा, मी वॉशरूमला गेलो होतो, तेव्हा ही इथे शांतपणे बसलेली होती. मी तिकडून आलो तर….”पंकजच्या डोळ्यात पाणी आले होते.
ऋतुजाने तिच्या हाताला रुमाल बांधला.
“अभी, आपल्याला त्यांना लवकर हॉस्पिटलला घेऊन जावे लागेल. रक्त जास्त जायला नको.” ऋतुजा बोलल्यावर अभिराजने पटकन ऍम्ब्युलन्सला कॉल केला.
आरतीला खाली घेऊन जाईपर्यंत ऍम्ब्युलन्स येऊन उभी होती. ऋतुजा व अभिराज ऍम्ब्युलन्स मध्ये बसले. पंकज मागून गाडी घेऊन येणार होता. आरती बेशुद्ध झालेली होती. तिच्या हातातून अजूनही रक्त येत होते. अभिराजला खूप टेन्शन आले होते. ऋतुजा त्याला धीर देत होती.
हॉस्पिटलमध्ये गेल्यावर आरतीला आय सी यू मध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. काही वेळाने डॉक्टरानी ती आउट ऑफ डेंजर असल्याचे सांगितले. अभिराज, ऋतुजा व पंकजच्या जीवात जीव आला होता. आरती बेशुद्ध असल्याने तिला आय सी यूतच ठेवण्यात आले होते.
“दादा, आई-बाबाना बोलावून घ्यायला हवं. आता आपण आरती ताईची जबाबदारी घेणे चुकीचे ठरेल, ती कधी काय करून बसेल याचा नेम नाही.” पंकज म्हणाला.
“हो. तू बाबाना फोन करून लगेच निघायला सांग.” अभिराज.
पंकज फोन करण्यासाठी बाजूला निघून गेला.
“ऋतू, मी आरतीला जास्त बोललो का?” अभिराज.
“नाही. तू त्यांच्याशी अतिशय शांततेत बोलला, पण त्यांनी असा काही निर्णय घ्यावा हेच मला पटत नाहीये. बोलून गोष्टी सॉर्ट झाल्या असत्या ना.” ऋतुजा.
डॉक्टरानी अभिराजला बोलावल्याने दोघांचं बोलणं अर्धवट राहील. तेवढ्यात ऋतुजाला रश्मीचा फोन आला. ऋतुजाने तिला संध्याकाळी डिनरला येता येणार नाही असे सांगितले.
“अभी दादा कुठे गेला?” पंकजने ऋतुजाला विचारले.
“डॉक्टरांनी बोलावलं होतं.” ऋतुजाने उत्तर दिले.
“आई-बाबा व अजय दादा पुढील अर्ध्या तासात निघणार आहेत.” पंकज म्हणाला.
“त्यांना टेन्शन येईल असं जास्त सांगितलं नाही ना?” ऋतुजा.
“नाही, फक्त लवकरात लवकर या एवढंच बोललो.” पंकज.
अभिराज तिथे आला.
“डॉक्टर काय म्हणत आहेत?” पंकज.
“आरतीला शुद्ध आली आहे. तिला संध्याकाळी आपण घरी घेऊन जाऊ शकतो अस डॉक्टरांनी सांगितलं. तिने जो हाताला कट मारला होता तो वरचेवर होता, सो काळजी करण्याचं कारण नाही.” अभिराज.
“मी आरती ताईला भेटून येतो.” पंकज आरतीला भेटायला गेला.
आरती छताकडे टक लावून बघत होती.
“आरती ताई,बर वाटतय का?” पंकज तिच्याजवळ जाऊन बसला.
“हो, हात थोडा दुखतो आहे.” आरती.
“हे सगळं करण्याची गरज होती का?” पंकज.
“पंकज, या विषयावर आपण नंतर बोलूयात का?” आरती.
“हो, चालेल. तसही तुला कितीही बोललं, समजावून सांगितलं तरी तुला त्याने काही फरक पडत नाही. संध्याकाळी आपण घरी जाऊ शकतो.” पंकज.
