Login

अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५८(अंतिम)

Story After Marriage
अरेंज कम लव्ह मॅरेज पर्व २ भाग ५८ (अंतिम)

मागील भागाचा सारांश: आरतीने हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. कट वरच्यावर असल्याने आरतीला फार काही झालं नव्हतं. संध्याकाळी लगेच तिला डिस्चार्ज देण्यात आला होता. अभिराजने आई-बाबांना सुरतहून पुण्याला बोलावलं होतं.

आता बघूया पुढे….

ऋतुजाने पंकज, अभिराज व आरतीला आग्रह करून जेवण करण्यास भाग पाडले. आरती मान वर करून बघायलाही तयार नव्हती. रात्री अकरा वाजत अजय व आई-बाबा घरी आले होते.

आरतीच्या हातावरील पट्टीकडे बघून आईच्या डोळ्यात पाणी आले होते.

“आई, बाबा, आता बराच उशीर झाला आहे. तुम्ही प्रवासाने दमला असाल. आता तुम्ही झोपा. आपण उद्या सकाळी बोलू.” अभिराज म्हणाला.

“अभी, कितीही थकवा आला तरी आज झोप लागेल का? आपल्या तरुण मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला हा विचार करूनच कसतरी होत आहे. अशा याच्यात झोप कशी येईल?” बाबा म्हणाले.

“दादा, जे बोलायचं ना ते आताच बोलूयात.” अजय.

“ठीक आहे. ऋतू, सगळ्यांसाठी चहा कर. चहा पिल्याने सगळ्यांनाच थोडी तरतरी येईल.” अभिराज म्हणाला.

ऋतुजा सगळ्यांसाठी चहा बनवून घेऊन आली. हॉलमध्ये सगळेजण बसलेले होते. अभिराजने बोलायला सुरुवात केली,

“माझं पूर्ण बोलणं होईपर्यंत कोणीच मध्ये बोलू नका. माझ्या मनात इतकं काही साचलं आहे की, माझा जीव घुसमटायला लागला आहे. माझं लग्न होण्याआधीच आरतीच्या बाबतीत जे वाईट घडायच होत ते घडून गेलं.

आरती त्यातून सावरावी म्हणून ऋतुजाने तिची मदत केली. आरतीने सुरतला न राहता पुण्यात राहून नोकरी करावी असे तिनेच सुचवले ज्याचा फायदा आरतीलाच होणार होता.

लग्न झाल्यावर एकाएकी आरतीच वागणं बदललं. ज्या ऋतुजाने तिची मदत केली होती, त्याच ऋतुजा सोबत ती तुलना करायला लागली होती. बर त्यावेळी तिची मानसिक स्थिती बरोबर नाही हे समजून मी व ऋतुजाने तिला माफ केल.

आरतीची मनस्थिती चांगली व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केले. तरीही ती अजूनही ऋतुजा सोबत स्वतःची तुलना करत आहे. आता मी सगळ्याच गोष्टी दोघींना घेऊन देऊ शकत नाही. किरकोळ वस्तू असेल तर मी तेवढं ऍडजस्ट करू शकतो, पण गाडी एकच घेऊ शकतो. दुसऱ्याच्या आनंदात तिला आनंद मानताच येत नाहीये.

आरतीला वाईट वाटू नये म्हणून आम्ही आमचं आयुष्य का म्हणून कॉम्प्रमाईज करायचं? ऋतुजा समजदार आहे म्हणून आजवर काहीच बोलली नाही. तिच्या जागेवर एखादी दुसरी मुलगी असती तर केव्हाच आपण दोघेच राहू यासाठी हट्ट धरला असता.

लग्न झाल्यावर आई नाराज झाली. का तर म्हणे बायकोला सगळं सांगतो आणि आईला देण्यासाठी वेळ नाहीये. आई, माझ्यासाठी हे सगळ नवीन होत, त्यात ऍडजस्ट व्हायला थोडा तरी वेळ द्यायला हवा ना.

आम्ही दोघे इथे आहोत म्हणून आई इकडे येत नाही, हा असा विचार तिने का करावा? बरं ऋतुजा तुला काही बोलली नाही की मी तुला येऊ नको म्हणालो नाही. आपल्या मनाचे अर्थ लावून घ्यायचे आणि मोकळं व्हायचं याला काही अर्थ आहे का?

मी घरात मोठा असल्याने मला नेहमी वाटायचं की, हे घर एकत्र जोडून ठेवणे माझं काम आहे. माझ्या बहीण भावांचं आयुष्य माझ्यामुळे सुखकर व्हावं. पण तुमच्यापैकी कोणीतरी माझ्या मनाचा विचार केला का?

आरतीने आज जे पाऊल उचलल, त्यानंतर मला स्वतःची लाज वाटली. मी माझ्या बहिणीला सिक्युरिटी देऊ शकलो नाही याच वाईट वाटलं. मी कमी पडलोय याची जाणीव मला होते आहे. मी हरलोय.

आई, बाबा, तुम्ही आरतीला तुमच्या सोबत सुरतला घेऊन जा. मी तिची जबाबदारी घेऊ शकत नाही.” अभिराज हात जोडून म्हणाला, त्याच्या डोळ्यात पाणी होते.

अभिराजची आई त्याच्या जवळ आली, तिने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला,

“तुझं काही चुकलं नाही रे बाळा. तू तुझ्या जागेवर बरोबर होतास. तू सगळी कर्तव्ये पार पाडली. माझी चूक सगळ्यात मोठी झाली आहे. मी ऋतुजा बद्दल गैरसमज करून घेतले. ऋतुजा सोबत न राहता तिला जज केल. मला वाटलं होतं की, ती खुप गर्विष्ठ आहे.

उलट तिने तर माझ्या दोन मुलांना सांभाळून घेतल. ऋतुजा, मला माफ कर. आरतीला तर मी घेऊन जाणारच आहे. तुम्ही दोघे तुमचा व्यवस्थित संसार करा. इथून पुढे काही झालं तरी मी तुमच्यावर नाराज होणार नाही. मला काही वाटलं तर हक्काने सांगेल.” आई अभिराजच्या गळ्यात पडून रडली.

“आई, सगळ्यात मोठी चूक मी केली आहे. दादा, ऋतू मला माफ करा. यापेक्षा जास्त बोलायला माझ्याकडे शब्दच नाहीयेत.” आरतीने हात जोडून माफी मागितली.

सगळ्यांच्या मनातील गैरसमज दूर झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी अकराच्या दरम्यान जेवण करून आई,बाबा, अजय व आरती सुरतला जाण्यासाठी रवाना झाले.

पुढील महिन्याभरात नवीन फ्लॅटचे इंटेरिअर पूर्ण झाले. घरगुती वास्तुशांती करून घेतली. ऋतुजाने पुजेला सासू सासऱ्यांना बसण्याचा आग्रह केला. अभिराजच्या आईने ऋतुजा बद्दल जे ग्रह करून घेतले होते, ते सर्व दूर झाले. सुखासुखी व घरातील वडीलधाऱ्यांच्या आशिर्वादाने ऋतुजा व अभिराजच्या संसाराला नवीन घरात सुरुवात झाली.

समाप्त.

इथेच ऋतुजा व अभिराजची कथा संपत आहे. तुम्हाला सर्वांना माझी ही कथा कशी वाटली? हे कमेंट करून नक्की कळवा. या कथेचे पर्व ३ वाचायला आवडेल का? हेही कमेंट करा.
धन्यवाद.