“पंकज, तू एकटा इथे थांबशील का?” अभिराज वॉर्डमध्ये आला होता.
“हो, तुम्ही दोघे घरी जा.” पंकज.
“मी संध्याकाळी पुन्हा येतो,मग हिला घेऊन घरी जाऊयात.” अभिराज.
ऋतुजा वॉर्डमध्ये आली, पण तिने आरतीकडे बघितले सुद्धा नाही. अभिराज व ऋतुजा दोघेही आरतीकडे न बघता पंकजला सांगून निघून गेले.
“दादाला माझा खूप राग आलेला दिसतोय. माझ्याकडे त्याने साधं बघितलं सुद्धा नाही की विचारपूस केली नाही.” आरती.
“आरती ताई, तू कामच इतकं महान केलं आहेस ना की तुझी सगळयांनी पंचारती करावी अशी तुझी इच्छा आहे. इथे यावेळी मला प्लिज जास्त बोलायला लावू नकोस. तू आराम कर आणि मला शांत बसुदेत.” पंकज.
“राघवला कळवल का?” आरती.
“मी कळवणार होतो, पण दादाच म्हणणं आलं की आरतीची इमेज त्याच्या समोर वेगळीच उभी राहील. त्याच्या मनातून तू उतरून जाऊ नये म्हणून त्याला कळवलं नाही.” पंकज.
“ते एक बर केलंस.” आरती.
अभिराज व ऋतुजा घरी पोहोचले होते. ऋतुजा घरातील पसारा आवरत होती, तर अभिराज डोळे मिटून शांतपणे विचार करत बसलेला होता. ऋतुजाने त्याला डिस्टर्ब केले नाही.
संध्याकाळी अभिराज हॉस्पिटलला गेला. हॉस्पिटलचे बिल भरून डॉक्युमेंटसची पूर्तता करून पंकज व अभिराज आरतीला घरी घेऊन आले. घरी आल्यावर आरती रूममध्ये जाण्याआधी हॉलमध्ये बसली होती. पंकज व अभिराज सुद्धा तिथेच बसले होते.
ऋतुजाने सगळ्यांना चहा दिला. सोबत बिस्कीटही दिलेत.
“दादा, आय एम सॉरी.” आरती खाली मान घालून म्हणाली.
अभिराज यावर काहीच बोलला नाही. आरतीचे डोळे भरून आले होते.
“आरती ताई, चहा बिस्कीट खा आणि रूममध्ये जाऊन आराम करा. आई-बाबा येणार आहेत, तेव्हाच मग या विषयावर सगळेजण बोला. आता अभी चिडलाही आहे आणि दुखावलाही गेला आहे. सध्या घरात जे शांततापूर्ण वातावरण आहे ते तसच राहुदेत.” ऋतुजाने सांगितले.
चहा बिस्कीट खाऊन झाल्यावर आरती काही न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली.
“ऋतू, आपल्याला डिनरला जायला जमणार नसल्याचे तू रश्मीला कळवले का?” अभिराजने विचारले.
“हो, आपण हॉस्पिटलमध्ये असताना तिचा फोन आला होता, तेव्हाच तिला मी सांगितलं आहे.” ऋतुजा.
“पंकज, आई-बाबा केव्हा पर्यंत पोहोचतील. त्यांच्या जेवणाच काय करायचं?” अभिराज.
“त्यांना पोहोचायला उशीरच होईल. अजय दादा बोललाय की वाटेत थांबून जेवण करून येतील.” पंकज.
“ओके. माझं डोकं दुखत आहे. मी जरा जाऊन पडतो.” अभिराज रूममध्ये निघून गेला.
“वहिनी, दादा जरा जास्तच दुखावला गेला आहे. दुपारपासून शांतच आहे.” पंकज.
“हो, तो माझ्याशी पण बोलला नाहीये. त्याला त्याचा वेळ देऊयात.” ऋतुजा.
क्रमशः
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा